२ राजे 3:13-27
२ राजे 3:13-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अलीशा इस्राएलाच्या राजाला म्हणाला, “मला तुझ्याशी काय कर्तव्य आहे? तू आपल्या बापाच्या, आपल्या आईच्या संदेष्ट्यांकडे जा.” इस्राएलाचा राजा त्याला म्हणाला, “नाही, नाही; ह्या तीन राजांना मवाबाच्या हाती द्यावे म्हणून परमेश्वराने त्यांना एकत्र केले आहे.” अलीशा म्हणाला, “ज्याच्या हुजुरास मी असतो त्या सेनाधीश परमेश्वराच्या जीविताची शपथ; येथे असलेला यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याला मी मान देत नसतो तर मी तुझ्याकडे ढुंकूनही पाहिले नसते. आता एखादा वाजंत्री घेऊन या.” वाजंत्री वाद्य वाजवत असताना परमेश्वराचा हस्त अलीशावर आला. तो म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, ह्या खोर्यात जिकडेतिकडे खळगे खणा. परमेश्वर म्हणतो, काही वादळ किंवा पाऊस तुमच्या दृष्टीस न पडता हे खोरे पाण्याने भरून जाईल; आणि तुम्ही, तुमची पाठाळे आणि जनावरे पाणी पितील. परमेश्वराच्या दृष्टीने ही केवळ क्षुल्लक गोष्ट आहे; तो मवाबी लोकांना तुमच्या हाती देईल. तेव्हा तुम्ही प्रत्येक तटबंदी नगराचा व प्रत्येक निवडक नगराचा विध्वंस करा; चांगला वृक्ष असेल तेवढा तोडा; सर्व पाण्याचे कूप बुजवून टाका व दगड टाकून सर्व उत्तम शेतीची नासाडी करा.” सकाळच्या प्रहरी अन्नबली अर्पण करण्याच्या समयी अदोमाच्या दिशेने पाणी वाहत आले व तो सर्व प्रदेश जलमय झाला. राजे एकत्र होऊन आपल्याशी लढाई करण्यासाठी येत आहेत हे मवाबी लोकांनी ऐकले तेव्हा जितके मवाबी लढाईसाठी कंबर बांधण्यास लायक होते तितके व त्यांहून अधिक वयाचे सगळे एकत्र होऊन सीमेवर उभे राहिले. दुसर्या दिवशी ते पहाटेस उठले आणि सूर्याचे किरण त्या पाण्यावर पडल्यामुळे मवाबी लोकांना ते दुरून रक्तासारखे भासले. ते म्हणाले, “ते रक्तच आहे; त्या राजांचा नाश झाला आहे; त्यांनी एकमेकांना मारून टाकले आहे ह्यात संशय नाही. तर मवाब्यांनो, लूट करायला चला.” मवाबी इस्राएलाच्या छावणीनजीक आले तेव्हा इस्राएलांनी उठून त्यांना मार दिला; आणि ते त्यांच्यापुढून पळाले; इस्राएल त्यांना मारत मारत त्यांच्या देशात शिरले. त्यांनी नगरांचा विध्वंस केला; सर्व चांगल्या शेतांत प्रत्येक पुरुषाने दगड फेकले, त्यांनी ती दगडांनी भरून टाकली; पाण्याचे सर्व कूप बुजवले, सर्व चांगली झाडे तोडून टाकली; फक्त कीर-हरेसेथ येथे त्यांनी दगडांशिवाय काहीएक राहू दिले नाही; आणि गोफणदारांनी घेरून त्याचा विध्वंस केला. युद्धात आपण अगदी जेर झालो असे मवाबाच्या राजाने पाहिले तेव्हा त्याने सातशे धारकरी बरोबर घेऊन अदोमाच्या राजाकडे जाण्यासाठी घेरा फोडण्याचा यत्न केला, पण त्याचे काही चालले नाही. तेव्हा त्याने आपला ज्येष्ठ पुत्र युवराज ह्याला नेऊन तटावर त्याचा होम केला, ह्यावरून इस्राएलावर फार कोप झाला व ते त्याला सोडून स्वदेशी परत गेले.
