YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 18:20-40

१ राजे 18:20-40 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तेव्हा, सर्व इस्राएलींना आणि संदेष्ट्यांना अहाबाने निरोप पाठवून कर्मेल पर्वतावर बोलावून घेतले. तेव्हा एलीया सर्व लोकांजवळ येऊन म्हणाला, “तुम्ही कोठवर आपले मन बदलत राहणार? जर परमेश्वर खरा देव असेल तर त्यास अनुसरा. पण बआल खरा देव असेल तर त्यास अनुसरा.” लोक यावर एका शब्दानेही त्यास उत्तर देऊ शकले नाही. मग एलीया लोकांस म्हणाला, “मी, मीच फक्त परमेश्वराचा संदेष्टा असा राहलो आहे, पण बआलाचे चारशेपन्नास संदेष्टे आहेत. तेव्हा त्यांनी आम्हांला दोन गोऱ्हे द्यावे, त्यांनी आपणासाठी त्यातून एक गोऱ्हा निवडून त्याचे तुकडे करावे व लाकडे रचून त्यावर ठेवावे, मात्र त्याखाली विस्तव पेटवू नये. मग मी दुसरा गोऱ्हा तयार करून ठेवीन व विस्तव लावणार नाही. तेव्हा तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या व मी परमेश्वराचे नाव घेईन, आणि जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच खरा देव.” तेव्हा सर्व लोकांनी उत्तर देऊन म्हटले, “हे चांगले आहे.” मग एलीया बआलाच्या संदेष्ट्यांना म्हणाला, “तुम्ही बरेचजण आहात, तेव्हा पहिल्याने तुम्ही आपणासाठी एक गोऱ्हा निवडून घेऊन तयार करा आणि विस्तव न लावता आपल्या देवाचे नाव घ्या.” तेव्हा त्यांना दिलेला गोऱ्हा त्यांनी घेऊन तयार केला, आणि सकाळ पासून दुपारपर्यंत त्यांनी बआलाचे नाव घेऊन त्यास हाक मारून म्हटले, “हे बाला, आमच्या हाकेला उत्तर दे.” पण कसलीही वाणी नव्हती आणि उत्तर देणाराही कोणी नव्हता. जी वेदी त्यांनी बांधली होती तिच्या भोवती ते नाचू लागले. दुपारी एलीया त्यांची थट्टा करायला लागला. तो त्यांना म्हणाला, “बाल खरच देव असेल तर तुम्ही आणखी मोठ्याने प्रार्थना करा. कदाचित् तो अजून विचारात असेल. किंवा कदाचित् कामात गुंतलेला असेल. एखादयावेळी प्रवासात किंवा झोपेत असले. तेव्हा आणखी मोठ्याने प्रार्थना करून त्यास उठवा.” तेव्हा त्या संदेष्ट्यांनी मोठमोठ्याने प्रार्थना केली. भाल्यांनी आणि सुऱ्यांनी स्वत:वर वार करून घेतले. (ही त्यांची पूजेची पध्दत होती) त्यांचे अंग रक्ताळले. दुपार उलटली पण लाकडे पेटली