YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 राजे 18:20-40

1 राजे 18:20-40 MRCV

म्हणून अहाबाने सर्व इस्राएली लोकांना बोलाविणे पाठवले आणि संदेष्ट्यांना कर्मेल डोंगरावर जमविले. एलीयाह लोकांच्या समोर जाऊन म्हणाला, “दोन मतांमध्ये तुम्ही कुठवर डगमगत राहणार? जर याहवेह हेच परमेश्वर आहे तर त्यांचे अनुसरण करा; परंतु जर बआल परमेश्वर आहे तर त्याला अनुसरा.” परंतु लोक काही बोलले नाही. मग एलीयाह त्यांना म्हणाला, “याहवेहचा संदेष्टा म्हणून मी एकटाच उरलो आहे, परंतु बआलाचे तर चारशे पन्नास संदेष्टे आहेत. आमच्यासाठी दोन बैल आणा. त्यातील एक बआलच्या संदेष्ट्यांनी त्यांच्यासाठी निवडावा आणि त्याचे तुकडे कापून ते लाकडांवर ठेवावे परंतु त्याला अग्नी लावू नये. मी दुसरा बैल तयार करेन आणि लाकडांवर ठेवेन आणि ते पेटविणार नाही. मग तुम्ही तुमच्या देवाचा धावा करा, आणि मी माझ्या याहवेहचा धावा करेन. मग जो देव अग्नीद्वारे उत्तर देईल; तोच खरा परमेश्वर.” मग लोक म्हणाले, “तू जे बोलतो ते बरोबर आहे.” एलीयाह बआलच्या संदेष्ट्यांना म्हणाला, “प्रथम तुम्ही बैल निवडून घ्या आणि तो तयार करा, कारण तुम्ही संख्येने अधिक आहात. तुमच्या देवाचा धावा करा, परंतु अग्नी लावू नये.” म्हणून त्यांना दिलेला बैल घेऊन त्यांनी तयार केला. मग त्यांनी सकाळपासून मध्यान्हापर्यंत बआलच्या नावाचा धावा केला. आणि ओरडत म्हणाले, “हे बआला, आम्हाला उत्तर दे!” परंतु काही प्रत्युत्तर आले नाही; कोणीही उत्तर दिले नाही. आणि जी वेदी त्यांनी केली होती त्याभोवती ते नाचत होते. मध्यान्हाच्या वेळी एलीयाह त्यांची थट्टा करीत म्हणू लागला, “अधिक मोठ्याने ओरडा, खचित तो देव आहे! कदाचित तो विचारात गढून गेला असेल किंवा व्यस्त किंवा प्रवास करीत असेल किंवा झोपला असेल आणि त्याला जागे केले पाहिजे.” म्हणून ते मोठ्याने ओरडू लागले आणि त्यांच्या प्रथेप्रमाणे तलवारी व भाल्यांनी रक्तबंबाळ होईपर्यंत स्वतःला घाव करू लागले. दुपार सरून गेली आणि संध्याकाळच्या यज्ञाच्या वेळेपर्यंत ते अजूनही वेड्यासारखे भविष्यवाणी करीत होते. परंतु काहीही प्रत्युत्तर आले नाही, कोणी काही बोलले नाही, कोणी लक्ष दिले नाही. तेव्हा एलीयाह सर्व लोकांना म्हणाला, “माझ्याजवळ या.” ते त्याच्याकडे आले आणि त्याने याहवेहची जी वेदी मोडून गेली होती ती दुरुस्त केली. “तुझे नाव इस्राएल असणार” असे याहवेहने ज्या याकोबाला म्हटले होते त्याच्या वंशजांच्या बारा गोत्रांइतके एलीयाहने बारा धोंडे घेतले. त्या धोंड्यांनी त्याने याहवेहच्या नावाने वेदी बांधली आणि वेदीभोवती दोन सिआह बीज मावेल इतकी मोठी खळगी खणली. त्याने लाकडे रचली, बैल कापून त्याचे तुकडे केले आणि त्या लाकडांवर रचले. मग तो त्यांना म्हणाला, “चार मोठ्या घागरी पाण्याने भरा आणि ते यज्ञावर व लाकडांवर ओता.” तो म्हणाला, “पुन्हा असेच करा.” आणि त्यांनी पुन्हा केले. त्याने आदेश दिला, “तिसर्‍यांदा असेच करा,” आणि त्यांनी तिसर्‍यांदाही होमार्पणावर पाणी टाकले. पाणी वेदीवरून खाली वाहू लागले आणि खळगी सुद्धा पाण्याने भरली. यज्ञाच्या वेळी, एलीयाह संदेष्टा पुढे आला आणि त्याने प्रार्थना केली: “हे याहवेह, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएलच्या परमेश्वरा, आज हे जाहीर होवो की इस्राएलमध्ये केवळ तुम्हीच परमेश्वर आहात आणि मी तुमचा सेवक असून या सर्व गोष्टी मी आपल्या आज्ञेनुसार केल्या आहेत. मला उत्तर द्या, हे याहवेह, मला उत्तर द्या, म्हणजे या लोकांना समजेल, याहवेह, तुम्हीच परमेश्वर आहे आणि आपणच त्यांची मने परत वळवित आहात.” तेव्हा याहवेहचा अग्नी आला आणि होमार्पण, लाकडे, धोंडे आणि माती भस्म करून टाकली आणि खळग्यातील पाणी चाटून टाकले. जेव्हा सर्व लोकांनी हे पाहिले, तेव्हा ते पालथे पडून रडू लागले, “याहवेह हेच परमेश्वर आहे! याहवेह हेच परमेश्वर आहे!” मग एलीयाहने त्यांना आज्ञा दिली, “बआलच्या संदेष्ट्यांना पकडा, कोणालाही जाऊ देऊ नका!” तेव्हा त्यांनी पकडले आणि एलीयाहने त्यांना खाली किशोन ओहळाकडे नेऊन त्यांचा वध केला.

1 राजे 18 वाचा