२ राजे 3:13-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अलीशा इस्राएलाच्या राजाला म्हणाला, “तुझे माझे काय आहे? तू आपल्या वडिलांच्या किंवा आईच्या संदेष्ट्यांकडे जा.” तेव्हा इस्राएलाच्या राजा अलीशाला म्हणाला, “नाही, कारण परमेश्वराने आम्हा तीन राजांना एकत्र आणले, ह्यासाठी की मवाबाकडून आम्ही पराभूत व्हावे.” अलीशा म्हणाला, “ज्या परमेश्वराच्या सान्निध्यात मी उभा राहतो, तो सैन्याचा परमेश्वर जिवंत आहे. जर यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याच्या उपस्थितीचा मी आदर केला नसता, तर खरोखर मी तुझी दखल घेतली नसती व तुझ्याकडे पाहिलेही नसते. तेव्हा आता एखादा वीणावादक माझ्याकडे आणा.” आणि असे झाले की वीणावादक वाजवत असता, परमेश्वराचा हात अलीशावर आला. मग अलीशा म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो: या कोरड्या नदीच्या खोऱ्यात जागोजागी खणून ठेवा. कारण परमेश्वर असे म्हणतो, तुम्हास वारा, पाऊस काही दिसणार नाही पण तरीही हे खोरे पाण्याने भरुन जाईल, आणि तुम्ही प्याल, तुम्ही व तुमच्या जनावरांनाही पाणी मिळेल. कारण हे तर परमेश्वराच्या दृष्टीने सोपे आहे. तो तुम्हास मवाबांवरही विजय मिळवून देईल. प्रत्येक तटबंदीच्या व चांगल्या बंदोबस्त असलेल्या अशा निवडक नगरांवर तुम्ही हल्ला कराल. प्रत्येक चांगला वृक्ष तुम्ही तोडून टाकाल, पाण्याचे झरे, विहिरी बुजवून टाकाल. दगडफेक करून चांगल्या शेतांची नासाडी कराल.” मग सकाळी, अर्पणाच्या वेळी, अदोमाच्या बाजूने पाण्याचा लोंढा आला आणि देश पाण्याने भरला. राजे आपल्यावर हल्ला करायला आले आहेत हे मवाबाच्या लोकांनी ऐकले तेव्हा, त्यांनी आपल्याकडच्या युध्दात उतरता येण्याजोग्या सर्व पुरुषांना एकत्र केले. युध्दासाठी सज्ज होऊन ते सीमेवर जाऊन थांबले. ते लोक त्या दिवशी भल्या पहाटे उठले तेव्हा उगवत्या सूर्याची लाली पाण्यात प्रतिबिंबित होती. मवाबी लोकांस त्यांच्या विरूद्ध दिशेला असलेले पाणी दिसले असता, ते त्यांना रक्तासारखे लाल दिसले. ते म्हणाले, “हे रक्त आहे! या राजांची नक्कीच आपापसात लढाई झालेली दिसते, त्यांनी परस्परांना मारले! तर आता मवाब्यांनो त्यांना लुटायला चला.” मवाबी लोक इस्राएलांच्या छावणीपाशी आले असता, इस्राएल लोकांनी बाहेर येऊन मवाबी सैन्यावर हल्ला केला. तेव्हा मवाबी लोक पळत सुटले व इस्राएल लोक त्यांच्या प्रदेशातही त्यांना मारत गेले. इस्राएल लोकांनी त्यांची नगरे उध्वस्त केली, त्यांच्या प्रत्येक शेतांत दगडांचा मारा करून ते बुजवले. त्यांनी पाण्याच्या सर्व विहिरी बुजवल्या व सर्व चांगली झाडे तोडून टाकली केली. फक्त कीर-हरेसमधे त्यांनी त्यांचे दगड राहू दिले. पण गोफण चालवणाऱ्या सैन्यांनी त्या नगरावर हल्ला केला. या लढाईला तोंड देणे आपल्याला जड जात आहे हे मवाबाचा राजा मेशाने जाणले. तेव्हा त्याने तलवारधारी सातशे निवडक माणसे बरोबर घेतली आणि वेढा फोडून अदोमाच्या राजाला तो मारायला निघाला पण त्यास ते जमले नाही. मग मवाबाच्या राजाने आपल्या थोरल्या मुलाला बरोबर घेतले, जो त्यानंतर त्याच्या गादीवर बसणार होता. नगराच्या तटबंदीच्या भिंतीवर या राजाने आपल्या मोठ्या मुलाचा यज्ञात बली दिला. तेव्हा इस्राएलवर मोठा कोप झाला. मग ते मवाबाचा राजा मेशा याला सोडून आपल्या देशात परत आले.
