1 राजे 4
4
शलमोनाचे सरदार व अधिकारी
1राजा शलमोन सर्व इस्राएलाचा राजा होता. 2त्यास शासनात मदत करणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांची नावे अशी: सादोकाचा पुत्र अजऱ्या, हा याजक होता. 3शिशाचे पुत्र अलिहोरेफ आणि अहीया. न्यायालयातील घडामोडींची टिपणे ठेवणे हे त्यांचे काम होते. अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट हा बखरकार होता. 4बनाया हा यहोयादाचा पुत्र सेनापती होता सादोक आणि अब्याथार याजक होते 5नाथानचा पुत्र अजऱ्या हा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रमुख होता, नाथानाचा पुत्र जाबूद याजक असून राजाचा सल्लागार होता. 6अहीशार हा राजाच्या महालातील सर्व गोष्टींचा प्रमुख होता, अब्दाचा पुत्र अदोनीराम गुलामांच्या खात्याचा प्रमुख होता. 7इस्राएलचे कारभाराच्या सोयीसाठी बारा भाग पाडलेले होते. प्रत्येक भागावर शलमोनाने कारभारी नेमले होते. त्या त्या भागातून अन्नधान्य गोळा करून राजाच्या कुटुंबियांना देण्याची त्यांची जबाबदारी होती. बारा कारभाऱ्यापैकी प्रत्येकावर प्रतिवर्षी एक महिना ही पाळी येई. 8त्या बारा कारभाऱ्याची नावे अशी: बेन-हूर, हा एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशावर अधिकारी होता. 9माकस, शालबीम, बेथ-शेमेश व एलोन बेथ-हानान यांच्यावर बेन-देकेर हा कारभारी. 10अरुबोथ, सोखो आणि हेफेर या प्रांतावर बेन-हेसेद हा कारभारी होता. 11बेन-अबीनादाब पूर्ण दोर प्रांतावर होता. शलमोनाची कन्या टाफाथ ही याची पत्नी. 12तानख, मगिद्दो व पूर्ण बेथ-शान म्हणजेच सारतानाजवळ इज्रेलच्या खाली बेथ-शानापासून आबेल-महोलापर्यंत व यकमामाच्या उतारापर्यंत अहीलुदाचा पुत्र बाना हा होता. 13रामोथ-गिलादावर बेन-गेबेर; हा प्रमुख होता. गिलाद येथील मनश्शेचा पुत्र याईर याची सर्व गावे, बाशानातले अर्गोब प्रांत हे भाग त्याच्याकडे होते. या भागात भक्कम तटबंदीची आणि पितळेची अडसर असणारी साठ मोठी नगरे होती. 14इद्दोचा पुत्र अहीनादाब महनाईम प्रांतावर होता. 15नफतालीवर अहीमास होता. (ज्याने शलमोनाची कन्या बासमथ हिच्याशी लग्न केले होते.) 16हूशयाचा पुत्र बाना, हा आशेर आणि आलोथ यांच्यावर कारभारी होता. 17पारुहाचा पुत्र, यहोशाफाट इस्साखारवर होता. 18एलाचा पुत्र शिमी बन्यामीनचा कारभारी होता. 19उरीचा पुत्र गेबेर गिलाद प्रांतावर होता. अमोऱ्यांचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग हे या प्रांतात राहत होते. गेबेर मात्र त्या प्रांताचा एकमेव कारभारी होता.
शलमोनाचे ज्ञान आणि त्याची समृध्दी
20यहूदा आणि इस्राएलमध्ये समुंद्रातील वाळूसारखी बहुसंख्य माणसे होती. ती खात, पीत व मजा करत आनंदाने जगत होती. 21नदीपासून ते पलिष्ट्यांच्या भूमीपर्यंत व मिसराच्या सीमेपर्यंत शलमोनाची सत्ता होती. या देशांकडून शलमोनाला नजराणे येत आणि ते आयुष्यभर त्याचा आदर करीत. 22शलमोनाला एका दिवसास जेवणाऱ्या सर्वांसाठी खालील अन्नपदार्थ लागत:तीस कोर मापाचे सपीठ; साठ कोर मापाचे पीठ, 23दहा पुष्ट गुरे कुरणावर चरलेली वीस गुरे, शंभर मेंढरे, हरीण, सांबरे, भेकर, खाण्यायोग्य पक्षी. 24महानदाच्या अलीकडील सर्व देशांवर म्हणजे तिफसाह येथून गज्जापर्यंतच्या सर्व देशांवर व जितके राजे होते त्यावर त्याची सत्ता होती. या प्रदेशात सर्वत्र शांतता नांदत होती. 25शलमोनाच्या दिवसात दानपासून बैर-शेबापर्यंत, यहूदा आणि इस्राएलमधील सर्व लोक निर्धास्तपणे व शांततेने राहत होते. आपापल्या अंजीर वृक्षांखाली आणि द्राक्षबागांमध्ये ते निवांत होते. 26रथाच्या चार हजार घोड्यांसाठी पागा होत्या. तसेच शलमोनाकडे बारा हजार स्वार होते. 27शिवाय ते बारा कारभारी प्रत्येक महिन्याला शलमोनाला सर्व जीवनावश्यक गोष्टी पुरवत होते. राजाच्या पंगतीला बसून जेवणाऱ्या सर्वांना ते पुरेसे होते. 28रथाच्या आणि स्वारीच्या घोड्यांसाठी पुरेसा पेंढा आणि सातूही ते कारभारी पुरवीत. नेमलेल्या ठिकाणी प्रत्येकजण हे धान्य आणून टाकी. 29देवाने शलमोनाला भरपूर शहाणपण व बुध्दी दिली होती. आणि समुद्राच्या वाळूप्रमाणे विशाल मन दिले. 30पूर्वेकडील सर्वांपेक्षा शलमोनाचे शहाणपण अधिक होते. मिसरमधल्यापेक्षा ते थोर होते. 31पृथ्वीच्या पाठीवर त्याच्याइतका सूज्ञ कोणी नव्हता. एज्राही एथान तसेच माहोलची पुत्र, हेमान व कल्यकोल व दर्दा, यांच्यापेक्षा तो शहाणा होता. त्याचे नाव इस्राएल राष्ट्रा बाहेर सर्वत्र पसरले होते. 32आपल्या आयुष्यात त्याने तीन हजार बोध वचने आणि पंधराशे गीते लिहिली. 33निसर्गाविषयी ही त्यास ज्ञान होते. लबानोनातल्या गंधसरुपासून भिंतीतून उगवणाऱ्या वनस्पतीपर्यंत सर्व तऱ्हेच्या झाडांचे त्यास ज्ञान होते. प्राणी, पक्षी, मासे आणि सरपटणारे प्राणी यांचेही त्याने वर्णन केले आहे. 34देशोदेशीचे लोक त्याच्याकडे ज्ञानार्जनासाठी येत. सर्व राष्ट्रांचे राजे आपल्या पदरच्या हुशार मनुष्यांना शलमोनाकडून ज्ञान घ्यायला पाठवत.
सध्या निवडलेले:
1 राजे 4: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.