नाहीत. संध्याकाळच्या यज्ञाची वेळ होत आली तोपर्यंत ते भविष्य सांगत होते. पण काहीही घडले नाही बालाकडून प्रतिसाद मिळाला नाही. कुठलाही आवाज आला नाही. कारण ऐकणारेच कोणी नव्हते! मग एलीया सर्व लोकांस उद्देशून म्हणाला, “आता सगळे माझ्याजवळ या.” तेव्हा सगळे त्याच्याभोवती जमले. परमेश्वराच्या वेदीची मोडतोड झालेली होती. तेव्हा एलीयाने आधी ते सर्व नीट केले. एलीयाने बारा दगड घेतले. प्रत्येकाच्या नावाचा एकेक याप्रमाणे बारा वंशांचे ते बारा दगड होते. याकोबाच्या बारा मुलांच्या नावाचे ते वंश होते. याकोबालाच परमेश्वराने इस्राएल या नावाने संबोधले होते. परमेश्वराच्या सन्मानार्थ हे दगड वेदीच्या डागडुजीसाठी एलीयाने वापरले. मग त्याने वेदीभोवती एक चर खणला. सात गंलन पाणी मावण्याइतकी त्याची खोली आणि रुंदी होती. एलीयाने मग वेदीवर लाकडे रचली. “गोऱ्हा कापला. त्याचे तुकडे लाकडावर ठेवले.” मग तो म्हणाला, “चार घागरी भरुन पाणी घ्या आणि ते मांसाच्या तुकड्यावर आणि खालच्या होमार्पणाच्या लाकडावर ओता.” ते झाल्यावर दुसऱ्यांदा आणि मग तिसऱ्यांदा त्याने तसेच करायला सांगितले. वेदीवरुन वाहात जाऊन ते पाणी खालच्या चरात साठले. दुपारच्या यज्ञाची वेळ झाली. तेव्हा संदेष्टा एलीया वेदीपाशी गेला आणि त्याने प्रार्थना केली, “परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्या देवा, तूच इस्राएलचा देव आहेस हे तू आता सिध्द करून दाखवावेस अशी माझी तुला विनंती आहे. हे सर्व तूच माझ्याकडून करवून घेतलेस हे यांना कळू दे. मी तुझा सेवक आहे हे ही कळू दे. हे परमेश्वरा, माझ्या विनवणीकडे लक्ष दे. तूच खरा परमेश्वर देव आहेस हे यांना दाखव. म्हणजे तू त्यांना पुन्हा स्वत:जवळ घेत आहेस हे त्यांना पटेल.” तेव्हा परमेश्वराने अग्नी पाठवला. यज्ञ, लाकडे, दगड, वेदीभोवतीची जमीन हे सर्व पेटले. भोवतीच्या चरातले पाणी सुध्दा त्या अग्नीने सुकून गेले. सर्वांच्या देखतच हे घडले. तेव्हा लोकांनी जमीनीवर पालथे पडून “परमेश्वर हाच देव आहे, परमेश्वर हाच देव आहे” असे म्हटले. एलीया म्हणाला, “त्या बआलाच्या संदेष्ट्यांना पकडून आणा. त्यांना निसटू देऊ नका” तेव्हा लोकांनी त्या सगळ्यांना धरले एलीयाने मग त्यांना किशोन झऱ्याजवळ नेले आणि तेथे सर्व संदेष्ट्यांची हत्या केली.

