1 योहान 3:1-18
1 योहान 3:1-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात देव पित्याने आपल्याला केवढे प्रीतीदान दिले आहे पाहा आणि आपण तसे आहोत ह्यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही कारण त्यांनी त्यास ओळखले नाही. प्रियांनो, आता आम्ही देवाची मुले आहोत आणि भविष्यकाळात आम्ही कसे असू हे आम्हास माहीत नाही. तरीही आम्हास माहीत आहे की, जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल, तेव्हा आम्ही त्याच्यासारखे असू, कारण तो जसा आहे तसे आम्ही त्यास पाहू. आणि ज्या प्रत्येकाने ही आशा ख्रिस्तावर ठेवली आहे, जसा ख्रिस्त शुद्ध आहे, तसा तो आपणाला शुद्ध करतो. प्रत्येकजण जो पाप करतो तो नियमशास्त्राचे उल्लंघन करतो कारण पाप हे नियमशास्त्राचे उल्लंघन आहे. तुम्हास माहीत आहे की, पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला; त्याच्याठायी पाप नाही. जो कोणी त्याच्याठायी राहतो तो पाप करीत नाही. जो कोणी पाप करीतो त्याने त्यास पाहिले नाही आणि त्यास ओळखलेही नाही. प्रिय मुलांनो, तुम्हास कोणी फसवू नये. तो जसा नीतिमान आहे तसा ख्रिस्त नीतीने चालणाराही न्यायसंपन्न आहे. जो पाप करतो तो सैतानाचा आहे कारण सैतान आरंभापासून पाप करीत आहे आणि सैतानाची कामे नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही कारण त्याचे बीज त्यांच्यामध्ये राहते. त्यामुळे तो पापात राहू शकत नाही कारण तो देवापासून जन्मला आहे. ह्यावरून देवाची मुले व जी सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतिमत्त्वाने वागत नाही तो देवाचा नाही व जो आपल्या भावावर प्रीती करीत नाही तोही नाही. आपण एकमेकांवर प्रीती करावी, हा संदेश आपण आरंभापासून ऐकला तो हाच आहे. काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या भावाचा वध केला त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काइनाची कृत्ये दुष्ट होती आणि तर त्याच्या भावाची कृत्ये न्यायी होती. बंधूनो, जर जग तुमचा द्वेष करते तर त्याचे आश्चर्य मानू नका. आपल्याला माहीत आहे की, आपण मरणातून जीवनात गेलो आहोत कारण आपण आपल्या बंधूवर प्रीती करतो. जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो. जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करतो, तो खुनी आहे आणि तुम्हास माहीत आहे की, खुनी मनुष्याच्या ठायी सार्वकालिक जीवन राहत नाही. ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला. यामुळे प्रीती काय आहे ते आपल्याला समजते. म्हणून आपणदेखील आपल्या भावासाठी जीव दिला पाहिजे. जर कोणाजवळ जगिक संपत्ती आहे आणि त्याचा भाऊ गरजवंत आहे हे पाहूनही त्याच्यावर दया करीत नाही तर त्याच्यामध्ये देवाची प्रीती राहते कसे म्हणू शकतो? प्रिय मुलांनो, आपण शब्दाने किंवा जीभेने नव्हे, तर कृतीने व खरेपणाने प्रीती करावी.
