१ इतिहास 9:22-34
१ इतिहास 9:22-34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
निवासमंडपाचे रक्षण करणारे असे एकंदर दोनशे बारा निवडक द्वाररक्षक होते. आपापल्या गावांच्या वंशावळ्यांमध्ये त्यांची नावे लिहिलेली आहेत. त्यांचा विश्वासूपणा पाहून दावीद आणि शमुवेल संदेष्टा यांनी त्यांची नेमणूक केली होती परमेश्वराच्या मंदिराच्या, निवासमंडपाच्या प्रवेशद्वारांवर राखण करण्याची जबाबदारी या द्वारपालांची आणि त्यांच्या वंशजांची होती. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशी चार दिशांना प्रवेशद्वारे होती. आसपासच्या गावांमध्ये राहणारे द्वारपालांचे नातेवाईक वेळोवेळी त्यांच्या मदतीला येत. आले की सलग सात दिवस मदतीला राहत. या सर्व द्वारपालांचे नायकत्व चार लेवी द्वारपालांकडे होते. देवाच्या मंदिरातील खोल्या आणि खजिना यांची जपणूक करण्याचे काम त्यांचे होते. देवाच्या मंदिरावर पहारा करण्यासाठी ते रात्रभर त्यासभोवती जागे राहत. दररोज सकाळी मंदिराचे दरवाजे उघडण्याचे काम त्यांच्याकडे होते. त्यांच्यातले काहीजण मंदिरात उपयोगात येणाऱ्या पात्रांची देखभाल करत. ती पात्रे बाहेर काढताना आणि पुन्हा आत ठेवताना ते ती मोजून ठेवत असत. आणि त्यांच्यांतले काहीजण सामानावर व पवित्रस्थानाच्या सर्व पीठ, द्राक्षरस, तेल, धूप, सुवासिक द्रव्य आणि साधनांची काळजी घेण्यास यावर नेमलेले होते. याजकांचे काही पुत्र सुवासिक द्रव्याचे मिश्रण करण्याचे काम करत असत. लेव्यातला एक मत्तिथ्या, जो शल्लूम कोरही याचा थोरला पुत्र होता. अर्पणाच्या भाकरी तयार करण्याऱ्यांचा प्रमुख होता. कहाथीच्या वंशातील त्यांचे काही भाऊ, प्रत्येक शब्बाथवारी समक्षतेच्या भाकरी तयार करण्याऱ्यांचे प्रमुख होते. लेव्यांच्या घराण्यांचे प्रमुख गायक होते ते मंदिरातील खोल्यांत राहत होते. कारण जेव्हा ते कामातून मोकळे होत असत, त्यांना रात्रंदिवस आपले नेमून दिलेले काम करावे लागत असे. हे लेव्यांच्या घराण्यांतील प्रमुख होते, जशी त्यांची वंशावळ्यांमध्ये नोंद केली होती. ते यरूशलेमात राहत होते.
१ इतिहास 9:22-34 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
द्वारपालांच्या कामासाठी 212 लोक निवडले होते. त्यांच्या गावी त्यांच्या वंशावळीत त्यांची नोंद केलेली होती. विश्वासयोग्यता पाहून त्यास दावीद व शमुवेल संदेष्टा यांनी त्या कामगिरीवर नेमले होते. ते व त्यांचे वंशज याहवेहच्या भवनाच्या म्हणजे सभामंडपाच्या द्वारपालाचे काम पाहत असत. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही दिशांना द्वारपाल ठेवण्यात आले होते. त्यांच्या गावात राहणारे त्यांचे भाऊबंद सात दिवसात पाळीपाळीने कार्य करीत. परंतु चारही मुख्य द्वारपाल विश्वासू लेवीय असून त्यांच्याकडे परमेश्वराच्या भवनाच्या कोठड्या व भांडारे यांची जबाबदारी सोपविली होती. परमेश्वराच्या भवनाचे रक्षण त्यांच्याकडे सोपविले असल्यामुळे रात्री ते मंदिराच्या आसपास राहत असत आणि दररोज सकाळी परमेश्वराचे