YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 राजे 3:5-15

1 राजे 3:5-15 IRVMAR

शलमोन गिबोन येथे असतानाच परमेश्वराने एका रात्री त्यास स्वप्नात दर्शन दिले तो म्हणाला, माग! “तुला काय हवे ते माग मी ते देईन.” तेव्हा शलमोन म्हणाला, “तुझा सेवक म्हणजेच माझे वडिल दावीद यांच्यावर तुझी कृपा होती. ते तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागले. ते विश्वासूपणाने आणि न्यायाने वागले. त्यानंतर आज त्याच्या मुलालाच गादीवर बसवून तू तुझ्या महान कराराबद्दल मोठाच दयाळूपणा दाखवला आहेस. माझे वडिल दावीदानंतर, परमेश्वर देवा, तू मला राजा केले आहेस. पण मी लहान मुलासारखाच आहे. मला बाहेर जायला व आत यायला समजत नाही. तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे, त्यांचा जमाव मोठा आहे ते असंख्य व अगणित आहेत. म्हणून तुझ्या सेवकास लोकांचा न्याय करण्यास शहाणपणाचे मन दे, त्यामुळे मला बऱ्यावाईटामधील फरक समजेल. त्याखेरीज तुझ्या एवढ्या लोकांचा न्याय करणे कोणास शक्य आहे?” शलमोनाने हा वर मागितला याचा परमेश्वरास फार आनंद झाला म्हणून देव त्यास म्हणाला, “तू स्वत:साठी दीर्घायुष्य किंवा सुखसमृध्दी मागितली नाहीस. तसेच शत्रूंचा नि:पात व्हावा असे म्हणाला नाहीस. तू फक्त न्यायबुध्दी आणि विवेक याची मागणी केलीस. तेव्हा तुझे मागणे मी मान्य करतो. तुला ज्ञानी आणि शहाणपणाचे मन देतो, तुला एवढे शहाणपण लाभेल की तुझ्यासारखा भूतकाळात कधी झाला, नाही आणि पुढे कधी होणार नाही. आणखी तू जे मागीतले नाही तेही मी तुला देत आहे धन आणि वैभव ही तुला देत आहे. तुझ्या आयुष्यभर तुझ्यासारखा कोणी दुसरा राजा असणार नाही. जर तू माझ्या दाखवलेल्या मार्गांने चाललास आणि माझ्या आज्ञा आणि नियम पाळलेस, जसा तुझा पिता दावीद चालला, तर तुलाही मी दीर्घायुषी करीन.” शलमोन जागा झाला. परमेश्वर स्वप्नात येऊन आपल्याशी बोलला हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर शलमोन यरूशलेमेला जाऊन परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे उभा राहिला. शलमोनाने परमेश्वरासाठी होमार्पण केले. त्यामध्ये त्याने परमेश्वरास शांत्यर्पणे वाहिली. मग आपल्या सर्व सेवकांना मेजवानी दिली.