YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 7:3-9

२ राजे 7:3-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्या वेळी वेशीच्या बाहेर चार कोडी माणसे होती. ती एकमेकांना म्हणाली, “येथे बसून का मरावे? नगरात जाऊ म्हटले तर तेथेही आपण मरणारच, कारण तेथे महागाई आणि येथे बसून राहिलो तरीही मरणारच; तर चला, आपण अरामी सेनेस जाऊन मिळू; त्यांनी आपल्याला जिवंत ठेवले तर आपण जगू; त्यांनी आपल्याला मारून टाकले तर आपण मरू एवढेच.” ते संध्याकाळच्या वेळी अरामी लोकांच्या छावणीकडे जायला निघाले; अरामी लोकांच्या छावणीच्या हद्दीवर ते येऊन पाहतात तर तेथे एकही माणूस नव्हता. कारण परमेश्वराने रथ, घोडे व प्रचंड सैन्य ह्यांचा गलबला अरामी सेनेच्या कानी पाडला; तेव्हा ते आपसांत म्हणाले, “पाहा, इस्राएलाच्या राजाने हित्ती व मिसरी राजे द्रव्य देऊ करून बोलावले आहेत.” म्हणून त्यांनी संध्याकाळी उठून पलायन केले; आणि आपले डेरे, घोडे व गाढवे जागच्या जागी टाकून व छावणी सोडून ते आपला जीव घेऊन पळाले. छावणीच्या बाहेरल्या हद्दीशी आल्यावर त्या कोड्यांनी एका तंबूत जाऊन तेथे खाणेपिणे केले आणि त्यातून रुपे, सोने व वस्त्रे नेऊन लपवून ठेवली; मग परत येऊन ते दुसर्‍या डेर्‍यात गेले आणि त्यातूनही माल नेऊन त्यांनी लपवून ठेवला. मग ते आपसांत म्हणू लागले, “आपण करत आहोत ते बरे नाही; आज शुभवार्ता कळवण्याचा दिवस आहे, पण आपण गप्प बसलो आहोत. सकाळ होईपर्यंत आपण थांबलो तर आपल्याला शासन होईल; तर चला, आपण राजवाड्यात जाऊन हे कळवू.”

सामायिक करा
२ राजे 7 वाचा

२ राजे 7:3-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

वेशीजवळ कोड झालेली चार माणसे बसलेली होती. ती आपापसात बोलताना म्हणाली, आपण मृत्यूची वाट पाहत इथे कशाला बसलो अहोत? शोमरोनात अन्नाचा दुष्काळ आहे. आपण तिथे गेलो तरी मरणारच आहोत. इथे थांबलो तरी मरणार आहोत. तेव्हा आपण अरामी छावणीवरच जावे. त्यांनी जीवदान दिले तर जगू. त्यांनी मारले तर मरुन जाऊ. तेव्हा ते चौघेजण संध्याकाळी अरामी सैन्याच्या तळाजवळ आले आणि अगदी टोकाशी जाऊन पाहतात तर तिथे कोणाचाच पत्ता नाही. परमेश्वराच्या करणीने अरामी लोकांस आपल्यावर घोडे, रथ, विशाल सेना चालून येत आहे असा भास झाला तेव्हा ते आपापसात म्हणाले, “इस्राएलाच्या राजाने हित्ती आणि मिसरी राजांना द्रव्य देऊन आपल्यावर चाल करण्यास पाठवलेले दिसते.” आणि अरामी लोकांनी फार उशीर व्हायच्या आत संध्याकाळीच तेथून पळ काढला. आपले तंबू, घोडे, गाढवे सगळे जसेच्या तसेच टाकून ते ते आपला जीव घेऊन तेथून पळाले. शत्रूच्या छावणीजवळ आल्यावर, कोड झालेली ती चार माणसे एका तंबूत शिरली. तिथे त्यांनी खाणेपिणे केले. तिथले कपडेलत्ते आणि सोनेचांदी त्यांनी उचलली. सगळ्या गोष्टी त्यांनी लपवून ठेवल्या. मग ते दुसऱ्या तंबूत शिरले. तिथली चिजवस्तू बाहेर काढली, दुसरीकडे नेऊन ती लपवली. आणि मग ते एकमेकांना म्हणाले, “आपण करतो ते बरे नाही. आज आपल्याजवळ चांगली बातमी असून आपण गप्प आहोत. सकाळी उजाडेपर्यंत जर आपण हे कुणाला सांगितले नाहीतर आपल्याला नक्कीच शासन होईल. तेव्हा आपण आता राजवाड्यात राहणाऱ्या लोकांस या गोष्टीची वर्दी देऊ.”

सामायिक करा
२ राजे 7 वाचा

२ राजे 7:3-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

त्यावेळी शहराच्या वेशीजवळ चार कुष्ठरोगी बसले होते. त्यांनी एकमेकास म्हटले, “आपण मरेपर्यंत इथे का राहावे? जर आपण म्हणालो, ‘आपण शहरात जाऊ,’ तर तिथे दुष्काळ आहे आणि आपण तर मरणारच. येते बसून राहिलो तरीही आपण मरणारच आहोत. तर मग आपण अरामी सैन्याच्या छावणीत जाऊ आणि शरण घेऊ. त्यांनी आपल्याला जीवदान दिले, तर जिवंत राहू आणि मारून टाकले, तर आपण मरू, तर त्यात काही हरकत नाही.” संध्याकाळी ते उठले आणि अरामी सैन्याच्या छावणीत गेले, पण जेव्हा ते छावणीच्या सीमेवर आले तेव्हा तिथे एकही मनुष्य नव्हता, कारण प्रभू परमेश्वराने अरामी सेनेला रथांचा आणि घोड्यांचा आणि मोठ्या सैन्याचा आवाज ऐकविला होता. तेव्हा ते एकमेकांना म्हणाले, “पाहा, आमच्यावर हल्ला चढविण्यासाठी इस्राएलाच्या राजाने पैसे देऊन हिथी व इजिप्ती राजे बोलाविले आहे.” तेव्हा ते उठले आणि संध्याकाळी पळून गेले. त्यांनी आपले तंबू, घोडे, गाढवे यांचा त्याग केला. आपले तंबू तसेच सोडून प्राण वाचविण्यासाठी त्यांनी पलायन केले. जेव्हा हे कुष्ठरोगी अरामी छावणीच्या सीमेजवळ आले, तेव्हा त्यांनी एका तंबूत घुसून खाणेपिणे केले. त्यांनी चांदी, सोने आणि कपडे गोळा करून ते लपवून ठेवले. ते परत येऊन दुसर्‍या तंबूत गेले आणि त्यातून काही वस्तू घेतल्या आणि त्यादेखील लपवून ठेवल्या. तेव्हा ते एकमेकास म्हणाले, “आपण जे करत आहोत ते योग्य नाही. हा आनंदाच्या शुभवार्तेचा दिवस आहे आणि ती आपण स्वतःजवळच ठेवीत आहोत. जर आपण सकाळ होईपर्यंत थांबून राहिलो तर आपण दंडपात्र होऊ. तेव्हा चला, आपण राजवाड्यात जाऊन ही बातमी सांगू.”

सामायिक करा
२ राजे 7 वाचा