1 योहान 3:1-18 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पित्याने आपणावर किती अगाध प्रीतीचा वर्षाव केला आहे व आपण परमेश्वराची लेकरे म्हणून संबोधले जावे म्हणून पित्याने आपणावर अगाध प्रीतीचा मोठा वर्षाव केला आहे आणि आपण तसे आहोतच. जग आपल्याला ओळखीत नाही कारण जगाने त्यांना ओळखले नाही. प्रिय मित्रांनो, आपण आता परमेश्वराची मुले आहोत आणि आपण पुढे काय होऊ हे अजून आपल्याला झालेले नाही. परंतु जेव्हा ख्रिस्त प्रकट होतील तेव्हा जसे ख्रिस्त आहे तसे आपण होणार, कारण जसे ते आहेत तसेच आपण त्यांना पाहू. ज्यांना त्यांच्यामध्ये अशी आशा आहे ते स्वतःला शुद्ध करतात, जसे ते शुद्ध आहेत. प्रत्येकजण जे पाप करतात ते नियम मोडतात; खरेतर नियमांचे पालन न करणे हे पाप आहे. परंतु तुम्हाला हे माहीत आहे की, आपली पापे दूर करावी म्हणून ख्रिस्त प्रकट झाले. त्यांच्यामध्ये कसलेही पाप नाही. जे कोणी त्यांच्यामध्ये राहतात ते पाप करीत राहत नाही. जे कोणी पाप करीत राहतात त्यांनी ख्रिस्ताला पाहिलेले नाही किंवा त्यांना ओळखले नाही. अहो प्रिय मुलांनो, कोणी तुम्हाला बहकवू नये. जसे ख्रिस्त नीतिमान आहेत, तसेच जे कोणी योग्य ते करतात ते नीतिमान आहेत. जे कोणी पापमय गोष्टी करतो ते सैतानापासून आहे, कारण सैतान प्रारंभापासूनच पाप करीत आला आहे. परंतु सैतानाची कृत्ये नष्ट करावी म्हणून परमेश्वराचे पुत्र प्रकट झाले. ज्यांचा जन्म परमेश्वरापासून झाला आहे, ते पाप करीत राहत नाही, कारण त्यांच्याठायी परमेश्वराचे बीज राहते; म्हणून पाप करीत राहणे त्याला अशक्यच असते, कारण त्यांचा जन्म परमेश्वरापासून झाला आहे. यावरून आपल्याला परमेश्वराची मुले कोणती आणि सैतानाची मुले कोणती, हे ओळखता येते. जे कोणी जे योग्य आहे ते करीत नाही ते परमेश्वराचे लेकरे नाहीत, किंवा जे कोणी आपल्या भावावर आणि बहिणीवर प्रीती करीत नाही ते सुद्धा परमेश्वरापासून नाहीत. कारण आपण एकमेकांवर प्रीती करावी हाच संदेश तुम्ही सुरुवातीपासून ऐकला आहे. आपण काइनासारखे होऊ नये, कारण तो सैतानाचा होता व त्याने आपल्या भावाचा वध केला. त्याने त्याचा वध का केला? कारण काईनाच्या कृती वाईट होत्या आणि त्याच्या भावाच्या कृत्ये नीतियुक्त होती. म्हणून प्रिय बंधुंनो आणि भगिनींनो जगाने तुमचा द्वेष केला, तर आश्चर्य करू नका. आपल्याला माहीत आहे की आपण मरणातून जीवनात पार गेलो आहोत कारण आपण एकमेकांवर प्रीती करतो. जे कोणी प्रीती करीत नाही ते मरणामध्येच राहतात. जे कोणी भावाचा आणि बहिणीचा द्वेष करतात ते खुनी आहेत आणि तुम्हाला माहीत आहे की, कोणत्याही खुनी व्यक्तिमध्ये सार्वकालिक जीवन राहत नाही. प्रीती काय आहे हे यावरून आपल्याला समजते की, येशू ख्रिस्ताने त्यांचे जीवन आपल्यासाठी दिले आणि म्हणून आपणही आपल्या भावांसाठी आणि बहिणींसाठी आपले जीवन दिले पाहिजे. जर कोणाजवळ भौतिक संपत्ती असेल आणि तो पाहतो की त्याचा भाऊ किंवा बहीण गरजेत आहे परंतु त्याला त्यांची दया येत नाही, तर अशा व्यक्तिमध्ये परमेश्वराची प्रीती कशी असू शकेल? प्रिय लेकरांनो, आपण शब्दांनी किंवा कोरड्या बोलण्याने प्रीती करू नये, परंतु कृतीने आणि सत्याने प्रीती करावी.
