१ राजे 3:5-15
१ राजे 3:5-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शलमोन गिबोन येथे असतानाच परमेश्वराने एका रात्री त्यास स्वप्नात दर्शन दिले तो म्हणाला, माग! “तुला काय हवे ते माग मी ते देईन.” तेव्हा शलमोन म्हणाला, “तुझा सेवक म्हणजेच माझे वडिल दावीद यांच्यावर तुझी कृपा होती. ते तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागले. ते विश्वासूपणाने आणि न्यायाने वागले. त्यानंतर आज त्याच्या मुलालाच गादीवर बसवून तू तुझ्या महान कराराबद्दल मोठाच दयाळूपणा दाखवला आहेस. माझे वडिल दावीदानंतर, परमेश्वर देवा, तू मला राजा केले आहेस. पण मी लहान मुलासारखाच आहे. मला बाहेर जायला व आत यायला समजत नाही. तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे, त्यांचा जमाव मोठा आहे ते असंख्य व अगणित आहेत. म्हणून तुझ्या सेवकास लोकांचा न्याय करण्यास शहाणपणाचे मन दे, त्यामुळे मला बऱ्यावाईटामधील फरक समजेल. त्याखेरीज तुझ्या एवढ्या लोकांचा न्याय करणे कोणास शक्य आहे?” शलमोनाने हा वर मागितला याचा परमेश्वरास फार आनंद झाला म्हणून देव त्यास म्हणाला, “तू स्वत:साठी दीर्घायुष्य किंवा सुखसमृध्दी मागितली नाहीस. तसेच शत्रूंचा नि:पात व्हावा असे म्हणाला नाहीस. तू फक्त न्यायबुध्दी आणि विवेक याची मागणी केलीस. तेव्हा तुझे मागणे मी मान्य करतो. तुला ज्ञानी आणि शहाणपणाचे मन देतो, तुला एवढे शहाणपण लाभेल की तुझ्यासारखा भूतकाळात कधी झाला, नाही आणि पुढे कधी होणार नाही. आणखी तू जे मागीतले नाही तेही मी तुला देत आहे धन आणि वैभव ही तुला देत आहे. तुझ्या आयुष्यभर तुझ्यासारखा कोणी दुसरा राजा असणार नाही. जर तू माझ्या दाखवलेल्या मार्गांने चाललास आणि माझ्या आज्ञा आणि नियम पाळलेस, जसा तुझा पिता दावीद चालला, तर तुलाही मी दीर्घायुषी करीन.” शलमोन जागा झाला. परमेश्वर स्वप्नात येऊन आपल्याशी बोलला हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर शलमोन यरूशलेमेला जाऊन परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे उभा राहिला. शलमोनाने परमेश्वरासाठी होमार्पण केले. त्यामध्ये त्याने परमेश्वरास शांत्यर्पणे वाहिली. मग आपल्या सर्व सेवकांना मेजवानी दिली.