भवन उघडण्यासाठी चावी त्यांच्याच ताब्यात असे. सेवेसंबंधीची पात्रे त्यांच्यापैकी काहीजणांच्या ताब्यात असत; ती पात्रे ते मोजून आत ठेवीत व मोजून बाहेर काढीत. त्यांच्यापैकी काहीजणांकडे सामानसुमान, पवित्रस्थानातील सर्व पात्रे, सपीठ, द्राक्षारस, तेल, ऊद व सुगंधी द्रव्ये यांची व्यवस्था असे. याजकांपैकी काहीजण सुगंधी मसाले तयार करीत असत. तव्यावर विश्वासयोग्यतेने ज्या वस्तू भाजण्यात येत, त्यावर देखरेख करण्यासाठी लेव्यांपैकी कोरही शल्लूमचा ज्येष्ठपुत्र मत्तिथ्याहला नेमले. कोहाथी कुळातील त्यांच्या काही लेवी भाऊबंदांची नेमणूक दर शब्बाथ दिवशी समर्पित भाकरी तयार करण्याच्या कामावर झाली होती. काही लेवी कुटुंबप्रमुख जे मंदिरातील संगीतासाठी जबाबदार होते, ते मंदिराच्या काही खोल्यात राहत असत आणि त्यांना संगीताशिवाय इतर कामे नव्हती, कारण त्या कामाची त्यांना रात्रंदिवस जबाबदारी देण्यात आली होती. हे सर्व लेवी वंशातील कुटुंबप्रमुख असून त्यांची प्रमुख म्हणून वंशावळीत नोंद झाली होती, ते यरुशलेमात राहात.
१ इतिहास 9:22-34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सर्व द्वारपाळांच्या कामासाठी दोनशे बारा लोक निवडले होते. त्यांना दावीद व शमुवेल द्रष्टा ह्यांनी ह्या कामगिरीवर नेमले होते. त्यांच्या-त्यांच्या गावी त्यांच्या वंशावळीत त्यांना नमूद केले होते. ते व त्यांचे वंशज परमेश्वराच्या मंदिराच्या म्हणजे दर्शनमंडपाच्या द्वारपाळाचे काम पाळीपाळीने पाहत असत. द्वारपाळ पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चारही दिशांना असत. त्यांचे भाऊबंद जे खेड्यापाड्यांत राहत असत ते सात-सात दिवसांनी पाळीपाळीने त्यांच्याकडे येत; चारही मुख्य द्वारपाळ लेवी असून त्यांच्याकडे हे काम सोपवले होते; त्यांना देवाच्या मंदिराच्या कोठड्या व भांडारे ह्यांवर नेमले होते. देवाच्या मंदिराचे रक्षण त्यांच्याकडे सोपवले असल्यामुळे ते त्याच्या आसपास रात्रीचे राहत, आणि दररोज सकाळी मंदिर उघडण्याचे काम त्यांचे होते. उपासनेसंबंधीची पात्रे त्यांच्यापैकी काही जणांच्या ताब्यात असत; ती पात्रे ते एकेक मोजून आत ठेवत व एकेक मोजून बाहेर काढत. त्यांच्यापैकी काही जणांकडे सामान-सुमान, पवित्रस्थानातील सर्व पात्रे, सपीठ, द्राक्षारस, तेल, ऊद व सुगंधी द्रव्ये ह्यांची व्यवस्था असे. याजकपुत्रांपैकी काही जण गांध्यांचे काम करीत. तव्यावर ज्या वस्तू भाजण्यात येत त्यांवर देखरेख करण्यासाठी लेव्यांपैकी मत्तिथ्या ह्याला नेमले होते, हा शल्लूम कोरहीचा ज्येष्ठ पुत्र. कहाथी कुळातील त्यांच्या कित्येक भाऊबंदांची नेमणूक समर्पित भाकरीसंबंधीच्या कामावर झाली होती; ते प्रत्येक शब्बाथ दिवशी त्या तयार करीत. वर सांगितलेले गायक लेव्यांच्या पितृकुळातले प्रमुख होते; ते कोठड्यांत राहत; त्यांना इतर काही काम नसे; ते रात्रंदिवस आपल्या कामात गुंतलेले असत. हे त्यांच्या-त्यांच्या पिढ्यांतले, लेव्यांच्या पितृ-कुळातले प्रमुख पुरुष होत; ते यरुशलेमेत राहत.