सामायिक करा
१ राजे 18 वाचा

१ राजे 18:20-40 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

म्हणून अहाबाने सर्व इस्राएली लोकांना बोलाविणे पाठवले आणि संदेष्ट्यांना कर्मेल डोंगरावर जमविले. एलीयाह लोकांच्या समोर जाऊन म्हणाला, “दोन मतांमध्ये तुम्ही कुठवर डगमगत राहणार? जर याहवेह हेच परमेश्वर आहे तर त्यांचे अनुसरण करा; परंतु जर बआल परमेश्वर आहे तर त्याला अनुसरा.” परंतु लोक काही बोलले नाही. मग एलीयाह त्यांना म्हणाला, “याहवेहचा संदेष्टा म्हणून मी एकटाच उरलो आहे, परंतु बआलाचे तर चारशे पन्नास संदेष्टे आहेत. आमच्यासाठी दोन बैल आणा. त्यातील एक बआलच्या संदेष्ट्यांनी त्यांच्यासाठी निवडावा आणि त्याचे तुकडे कापून ते लाकडांवर ठेवावे परंतु त्याला अग्नी लावू नये. मी दुसरा बैल तयार करेन आणि लाकडांवर ठेवेन आणि ते पेटविणार नाही. मग तुम्ही तुमच्या देवाचा धावा करा, आणि मी माझ्या याहवेहचा धावा करेन. मग जो देव अग्नीद्वारे उत्तर देईल; तोच खरा परमेश्वर.” मग लोक म्हणाले, “तू जे बोलतो ते बरोबर आहे.” एलीयाह बआलच्या संदेष्ट्यांना म्हणाला, “प्रथम तुम्ही बैल निवडून घ्या आणि तो तयार करा, कारण तुम्ही संख्येने अधिक आहात. तुमच्या देवाचा धावा करा, परंतु अग्नी लावू नये.” म्हणून त्यांना दिलेला बैल घेऊन त्यांनी तयार केला. मग त्यांनी सकाळपासून मध्यान्हापर्यंत बआलच्या नावाचा धावा केला. आणि ओरडत म्हणाले, “हे बआला, आम्हाला उत्तर दे!” परंतु काही प्रत्युत्तर आले नाही; कोणीही उत्तर दिले नाही. आणि जी वेदी त्यांनी केली होती त्याभोवती ते नाचत होते. मध्यान्हाच्या वेळी एलीयाह त्यांची थट्टा करीत म्हणू लागला, “अधिक मोठ्याने ओरडा, खचित तो देव आहे! कदाचित तो विचारात गढून गेला असेल किंवा व्यस्त किंवा प्रवास करीत असेल किंवा झोपला असेल आणि त्याला जागे केले पाहिजे.” म्हणून ते मोठ्याने ओरडू लागले आणि त्यांच्या प्रथेप्रमाणे तलवारी व भाल्यांनी रक्तबंबाळ होईपर्यंत स्वतःला घाव करू लागले. दुपार सरून गेली आणि संध्याकाळच्या यज्ञाच्या वेळेपर्यंत ते अजूनही वेड्यासारखे भविष्यवाणी करीत होते. परंतु काहीही प्रत्युत्तर आले नाही, कोणी काही बोलले नाही, कोणी लक्ष दिले नाही. तेव्हा एलीयाह सर्व लोकांना म्हणाला, “माझ्याजवळ या.” ते त्याच्याकडे आले आणि त्याने याहवेहची जी वेदी मोडून गेली होती ती दुरुस्त केली. “तुझे नाव इस्राएल असणार” असे याहवेहने ज्या याकोबाला म्हटले होते त्याच्या वंशजांच्या बारा गोत्रांइतके एलीयाहने बारा धोंडे घेतले. त्या धोंड्यांनी त्याने याहवेहच्या नावाने वेदी बांधली आणि वेदीभोवती दोन सिआह बीज मावेल इतकी मोठी खळगी खणली. त्याने लाकडे रचली, बैल कापून त्याचे तुकडे केले आणि त्या लाकडांवर रचले. मग तो त्यांना म्हणाला, “चार मोठ्या घागरी पाण्याने भरा आणि ते यज्ञावर व लाकडांवर ओता.” तो म्हणाला, “पुन्हा असेच करा.” आणि त्यांनी पुन्हा केले. त्याने आदेश दिला, “तिसर्‍यांदा असेच करा,” आणि त्यांनी तिसर्‍यांदाही होमार्पणावर पाणी टाकले. पाणी वेदीवरून खाली वाहू लागले आणि खळगी सुद्धा पाण्याने भरली. यज्ञाच्या वेळी, एलीयाह संदेष्टा पुढे आला आणि त्याने प्रार्थना केली: “हे याहवेह, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएलच्या परमेश्वरा, आज हे जाहीर होवो की इस्राएलमध्ये केवळ तुम्हीच परमेश्वर आहात आणि मी तुमचा सेवक असून या सर्व गोष्टी मी आपल्या आज्ञेनुसार केल्या आहेत. मला उत्तर द्या, हे याहवेह, मला उत्तर द्या, म्हणजे या लोकांना समजेल, याहवेह, तुम्हीच परमेश्वर आहे आणि आपणच त्यांची मने परत वळवित आहात.” तेव्हा याहवेहचा अग्नी आला आणि होमार्पण, लाकडे, धोंडे आणि माती भस्म करून टाकली आणि खळग्यातील पाणी चाटून टाकले. जेव्हा सर्व लोकांनी हे पाहिले, तेव्हा ते पालथे पडून रडू लागले, “याहवेह हेच परमेश्वर आहे! याहवेह हेच परमेश्वर आहे!” मग एलीयाहने त्यांना आज्ञा दिली, “बआलच्या संदेष्ट्यांना पकडा, कोणालाही जाऊ देऊ नका!” तेव्हा त्यांनी पकडले आणि एलीयाहने त्यांना खाली किशोन ओहळाकडे नेऊन त्यांचा वध केला.

