1 योहान 3
3
देवपित्याने दिलेले प्रीतिदान
1आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पाहा; आणि आपण तसे आहोतच. ह्यामुळे जग आपल्याला ओळखत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही.
2प्रियजनहो, आपण आता देवाची मुले आहोत; आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही; तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल.
3जो कोणी त्याच्यासंबंधाने ही आशा बाळगतो तो, जसा तो शुद्ध आहे, तसे आपणाला शुद्ध करतो.
ईश्वरी पुत्रत्व व पाप ह्यांचा विरोध आहे
4जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो; कारण पाप स्वैराचार आहे.
5तुम्हांला माहीत आहे की, आपली पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला; त्याच्या ठायी पाप नाही.
6जो कोणी त्याच्या ठायी राहतो तो पाप करत नाही; जो कोणी पाप करतो त्याने त्याला पाहिले नाही व त्याला ओळखलेही नाही.
7मुलांनो, कोणी तुम्हांला बहकवू नये; जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने चालणाराही नीतिमान आहे.
8पाप करणारा सैतानाचा आहे; कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला.
9जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही; कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते; त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे.
10ह्यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तोही नाही.
11जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला तो हाच आहे की, आपण एकमेकांवर प्रीती करावी.
12काइन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला, त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काइनाची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती.
बंधुप्रीती
13बंधूंनो, जग तुमचा द्वेष करते ह्याचे आश्चर्य मानू नका.
14आपण बंधुजनांवर प्रीती करतो ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो.
15जो कोणी आपल्या बंधूंचा द्वेष करतो तो नरहिंसक आहे; आणि कोणाही नरहिंसकाच्या ठायी सार्वकालिक जीवन राहत नाही, हे तुम्हांला माहीत आहे.
16ख्रिस्ताने आपल्याकरता स्वतःचा प्राण अर्पण केला ह्यावरून आपल्याला देवाच्या प्रीतीची जाणीव झाली आहे; तेव्हा आपणही आपल्या बंधूकरता स्वतःचा प्राण अर्पण केला पाहिजे.
17मग जवळ संसाराची साधने असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून जो स्वत:ला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्या ठायी देवाची प्रीती कशी राहणार?
18मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे, तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी.
19,20आपण सत्याचे आहोत हे ह्यावरून आपल्याला कळून येईल; आणि ज्या कशाविषयी आपले मन आपल्या स्वत:ला दोषी ठरवते, त्याविषयी आपण स्वत:च्या मनाला त्याच्यासमोर उमेद देऊ; कारण आपल्या मनापेक्षा देव थोर आहे; त्याला सर्वकाही कळते.
21प्रियजनहो, आपले मन आपल्याला दोषी ठरवत नसेल, तर देवासमोर येण्यास आपल्याला धैर्य आहे.
22आणि आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो व त्याला जे आवडते ते करतो.
23त्याची आज्ञा ही आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आपण विश्वास ठेवावा; आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे आपण एकमेकांवर प्रीती करावी.
24त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्या ठायी राहतो व तो त्या माणसाच्या ठायी राहतो. त्याने जो आत्मा आपल्याला दिला, त्यावरून आपल्याला कळून येते की, तो आपल्या ठायी राहतो.
सध्या निवडलेले:
1 योहान 3: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.