YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 7

7
1तेव्हा अलीशा म्हणाला, “तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका; परमेश्वर म्हणतो : उद्या ह्याच वेळी शोमरोनाच्या वेशीत एक माप सपीठ एका शेकेलाला व दोन मापे सातू एका शेकेलाला मिळतील.”
2तेव्हा ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकत होता त्याने देवाच्या माणसाला म्हटले, “पाहा, परमेश्वराने आकाशकपाटे उघडली तरी असा प्रकार होईल काय?” त्याने त्याला म्हटले, “तू आपल्या डोळ्यांनी हे पाहशील पण त्यांतले काही खाणार नाहीस.”
3त्या वेळी वेशीच्या बाहेर चार कोडी माणसे होती. ती एकमेकांना म्हणाली, “येथे बसून का मरावे?
4नगरात जाऊ म्हटले तर तेथेही आपण मरणारच, कारण तेथे महागाई आणि येथे बसून राहिलो तरीही मरणारच; तर चला, आपण अरामी सेनेस जाऊन मिळू; त्यांनी आपल्याला जिवंत ठेवले तर आपण जगू; त्यांनी आपल्याला मारून टाकले तर आपण मरू एवढेच.”
5ते संध्याकाळच्या वेळी अरामी लोकांच्या छावणीकडे जायला निघाले; अरामी लोकांच्या छावणीच्या हद्दीवर ते येऊन पाहतात तर तेथे एकही माणूस नव्हता.
6कारण परमेश्वराने रथ, घोडे व प्रचंड सैन्य ह्यांचा गलबला अरामी सेनेच्या कानी पाडला; तेव्हा ते आपसांत म्हणाले, “पाहा, इस्राएलाच्या राजाने हित्ती व मिसरी राजे द्रव्य देऊ करून बोलावले आहेत.”
7म्हणून त्यांनी संध्याकाळी उठून पलायन केले; आणि आपले डेरे, घोडे व गाढवे जागच्या जागी टाकून व छावणी सोडून ते आपला जीव घेऊन पळाले.
8छावणीच्या बाहेरल्या हद्दीशी आल्यावर त्या कोड्यांनी एका तंबूत जाऊन तेथे खाणेपिणे केले आणि त्यातून रुपे, सोने व वस्त्रे नेऊन लपवून ठेवली; मग परत येऊन ते दुसर्‍या डेर्‍यात गेले आणि त्यातूनही माल नेऊन त्यांनी लपवून ठेवला.
9मग ते आपसांत म्हणू लागले, “आपण करत आहोत ते बरे नाही; आज शुभवार्ता कळवण्याचा दिवस आहे, पण आपण गप्प बसलो आहोत. सकाळ होईपर्यंत आपण थांबलो तर आपल्याला शासन होईल; तर चला, आपण राजवाड्यात जाऊन हे कळवू.”
10त्यांनी जाऊन नगराच्या वेसकर्‍यांना हाक मारून सांगितले, “आम्ही अरामी लोकांच्या छावणीकडे गेलो होतो, तो पाहा, तेथे एकही मनुष्य नाही; माणसांचा शब्दही नाही. तेथे घोडे व गाढवे बांधून ठेवलेली आहेत; डेरेही जसेच्या तसेच आहेत.”
11तेव्हा वेसकर्‍यांनी पुकारून राजमंदिरात ही खबर पोचवली.
12राजा रात्रीचा उठून आपल्या सेवकांना म्हणाला, “अरामी लोकांचा काय विचार आहे हे मी तुम्हांला सांगतो. त्यांना ठाऊक आहे की आपली उपासमार झाली आहे; हे जाणून ते छावणीच्या बाहेर मैदानात लपून राहिले आहेत; त्यांचा मनसुबा असा की आपण नगरातून बाहेर पडलो की आपल्याला जिवंत पकडून नगरात प्रवेश करावा.”
13राजाच्या एका सेवकाने म्हटले, “नगरात वाचून राहिलेल्या घोड्यांतले पाच घोडे देऊन काय आहे ते पाहायला कोणाला तरी पाठवावे; इस्राएलाचा जो समुदाय बाकी राहिला आहे त्याच्यासारखी त्या माणसांची गती होईल; किंवा ज्या इस्राएलाचा संहार झाला आहे त्यांच्यासारखी त्यांची स्थिती होईल.”
14मग दोन रथ व घोडे जुंपून आणले आणि राजाने अरामी सैन्यामागे काही लोक पाठवले; त्याने त्यांना सांगितले, “काय आहे ते पाहून या.”
15ते यार्देनेपर्यंत त्यांच्यामागून गेले आणि पाहतात तर अरामी लोकांनी आपली वस्त्रेपात्रे गडबडीत रस्ताभर टाकून दिलेली त्यांना आढळली. जासुदांनी परत जाऊन राजाला हे सांगितले.
16तेव्हा लोकांनी बाहेर पडून अरामी लोकांचे डेरे लुटले. ह्याप्रमाणे परमेश्वराच्या वचनानुसार एका शेकेलाला मापभर सपीठ व एका शेकेलाला दोन मापे सातू विकू लागले.
17ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकला होता त्याला राजाने वेशीवर नेमले होते. वेशीत लोकांची गर्दी झाली. त्या गर्दीत त्यांच्या पायांखाली सापडून तो मेला. राजा देवाच्या माणसांकडे आला होता तेव्हा त्याने त्यांना जे सांगितले होते त्याप्रमाणे झाले.
18देवाचा माणूस राजाला म्हणाला होता की, “उद्या ह्याच वेळेस शोमरोनाच्या वेशीत एका शेकेलाला दोन मापे सातू व एका शेकेलाला एक माप सपीठ मिळेल.” तसेच झाले.
19त्या सरदाराने देवाच्या माणसाला म्हटले होते की, “परमेश्वराने आकाशकपाटे उघडली तरी असा प्रकार होईल काय?” त्याला त्याने प्रत्युत्तर दिले होते की, “तू आपल्या डोळ्यांनी पाहशील पण त्यांतले काही खाणार नाहीस.”
20त्याप्रमाणेच त्याचे झाले; वेशीत लोकांची गर्दी झाली होती त्यांच्या पायांखाली तो सापडला आणि मेला.

सध्या निवडलेले:

२ राजे 7: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन