YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 शमु. 7:18-29

2 शमु. 7:18-29 IRVMAR

यानंतर दावीद आत जाऊन परमेश्वरासमोर बसला आणि म्हणाला, “हे प्रभू, परमेश्वरा, मला एवढी किंमत तू का देतोस? माझे घराणे तुला महत्वाचे का वाटते? तू मला एवढे मोठे का केलेस? हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या दृष्टीने ही केवळ लहान गोष्ट आहे; तू आपल्या सेवकाच्या घराण्यासंबंधाने पुढील बर्‍याच काळाचे सांगून ठेवले आहेस; प्रभू परमेश्वरा, हे सर्व तू मानवी व्यवहारासारखे केले आहेस. मी आणखी काय बोलणार? प्रभू परमेश्वरा, तू तुझ्या सेवकाला जाणतोसच. तू करणार म्हणालास, आणि तुला तसे करायची इच्छा आहे; तेव्हा या अदभुत गोष्टी खरोखरच घडतील. मला, तुझ्या सेवकाला, तू त्याची पूर्णकल्पनाही द्यायचे ठरवलेस. ह्यास्तव हे माझ्या प्रभू, परमेश्वरा, तू खरोखरच महान आहेस. जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे, त्यावरून पाहता तुझ्यासमान कोणी नाही. तुझ्याखेरीज अन्य कोणी देव नाही. पृथ्वीच्या पाठीवर इस्राएलसारखे राष्ट्र नाही. इस्राएलाची प्रजा ही खास प्रजा आहे. ती गुलाम होती, तिला तू मिसरमधून सोडवलेस आणि मुक्त केलेस. तिला आपली प्रजा बनवलेस. इस्राएलांसाठी तू महान आणि अद्भूत चमत्कार केलेस. तू निरंतर इस्राएलाला स्वतःच्या कवेत घेतलेस. हे परमेश्वरा तू त्यांचा देव झालास. आता तर परमेश्वर देवा, तू या तुझ्या सेवकासाठी काही गोष्टी सिध्दीस नेणार आहेस. तुझ्या वचनाप्रमाणे कृपा करून तसेच होऊ दे. माझा वंश सतत राज्य करू दे. मग तुझ्या नावाचा महिमा वाढेल. लोक म्हणतील, सर्वशक्तिमान परमेश्वर देवाची इस्राएलवर सत्ता आहे. तुझी सेवा करायला तुझा सेवक दावीद याच्या घराण्याला बळ मिळू दे. सर्वशक्तिमान परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तूच हे मला दाखवले आहेस तू म्हणालास, मी तुझ्यासाठी घर बांधीन, म्हणून मी तुझा सेवक तुझ्यापुढे ही प्रार्थना करण्याचे साहस करत आहे. प्रभू परमेश्वरा, तूच आमचा देव आहेस. तुझ्या सांगण्यावर माझा पूर्ण भरंवसा आहे. या सर्व चांगल्या गोष्टी माझ्याबाबतीत, तुझ्या या सेवकाच्या बाबतीत घडणार आहेत असे तू म्हणालास. आता माझ्या घराण्याला आशीर्वाद दे. माझा वंश सातत्याने चालू दे. हे प्रभू परमेश्वरा, तूच तसे म्हणाला आहेस आमच्यावर तुझ्या आशीर्वादाचे छत्र कायमचे राहील असा तुझा आशीर्वाद आहे.”