YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 योहान 3:1-18

1 योहान 3:1-18 MACLBSI

आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले, ह्यात पित्याने आपल्याला प्रीती हे केवढे दान दिले आहे पाहा आणि आपण तसे आहोतच. ह्यामुळे जग आपल्याला ओळखत नाही, कारण त्याने देवाला ओळखले नाही. प्रियजनहो, आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ, हे अजून स्पष्ट झालेले नाही, परंतु तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ, हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे, तसाच तो आपल्याला दिसेल. जो कोणी त्यासंबंधाने आशा बाळगतो तो, ख्रिस्त जसा शुद्ध आहे, तसे स्वतःला शुद्ध राखतो. जो कोणी पाप करतो, तो स्वैराचार करतो, कारण पाप स्वैराचार आहे. तुम्हांला माहीत आहे की, पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला आणि त्याच्यामध्ये पाप नाही. जो कोणी त्याच्यामध्ये राहतो, तो पाप करत नाही, जो कोणी पाप करतो, त्याने त्याला पाहिले नाही व त्याला ओळखलेही नाही. मुलांनो, कोणी तुम्हांला बहकवू नये! जसा तो नीतिमान आहे, तसा नीतीने चालणाराही नीतिमान आहे. पाप करणारा सैतानच आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे, तो पाप करत नाही, कारण देवाचे बीज त्याच्यामध्ये राहते. तो पाप करू शकत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे. ह्यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतीने वागत नाही, तो देवाचा नाही आणि जो आपल्या बंधूवर प्रीती करत नाही तोही नाही. जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला, तो हाच आहे की, आपण एकमेकांवर प्रीती करावी. काइन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला, त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काइनची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची कृत्ये नीतीची होती. बंधूंनो, जग तुमचा द्वेष करते ह्याचे आश्चर्य मानू नका. आपण बंधुजनांवर प्रीती करतो ह्यावरून आपणास कळून येते की, आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत. जो प्रीती करत नाही, तो मरणात राहतो. जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो, तो नरहिंसक आहे आणि कोणाही नरहिंसकामध्ये शाश्वत जीवन राहत नाही, हे तुम्हांला माहीत आहे. ख्रिस्ताने आपल्याकरिता स्वतःचा प्राण अर्पिला, ह्यावरून आपल्याला प्रीतीचे ज्ञान झाले आहे. तेव्हा आपणही आपल्या बंधूकरिता स्वतःचा प्राण अर्पिला पाहिजे. स्वतःजवळ ऐहिक धन असून व आपला बंधू गरजवंत आहे हे पाहून, जो स्वतःला त्याचा कळवळा येऊ देत नाही त्याच्यामध्ये देवाची प्रीती कशी राहणार? मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा बोलण्याने नव्हे, तर आपण कृतीने खरी प्रीती करावी.