YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 राजे 3

3
शलोमोन ज्ञान मागतो
1शलोमोनने इजिप्तचा राजा फारोह याच्याशी सोयरीक केली व त्याच्या कन्येशी विवाह केला. त्याने तिला दावीदाच्या शहरात आणले आणि आपला राजवाडा, याहवेहचे मंदिर, यरुशलेमच्या सभोवतीचा कोट बांधून होईपर्यंत त्याने तिला तिथेच ठेवले. 2तथापि लोक अजूनही उच्च स्थानावर आपली यज्ञार्पणे करीत असत. कारण याहवेहच्या नावाचे मंदिर अजून बांधून झाले नव्हते. 3उच्च स्थानावर जाऊन यज्ञार्पणे करणे व धूप जाळणे, याशिवाय आपला पिता दावीदाने दिलेल्या सूचनांनुसार शलोमोन चालला व त्याने याहवेहवरील त्याची प्रीती व्यक्त केली.
4राजा गिबोन येथे यज्ञ करावयाला गेले, कारण ते सर्वात महत्त्वाचे उच्च स्थान होते आणि शलोमोनने त्या वेदीवर एक हजार होमार्पणे सादर केली. 5गिबोन येथे त्या रात्री याहवेहने शलोमोनला स्वप्नात दर्शन दिले आणि परमेश्वर म्हणाले, “मी तुला जे काही द्यावे असे तुला वाटते ते माग.”
6शलोमोनने उत्तर दिले, “आपला सेवक, माझे पिता दावीदाला आपण अपार दया दाखविली होती, कारण ते आपल्याशी विश्वासू होते, व हृदयाने नीतिमान व सरळ होते. आपण त्यांच्यावरील ही अपार दया पुढे चालू ठेवून आज त्यांच्या राजासनावर बसण्यासाठी त्यांना एक पुत्र दिला.
7“तर आता हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, माझे पिता दावीदाच्या जागी आपण मला राजा केले आहे. परंतु मी एक लहान बालक आहे आणि माझ्या जबाबदाऱ्या मी कशा पार पाडाव्या हे मला कळत नाही. 8आपला सेवक तर आपण निवडलेल्या लोकांमध्ये आहे, जे इतके मोठे व अगणित आहेत. 9म्हणून आपल्या लोकांवर राज्य करण्यासाठी आणि बरे आणि वाईटाची पारख करण्यासाठी आपण आपल्या सेवकाला विवेकी हृदय द्यावे. कारण आपल्या या मोठ्या प्रजेवर कोण राज्य करू शकेल?”
10शलोमोनाने हे मागितल्याने प्रभू परमेश्वर प्रसन्न झाले. 11म्हणून परमेश्वराने त्याला म्हटले, “कारण तू तुझ्यासाठी दीर्घायुष्य किंवा संपत्ती किंवा तुझ्या शत्रूंचा नाश हे न मागता न्याय करण्यासाठी विवेक मागितला आहे, 12त्यामुळे तू जे मागितले आहेस ते मी करेन. मी तुला ज्ञानी व विवेकी हृदय देईन, म्हणजे तुझ्यासारखा पूर्वी कधी कोणी नव्हता, ना कधी असेल. 13याशिवाय, तू जे मागितले नाहीस ते म्हणजे संपत्ती आणि सन्मान हे देखील मी तुला देईन; आणि तुझ्या आयुष्याच्या दिवसांत राजांमध्ये तुझ्यासमान कोणीही नसेल. 14आणि तुझा पिता दावीद करीत असे त्याचप्रमाणे जर तू माझ्या आज्ञेनुसार चालून माझे नियम आणि विधी पाळशील, तर मी तुला दीर्घायुष्य देईन.” 15नंतर शलोमोन जागा झाला; आणि त्याला कळले की ते एक स्वप्न होते.
तो यरुशलेमास गेला आणि प्रभू परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे उभे राहून होमार्पणे व शांत्यर्पणे अर्पण केली. नंतर त्याने आपल्या दरबारात मोठी मेजवानी दिली.
एक सुज्ञ न्याय
16आता दोन वेश्या राजाकडे येऊन त्यांच्यासमोर उभ्या राहिल्या. 17त्यांच्यापैकी एक म्हणाली, “माझे स्वामी, मला क्षमा करा. ही स्त्री आणि मी एकाच घरात राहतो आणि ती माझ्यासोबत असताना मला एक मूल झाले. 18माझे मूल जन्मल्यानंतर तिसऱ्या दिवशी, या स्त्रीला सुद्धा एक मूल झाले. आम्ही एकट्याच होतो; घरात आम्हा दोघींशिवाय अन्य कोणी नव्हते.
19“रात्रीच्या वेळी या स्त्रीचे मूल मरण पावले, कारण ती त्याच्या अंगावर झोपली. 20तेव्हा ती मध्यरात्री उठली आणि मी आपली दासी झोपेतच असताना माझ्याजवळ झोपलेले माझे मूल तिने घेतले आणि तिने ते तिच्या उराशी ठेवले व तिचे मेलेले मूल माझ्या उराशी ठेवले. 21सकाळी मी माझ्या मुलाला दूध पाजण्यासाठी उठले; आणि तो मेलेला होता! परंतु दिवसाच्या उजेडात जेव्हा मी त्याला निरखून पाहिले, तेव्हा मला समजले की मी ज्याला जन्म दिला तो हा नव्हे.”
22दुसरी स्त्री म्हणाली, “जिवंत असलेला मुलगा माझा आहे; मेलेला तुझा आहे.”
परंतु पहिलीने हट्ट केला, “नाही! मेलेला तुझा आहे; जिवंत माझा आहे.” असा त्यांनी राजासमोर वादविवाद केला.
23राजाने म्हटले, “एक म्हणते, ‘माझा मुलगा जिवंत आहे आणि तुझा मुलगा मेला आहे,’ तर दुसरी म्हणते, ‘नाही! तुझा मुलगा मेला आहे आणि माझा जिवंत आहे.’ ”
24तेव्हा राजाने म्हटले, “मला एक तलवार आणून द्या.” तेव्हा त्यांनी राजासाठी तलवार आणली. 25नंतर राजाने आज्ञा केली: “जिवंत मुलाचे कापून दोन तुकडे करा आणि अर्धा भाग एकीला आणि अर्धा भाग दुसरीला द्यावा.”
26ज्या स्त्रीचा जिवंत मुलगा होता तिचे हृदय तिच्या मुलासाठी ममतेने तुटले आणि ती राजाला म्हणाली, “माझे स्वामी, कृपा करून जिवंत मुलगा तिला द्या! त्याला मारू नका!”
परंतु दुसरी म्हणाली, “तो ना तुला ना मला मिळणार. त्याचे दोन तुकडे करा!”
27तेव्हा राजाने आपला न्याय दिला: “मूल पहिल्या स्त्रीला द्या. त्याला मारू नका; तीच त्याची आई आहे.”
28राजाने दिलेला हा न्याय जेव्हा सर्व इस्राएलने ऐकला, तेव्हा त्यांना राजाचा आदर वाटू लागला, कारण त्यांनी पाहिले की न्याय देण्यासाठी राजाला परमेश्वराकडून ज्ञान प्राप्त झाले आहे.

सध्या निवडलेले:

1 राजे 3: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन