YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 शमुवेल 7:18-29

2 शमुवेल 7:18-29 MRCV

नंतर दावीद राजा आत जाऊन याहवेहसमोर बसला आणि म्हणाले: “हे सार्वभौम याहवेह, मी कोण आहे आणि माझे कुटुंब काय आहे की तुम्ही मला येथवर आणावे? आणि हे सार्वभौम याहवेह, जणू हे आपल्या दृष्टीने पुरेसे नव्हते म्हणून आपण आपल्या सेवकाच्या घराण्याच्या भविष्याबद्दलही अभिवचन दिले आहे आणि हे याहवेह परमेश्वरा हा करार केवळ एका मनुष्यासाठी आहे! “दावीद तुमच्यापुढे आणखी काय बोलू शकतो? कारण हे सार्वभौम याहवेह, आपल्या सेवकाला तुम्ही ओळखता. आपल्या वचनासाठी आणि तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही हे महान कार्य केले आहे व आपल्या सेवकाला ते कळविले आहे. “हे सार्वभौम याहवेह, तुम्ही किती थोर आहात! तुमच्यासारखा कोणीही नाही, जे आम्ही आमच्या कानांनी ऐकले आहे त्यानुसार, तुमच्याशिवाय दुसरे कोणी परमेश्वर नाही. आपल्या इस्राएली लोकांसारखे कोण आहेत—पृथ्वीवरील असे एक राष्ट्र ज्यांनी आपले लोक व्हावे म्हणून परमेश्वर त्यांना खंडून घेण्यास व आपले नाव प्रसिद्ध करण्यासाठी गेले; आणि ज्या तुमच्या लोकांना तुम्ही इजिप्त देशातून, म्हणजे राष्ट्रे व त्यांची दैवते यांच्यामधून सोडविले व त्यांच्यादेखत आपल्या लोकांसाठी महान व अद्भुत कार्य केले? तुम्ही आपल्या इस्राएली लोकांना स्वतःचे खास लोक म्हणून सर्वकाळासाठी स्थापित केले आहे आणि हे याहवेह, तुम्ही त्यांचे परमेश्वर झाला आहात. “तर आता, हे याहवेह परमेश्वरा, आपला सेवक व त्याच्या घराण्याविषयी जे अभिवचन तुम्ही दिले आहे, ते आपण सर्वकाळपर्यंत पूर्ण करावे, आपण म्हटल्याप्रमाणे आपण करावे, यासाठी की तुमचे नाव सर्वकाळ महान होईल. तेव्हा लोक म्हणतील, ‘सर्वसमर्थ याहवेह हे इस्राएलचे परमेश्वर आहेत!’ आणि आपला सेवक दावीद याचे घराणे तुमच्या दृष्टीत स्थापित व्हावे. “सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, तुम्ही आपल्या सेवकाला हे प्रकट केले आहे की, ‘मी तुझे घर बांधीन.’ त्यामुळे आपल्या सेवकाला तुमच्याकडे ही प्रार्थना करण्याचे धैर्य आले आहे. सार्वभौम याहवेह, तुम्ही परमेश्वर आहात! तुमचा करार विश्वासयोग्य आहे आणि तुम्ही आपल्या सेवकासाठी उत्तम गोष्टींचे अभिवचन दिले आहे. तर आता प्रसन्न होऊन आपल्या सेवकाच्या घराण्याला आशीर्वाद द्या, म्हणजे त्यांनी तुमच्या दृष्टीपुढे सदैव राहावे; कारण, सार्वभौम याहवेह, तुम्ही हे बोलला आहात आणि आपल्या आशीर्वादाने तुमच्या सेवकाचे घराणे सदैव आशीर्वादित व्हावे.”

2 शमुवेल 7 वाचा