1 योहान 3:1-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पाहा; आणि आपण तसे आहोतच. ह्यामुळे जग आपल्याला ओळखत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. प्रियजनहो, आपण आता देवाची मुले आहोत; आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही; तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. जो कोणी त्याच्यासंबंधाने ही आशा बाळगतो तो, जसा तो शुद्ध आहे, तसे आपणाला शुद्ध करतो. जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो; कारण पाप स्वैराचार आहे. तुम्हांला माहीत आहे की, आपली पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला; त्याच्या ठायी पाप नाही. जो कोणी त्याच्या ठायी राहतो तो पाप करत नाही; जो कोणी पाप करतो त्याने त्याला पाहिले नाही व त्याला ओळखलेही नाही. मुलांनो, कोणी तुम्हांला बहकवू नये; जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने चालणाराही नीतिमान आहे. पाप करणारा सैतानाचा आहे; कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही; कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते; त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे. ह्यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तोही नाही. जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला तो हाच आहे की, आपण एकमेकांवर प्रीती करावी. काइन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला, त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काइनाची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती. बंधूंनो, जग तुमचा द्वेष करते ह्याचे आश्चर्य मानू नका. आपण बंधुजनांवर प्रीती करतो ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो. जो कोणी आपल्या बंधूंचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे; आणि कोणाही नरहिंसकाच्या ठायी सार्वकालिक जीवन राहत नाही, हे तुम्हांला माहीत आहे. ख्रिस्ताने आपल्याकरता स्वतःचा प्राण अर्पण केला ह्यावरून आपल्याला देवाच्या प्रीतीची जाणीव झाली आहे; तेव्हा आपणही आपल्या बंधूकरता स्वतःचा प्राण अर्पण केला पाहिजे. मग जवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वत:ला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्या ठायी देवाची प्रीती कशी राहणार? मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे, तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी.
1 योहान 3:1-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले, ह्यात पित्याने आपल्याला प्रीती हे केवढे दान दिले आहे पाहा आणि आपण तसे आहोतच. ह्यामुळे जग आपल्याला ओळखत नाही, कारण त्याने देवाला ओळखले नाही. प्रियजनहो, आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ, हे अजून स्पष्ट झालेले नाही, परंतु तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ, हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे, तसाच तो आपल्याला दिसेल. जो कोणी त्यासंबंधाने आशा बाळगतो तो, ख्रिस्त जसा शुद्ध आहे, तसे स्वतःला शुद्ध राखतो. जो कोणी पाप करतो, तो स्वैराचार करतो, कारण पाप स्वैराचार आहे. तुम्हांला माहीत आहे की, पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला आणि त्याच्यामध्ये पाप नाही. जो कोणी त्याच्यामध्ये राहतो, तो पाप करत नाही, जो कोणी पाप करतो, त्याने त्याला पाहिले नाही व त्याला ओळखलेही नाही. मुलांनो, कोणी तुम्हांला बहकवू नये! जसा तो नीतिमान आहे, तसा नीतीने चालणाराही नीतिमान आहे. पाप करणारा सैतानच आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे, तो पाप करत नाही, कारण देवाचे बीज त्याच्यामध्ये राहते. तो पाप करू शकत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे. ह्यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही, तो देवाचा नाही आणि जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तोही नाही. जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला, तो हाच आहे की, आपण एकमेकांवर प्रीती करावी. काइन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला, त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काइनची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची कृत्ये नीतीची होती. बंधूंनो, जग तुमचा द्वेष करते ह्याचे आश्चर्य मानू नका. आपण बंधुजनांवर प्रीती करतो ह्यावरून आपणास कळून येते की, आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. जो प्रीती करत नाही, तो मरणात राहतो. जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो, तो नरहिंसक आहे आणि कोणाही नरहिंसकामध्ये शाश्वत जीवन राहत नाही, हे तुम्हांला माहीत आहे. ख्रिस्ताने आपल्याकरिता स्वतःचा प्राण अर्पिला, ह्यावरून आपल्याला प्रीतीचे ज्ञान झाले आहे. तेव्हा आपणही आपल्या बंधूकरिता स्वतःचा प्राण अर्पिला पाहिजे. स्वतःजवळ ऐहिक धन असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून, जो स्वतःला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्यामध्ये देवाची प्रीती कशी राहणार? मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा बोलण्याने नव्हे, तर आपण कृतीने खरी प्रीती करावी.