१ राजे 3:5-15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
गिबोन येथे त्या रात्री याहवेहने शलोमोनला स्वप्नात दर्शन दिले आणि परमेश्वर म्हणाले, “मी तुला जे काही द्यावे असे तुला वाटते ते माग.” शलोमोनने उत्तर दिले, “आपला सेवक, माझे पिता दावीदाला आपण अपार दया दाखविली होती, कारण ते आपल्याशी विश्वासू होते, व हृदयाने नीतिमान व सरळ होते. आपण त्यांच्यावरील ही अपार दया पुढे चालू ठेवून आज त्यांच्या राजासनावर बसण्यासाठी त्यांना एक पुत्र दिला. “तर आता हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, माझे पिता दावीदाच्या जागी आपण मला राजा केले आहे. परंतु मी एक लहान बालक आहे आणि माझ्या जबाबदाऱ्या मी कशा पार पाडाव्या हे मला कळत नाही. आपला सेवक तर आपण निवडलेल्या लोकांमध्ये आहे, जे इतके मोठे व अगणित आहेत. म्हणून आपल्या लोकांवर राज्य करण्यासाठी आणि बरे आणि वाईटाची पारख करण्यासाठी आपण आपल्या सेवकाला विवेकी हृदय द्यावे. कारण आपल्या या मोठ्या प्रजेवर कोण राज्य करू शकेल?” शलोमोनाने हे मागितल्याने प्रभू परमेश्वर प्रसन्न झाले. म्हणून परमेश्वराने त्याला म्हटले, “कारण तू तुझ्यासाठी दीर्घायुष्य किंवा संपत्ती किंवा तुझ्या शत्रूंचा नाश हे न मागता न्याय करण्यासाठी विवेक मागितला आहे, त्यामुळे तू जे मागितले आहेस ते मी करेन. मी तुला ज्ञानी व विवेकी हृदय देईन, म्हणजे तुझ्यासारखा पूर्वी कधी कोणी नव्हता, ना कधी असेल. याशिवाय, तू जे मागितले नाहीस ते म्हणजे संपत्ती आणि सन्मान हे देखील मी तुला देईन; आणि तुझ्या आयुष्याच्या दिवसांत राजांमध्ये तुझ्यासमान कोणीही नसेल. आणि तुझा पिता दावीद करीत असे त्याचप्रमाणे जर तू माझ्या आज्ञेनुसार चालून माझे नियम आणि विधी पाळशील, तर मी तुला दीर्घायुष्य देईन.” नंतर शलोमोन जागा झाला; आणि त्याला कळले की ते एक स्वप्न होते. तो यरुशलेमास गेला आणि प्रभू परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे उभे राहून होमार्पणे व शांत्यर्पणे अर्पण केली. नंतर त्याने आपल्या दरबारात मोठी मेजवानी दिली.
१ राजे 3:5-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
गिबोन येथे परमेश्वराने रात्री स्वप्नात शलमोनाला दर्शन दिले; देवाने त्याला म्हटले, “तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन.” शलमोन म्हणाला, “तुझा सेवक माझा बाप दावीद ह्याच्यावर तुझी मोठी दया असे; तो तुझ्यासमोर तुझ्याशी सत्याने, नीतीने व सरळ चित्ताने वागला. तुझ्याजवळ त्याच्याप्रीत्यर्थ दयेचा एवढा ठेवा होता की त्याच्या गादीवर बसायला त्याला तू पुत्र दिलास; वस्तुस्थितीही अशीच आहे. आता हे माझ्या देवा परमेश्वरा, तू आपल्या सेवकाला माझा बाप दावीद ह्याच्या जागी राजा केले आहे, पण मी तर केवळ लहान मूल आहे; चालचलणूक कशी ठेवावी ते मला कळत नाही. तसेच तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे; त्या लोकांचा एवढा समुदाय आहे की ते असंख्य व अगणित आहेत. ह्यास्तव आपल्या सेवकाला तुझ्या लोकांचा न्याय करण्यासाठी सावधान चित्त दे म्हणजे मला बर्यावाइटाचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे?” शलमोनाने हा वर मागितला म्हणून त्याच्या ह्या भाषणाने प्रभू त्याच्यावर प्रसन्न झाला. देव त्याला म्हणाला, “तू असला वर मागितलास; दीर्घायुष्य, धन, आपल्या शत्रूंचा नाश ह्यांपैकी काही न मागता तू न्याय करण्याची विवेकबुद्धी मागितलीस, म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो; मी तुला बुद्धिमान व विवेकी चित्त देतो; तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही व पुढे होणार नाही. एवढेच नव्हे तर तू मागितला नाहीस असा आणखी एक वर तुला देतो; धन आणि वैभव हे तुला देतो; तुझ्या सर्व आयुष्यात सर्व राजांमध्ये तुझ्यासमान कोणी असणार नाही. तू आपला बाप दावीद ह्याच्याप्रमाणे माझ्या मार्गांनी चालून माझे नियम व माझ्या आज्ञा पाळशील तर मी तुझ्या आयुष्याची वृद्धी करीन.” शलमोन जागा झाला तेव्हा आपल्याला स्वप्न पडले असे त्याला समजले; मग यरुशलेमेला जाऊन त्याने परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे उभे राहून होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली व आपल्या सर्व सेवकांना मेजवानी दिली.