१ राजे 4:20-34
१ राजे 4:20-34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
यहूदा व इस्राएल हे समुद्रकिनार्याच्या वाळूप्रमाणे संख्येने बहुत असत; ते खाऊनपिऊन चैनीत असत. महानदापासून पलिष्ट्यांच्या देशापर्यंत व मिसर देशाच्या सरहद्दीपर्यंत सर्व राज्यांवर शलमोनाने राज्य केले; तेथील लोकांनी शलमोनाच्या सर्व आयुष्यभर त्याला करभार दिला व ते त्याचे अंकित राहिले. शलमोनाला एका दिवसाची भोजनसामग्री लागे, ती येणेप्रमाणे : तीस कोर मापाचे सपीठ; साठ कोर मापाचे पीठ; दहा पुष्ट बैल, कुरणातले वीस बैल, शंभर मेंढरे, ह्याखेरीज हरिणे, सांबरे, भेकरे व आणखी पुष्ट पक्षी. महानदाच्या अलीकडच्या सर्व देशांवर म्हणजे तिफसाह येथून गज्जापर्यंतच्या देशांवर जितके राजे होते त्या सर्वांवर शलमोनाचे प्रभुत्व होते; आणि आसपासच्या सर्व देशांच्या लोकांशी त्याचे सख्य असे. दानापासून बैर-शेब्यापर्यंत सारे यहूदी व इस्राएल आपापली द्राक्षलता व अंजीर वृक्ष ह्यांच्याखाली शलमोनाच्या सर्व कारकिर्दीत निर्भय राहत होते. रथांच्या घोड्यांची चाळीस हजार ठाणी व बारा हजार स्वार शलमोन बाळगून होता. शलमोन राजाला व त्याच्या पंक्तीला भोजन करणार्यांसाठी कमावीसदार त्यांच्या-त्यांच्या नेमलेल्या महिन्यांत अन्नाचा पुरवठा करीत; कोणत्याही पदार्थाची वाण ते पडू देत नसत. रथांच्या व स्वारीच्या घोड्यांसाठी जव व पेंढा लागे तो प्रत्येक कमावीसदार नियमाप्रमाणे पोचता करीत असे. देवाने शलमोनाला अलोट शहाणपण व बुद्धी दिली आणि समुद्रकाठच्या वाळूसारखे विशाल मन दिले. शलमोनाचे शहाणपण सर्व पूर्वदेशनिवासी आणि मिसरी ह्यांच्याहून अधिक होते. तो सर्व मनुष्यांहून, एज्राही एथान, हेमान व माहोलाचे पुत्र कल्कोल व दर्दा ह्या सर्वांहून शहाणा होता, आणि त्याची कीर्ती आसपासच्या सर्व राष्ट्रांमध्ये पसरली. त्याने तीन हजार नीतिसूत्रे कथन केली व एक हजार पाच गीते रचली. त्याने लबानोनावरील देवदारूपासून ते भिंतीतून उगवणार्या एजोब झाडापर्यंत सर्व उद्भिज्जांचे विवेचन केले; तसेच पशू, पक्षी, रांगणारे जंतू व मासे ह्यांचेही त्याने विवेचन केले. पृथ्वीवरील ज्या ज्या राष्ट्रांनी व ज्या ज्या राजांनी शलमोनाच्या शहाणपणाची कीर्ती ऐकली त्यांच्याकडून लोक त्याचे शहाणपण ऐकायला येत असत.
१ राजे 4:20-34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यहूदा आणि इस्राएलमध्ये समुंद्रातील वाळूसारखी बहुसंख्य माणसे होती. ती खात, पीत व मजा करत आनंदाने जगत होती. नदीपासून ते पलिष्ट्यांच्या भूमीपर्यंत व मिसराच्या सीमेपर्यंत शलमोनाची सत्ता होती. या देशांकडून शलमोनाला नजराणे येत आणि ते आयुष्यभर त्याचा आदर करीत. शलमोनाला एका दिवसास जेवणाऱ्या सर्वांसाठी खालील अन्नपदार्थ लागत:तीस कोर मापाचे सपीठ; साठ कोर मापाचे पीठ, दहा पुष्ट गुरे कुरणावर चरलेली वीस गुरे, शंभर मेंढरे, हरीण, सांबरे, भेकर, खाण्यायोग्य पक्षी. महानदाच्या अलीकडील सर्व देशांवर म्हणजे तिफसाह येथून गज्जापर्यंतच्या सर्व देशांवर व जितके राजे होते त्यावर त्याची सत्ता होती. या प्रदेशात सर्वत्र शांतता नांदत होती. शलमोनाच्या दिवसात दानपासून बैर-शेबापर्यंत, यहूदा आणि इस्राएलमधील सर्व लोक निर्धास्तपणे व शांततेने राहत होते. आपापल्या अंजीर वृक्षांखाली आणि द्राक्षबागांमध्ये ते निवांत होते. रथाच्या चार हजार घोड्यांसाठी पागा होत्या. तसेच शलमोनाकडे बारा हजार स्वार होते. शिवाय ते बारा कारभारी प्रत्येक महिन्याला शलमोनाला सर्व जीवनावश्यक गोष्टी पुरवत होते. राजाच्या पंगतीला बसून जेवणाऱ्या सर्वांना ते पुरेसे होते. रथाच्या आणि स्वारीच्या घोड्यांसाठी पुरेसा पेंढा आणि सातूही ते कारभारी पुरवीत. नेमलेल्या ठिकाणी प्रत्येकजण हे धान्य आणून टाकी. देवाने शलमोनाला भरपूर शहाणपण व बुध्दी दिली होती. आणि समुद्राच्या वाळूप्रमाणे विशाल मन दिले. पूर्वेकडील सर्वांपेक्षा शलमोनाचे शहाणपण अधिक होते. मिसरमधल्यापेक्षा ते थोर होते. पृथ्वीच्या पाठीवर त्याच्याइतका सूज्ञ कोणी नव्हता. एज्राही एथान तसेच माहोलची पुत्र, हेमान व कल्यकोल व दर्दा, यांच्यापेक्षा तो शहाणा होता. त्याचे नाव इस्राएल राष्ट्रा बाहेर सर्वत्र पसरले होते. आपल्या आयुष्यात त्याने तीन हजार बोध वचने आणि पंधराशे गीते लिहिली. निसर्गाविषयी ही त्यास ज्ञान होते. लबानोनातल्या गंधसरुपासून भिंतीतून उगवणाऱ्या वनस्पतीपर्यंत सर्व तऱ्हेच्या झाडांचे त्यास ज्ञान होते. प्राणी, पक्षी, मासे आणि सरपटणारे प्राणी यांचेही त्याने वर्णन केले आहे. देशोदेशीचे लोक त्याच्याकडे ज्ञानार्जनासाठी येत. सर्व राष्ट्रांचे राजे आपल्या पदरच्या हुशार मनुष्यांना शलमोनाकडून ज्ञान घ्यायला पाठवत.