सामायिक करा
१ राजे 18 वाचा

१ राजे 18:20-40 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा अहाबाने सर्व इस्राएल लोकांना बोलावणे पाठवले आणि संदेष्ट्यांना कर्मेल डोंगरावर जमवले. एलीया सर्व लोकांच्या सन्निध येऊन म्हणाला, “तुम्ही दोन्ही मतांमध्ये कोठवर लटपटाल? परमेश्वर हा देव असला तर त्याच्या भजनी लागा; बआल हा देव असला तर त्याच्या भजनी लागा.” लोकांनी त्याला एका शब्दानेही उत्तर दिले नाही. एलीया लोकांना म्हणाला, “परमेश्वराच्या संदेष्ट्यांपैकी मी एकटाच उरलो आहे; बआलाचे संदेष्टे तर साडेचारशे आहेत. आम्हांला दोन गोर्‍हे द्यावेत; त्यांनी आपल्यासाठी वाटेल तो गोर्‍हा घ्यावा; त्याचे त्यांनी कापून तुकडे करावेत आणि ते लाकडांवर रचावेत, पण त्यांना अग्नी लावू नये; मग मीही दुसर्‍या गोर्‍ह्याचे तसेच करून तो लाकडांवर रचीन व त्याला अग्नी लावणार नाही. तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या आणि मी परमेश्वराचे नाव घेतो; जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच देव ठरावा.” सर्व लोक म्हणाले, “ठीक आहे.” एलीया बआलाच्या संदेष्ट्यांना म्हणाला, “प्रथम तुम्ही वाटेल तो गोर्‍हा निवडून सिद्ध करा, कारण तुम्ही पुष्कळ जण आहात, तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या, पण अग्नी मात्र लावू नका.” मग त्यांना दिलेला गोर्‍हा त्यांनी सिद्ध केला आणि सकाळपासून थेट दोन प्रहरपर्यंत ते बआलाचे नाव घेत, “हे बआला, आमचे ऐक,” असे म्हणत राहिले; पण काही वाणी झाली नाही की कोणी उत्तर दिले नाही. जी वेदी त्यांनी केली होती तिच्याभोवती ते नाचूबागडू लागले. दोन प्रहरी एलीयाने त्यांची थट्टा करून म्हटले, “मोठ्याने पुकारा, देवच तो! तो विचारात गढून गेला असेल, तो एकान्तात गेला असेल, प्रवासात असेल, कदाचित तो निजला असेल, त्याला जागे केले पाहिजे.” ते मोठमोठ्याने हाका मारू लागले आणि आपल्या रिवाजाप्रमाणे सुर्‍यांनी व भाल्यांनी आपल्याला घाव करून घेऊ लागले, एवढे की ते रक्तबंबाळ झाले. दुपार टळून गेल्यावर संध्याकाळच्या यज्ञसमयापर्यंत ते बडबडत राहिले पण काही वाणी झाली नाही, कोणी उत्तर दिले नाही किंवा लक्ष पुरवले नाही. मग एलीया सर्व लोकांना म्हणाला, “माझ्याजवळ या”; तेव्हा सर्व लोक त्याच्याजवळ आले. परमेश्वराची वेदी पाडून टाकली होती ती त्याने दुरुस्त केली. ‘तुझे इस्राएल असे नाव पडेल’ असे याकोबाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले होते, त्याच्या वंशसंख्येइतके बारा धोंडे एलीयाने घेतले; त्या धोंड्यांची त्याने परमेश्वराच्या नावाने वेदी बांधली; आणि दोन मापे बी राहील एवढी खळगी त्याने वेदीसभोवार खणली. त्याने वेदीवर लाकडे ठेवली आणि गोर्‍हा कापून व तुकडे करून ते लाकडांवर रचले. मग तो म्हणाला, “चार घागरी पाणी भरून होमबलीवर व लाकडांवर ओता.” तो पुन्हा म्हणाला, “दुसर्‍यांदा तसेच करा”; तेव्हा लोकांनी दुसर्‍यांदा तसेच केले. तो म्हणाला, “तिसर्‍यांदा तसेच करा”; आणि त्यांनी तिसर्‍यांदा तसेच केले. पाणी वेदीवरून सभोवार वाहिले, आणि ती खळगीही पाण्याने भरली. संध्याकाळच्या यज्ञसमयी एलीया संदेष्टा पुढे होऊन म्हणाला, “हे परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक व इस्राएल ह्यांच्या देवा, इस्राएलामध्ये तूच देव आहेस, मी तुझा सेवक आहे, आणि मी ह्या सर्व गोष्टी तुझ्याच आज्ञेने केल्या आहेत हे सर्वांना कळू दे. हे परमेश्वरा, ऐक, माझी विनंती ऐक; हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तूच ह्यांची हृदये मागे फिरवली आहेस, ह्याची ह्या लोकांना जाणीव होऊ दे.” तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होमबली, लाकडे, धोंडे आणि माती भस्म करून टाकली आणि त्या खळगीतले पाणी चाटले. हे पाहून सर्व लोक पालथे पडून म्हणाले, “परमेश्वर हाच देव! परमेश्वर हाच देव!” एलीया त्यांना म्हणाला, “बआलाच्या संदेष्ट्यांना पकडा; त्यांच्यातल्या एकालाही निसटून जाऊ देऊ नका.” तेव्हा त्यांनी त्यांना पकडले; एलीयाने त्यांना खाली किशोन ओहळानजीक आणून वधले.

सामायिक करा
१ राजे 18 वाचा