२ राजे 3:13-27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अलीशाने इस्राएलाच्या राजाला म्हटले, “तुम्ही माझ्याकडे का आला? तुम्ही तुमच्या वडिलांच्या संदेष्ट्याकडे जा आणि तुमच्या आईच्या संदेष्ट्याकडे जा.” तेव्हा इस्राएलाच्या राजाने उत्तर दिले, “नाही! कारण याहवेहनेच आमचा पराभव मोआबाच्या राजाच्या हातून व्हावा म्हणून आम्हा तीन राजांना इकडे आणले आहे.” अलीशा म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, ज्यांच्या सान्निध्यात मी उभा राहतो, जर मला यहूदीयाचा राजा यहोशाफाट याच्याबद्दल आदर नसता तर मी तुमच्याकडे लक्ष दिले नसते. परंतु आता एका वीणावादकाला मजकडे घेऊन या.” हा वादक वीणा वाजवित असताना याहवेहचा हात अलीशावर आला आणि तो म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: मी या दरीला पाण्याच्या तळ्यांनी भरून टाकीन. कारण याहवेह असे म्हणतात: तुम्हाला वारा किंवा पाऊस दिसणार नाही, तरीही ही दरी पाण्याने भरून जाईल आणि तुम्ही, तुमचे गुरे आणि इतर जनावरे ते पाणी पितील. हे तर याहवेहच्या दृष्टीने फार सोपे आहे, ते मोआबी लोकांना देखील तुमच्या हातात देतील. तुम्ही त्यांची सर्वोत्तम शहरे, तसेच तटबंदी असलेली शहरेही जिंकून घ्याल. प्रत्येक उत्तम झाड तुम्ही कापाल, सर्व झर्यांचे पाणी तुम्ही अडवाल आणि दगड पसरून त्यांच्या सुपीक जमिनीची नासाडीही कराल.” दुसर्या दिवशी सकाळी यज्ञार्पणाच्या वेळी—पाण्याचा लोंढा एदोमाच्या दिशेने वाहत आला व संपूर्ण भूमी पाण्याने भरून गेली. राजे त्यांच्याविरुद्ध युद्ध करण्यास येत आहेत हे मोआबातील लोकांना समजले, तेव्हा त्यांनी लगेच प्रत्येक तरुण व वयस्क पुरुषांनाही सैन्यात दाखल करून घेतले आणि सीमेवर आपली छावणी केली. जेव्हा ते मोठ्या पहाटेस उठले तेव्हा सूर्य पाण्यावर तळपत होता. ते पाणी मोआबी लोकांना दुरून रक्तासारखे दिसू लागले. ते म्हणाले, “हे रक्त आहे! त्या राजांनी एकमेकांसह युद्ध केले असेल आणि त्यांनी एकमेकांना ठार मारले असेल. तेव्हा आता, मोआब्यांनो चला, त्यांचे सर्वकाही लुटून आणू.” पण जेव्हा मोआबी लोक इस्राएलांच्या छावणीकडे आले न आले तोच इस्राएलचे सैन्य उठले आणि ते पळेपर्यंत त्यांच्याशी युद्ध केले आणि त्वेषाने तुटून पडले व त्यांचा संहार करू लागले; आणि मोआबाचे सैन्य इस्राएलांपासून पळू लागले. इस्राएलांनी त्यांच्या देशात प्रवेश केला आणि मोआबी लोकांची कत्तल करत गेले. त्यांनी मोआबाची शहरे उद्ध्वस्त केली. सर्व सुपीक जमिनीत एकएकाने दगडधोंड फेकून ती भरून टाकली. पाण्याच्या विहिरीतील झरे बुजविले आणि सर्व उत्तम झाडे तोडून टाकली. फक्त कीर-हरेसेथ येथील दगड राहू दिले, परंतु गोफणदारांनी त्याला घेरले आणि त्याच्यावर हल्ला केला. आपली सेना हरविली जात आहे हे मोआबाच्या राजाने पाहिले, तेव्हा त्याने अखेरचा प्रयत्न म्हणून आपल्या सातशे धनुर्धाऱ्यांसह शत्रूंची फळी फोडून एदोमाच्या राजाकडे निसटून जाण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा हा प्रयत्न निष्फळ ठरला. म्हणून त्याने आपला ज्येष्ठपुत्र, जो त्याच्यानंतर राजा होणार होता, त्याला धरून ठार मारले व शहराच्या तटावरच त्याचे होमार्पण केले. ही घटना पाहून इस्राएली सैन्यास जबरदस्त धक्का बसला; किळस येऊन ते माघारी आपल्या देशाला परतले.