१ इतिहास 21:18-30
१ इतिहास 21:18-30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग परमेश्वराच्या दूताने गादला आज्ञा केली की, तू दावीदाला सांग, दावीदाने वर जाऊन अर्णान यबूसी याच्या खळ्यात परमेश्वरासाठी एक वेदी बांधावी. मग गादाने परमेश्वराच्या नावाने बोलून जे सांगितले त्यावरून दावीद वरती गेला. अर्णान तेव्हा गव्हाची मळणी करत होता, तो मागे वळला व त्याने देवदूताला पाहिले. तो व त्याचे चारही पुत्र त्याच्याबरोबर होते ते लपले. आणि दावीद अर्णानाकडे आला, तेव्हा अर्णानाने वर दृष्टी करून व दावीदाला पाहिले. तो खळ्यातून निघाला आणि त्याने दावीदाला तोंड जमिनीपर्यंत लववून नमस्कार केला. मग दावीद अर्णानला म्हणाला, “हे खळे मला विकत दे. त्याची पूर्ण किंमत मी तुला देईन. लोकांवरून मरी बंद व्हावी म्हणून तेथे मी परमेश्वराकरता वेदी बांधीन.” अर्णान दावीदाला म्हणाला, “माझ्या स्वामी राजाला जे काही तुमच्या दृष्टीने जे चांगले आहे ते करा. पाहा, होमार्पण करण्यासाठी मी बैल, तसेच वेदीवरील होमात जाळण्यासाठी मळणीची लाकडे, आणि अन्नार्पणासाठी गहू हे सर्व मी तुम्हास देईन.” तेव्हा राजा दावीद अर्णानाला म्हणाला, “नाही, मी तुला त्याची पूर्ण किंमत देऊनच विकत घेईन. कारण जे तुझे आहे ते मी परमेश्वरासाठी घेणार नाही. आणि किंमत दिल्यावाचून घेतलेले होमार्पण मी अर्पण करणार नाही.” आणि दावीदाने त्या जागेसाठी अर्णानाला सहाशें शेकेल सोने दिले. दावीदाने तेथे परमेश्वराकरता वेदी बांधली आणि त्यावर त्याने होमार्पणे आणि शांत्यर्पणे अर्पण केली. त्याने परमेश्वरास हाक मारली व त्याने स्वर्गातून होमार्पणाच्या वेदीवर अग्नी पाठवून उत्तर दिले. मग परमेश्वराने देवदूताला आज्ञा केली आणि त्याने आपली तलवार म्यानात परत घातली. त्या वेळेस, जेव्हा दावीदाने पाहिले की अर्णान यबूसीच्या खळ्यात परमेश्वराने आपल्याला उत्तर दिले तेव्हा त्याने तेथे यज्ञ केले. कारण मोशेने रानात केलेला परमेश्वराचा निवासमंडप आणि होमार्पणाची वेदी, त्याकाळी गिबोनामध्ये उच्च स्थानावर होती. पण परमेश्वराच्या दूताच्या तलवारीच्या भीतीने दावीद देवापुढे मार्ग विचारायला जाण्यास घाबरत होता.
१ इतिहास 21:18-30 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा याहवेहच्या दूताने गादला दावीदाला सूचना देण्यास सांगितले की, जा आणि यबूसी अरवनाहच्या खळ्यात याहवेहप्रीत्यर्थ वेदी बांध. मग याहवेहच्या नावाने गादने जे सांगितले होते त्यानुसार दावीद वर गेला. आर्णोन गव्हाची मळणी करीत होता, त्याने वळून पाहिले, तर त्याच्या दृष्टीस एक दूत पडला. आर्णोनाचे चार पुत्र सोबत होते, तिथून ते गेले व लपून राहिले. जेव्हा दावीद जवळ गेला, आर्णोनाने त्याच्याकडे पाहिले, तेव्हा त्याने खळ्यापासून निघून दावीदासमोर भूमीकडे तोंड करून दंडवत घातले. दावीद अरवनाहला म्हणाला, “मला तुझे हे खळे दे, लोकांवर आलेली मरी थांबावी म्हणून याहवेहसाठी मी इथे वेदी बांधेन. मला हे विकत दे, मी तुला त्याची संपूर्ण किंमत देईन.” अरवनाह दावीदाला म्हणाला, “माझ्या धनीराजांना मनास येईल ते त्यांनी करावे. पाहा, होमार्पणासाठी मी बैल देईन, लाकडासाठी मळणीची आऊते व धान्यार्पणासाठी गहू, मी हे सर्व तुम्हाला देत आहे.” परंतु दावीद राजाने अरवनाहला उत्तर दिले, “नाही, मी त्याबद्दल तुला किंमत मोजून देणार. जे तुझे आहे, ते मी याहवेहसाठी तसेच घेणार नाही. फुकट मिळालेले होमार्पण मी अर्पिणार नाही.” मग दावीदाने आर्णोनला जागेबद्दल सोन्याची सहाशे शेकेल दिली. नंतर दावीदाने तिथे याहवेहप्रीत्यर्थ एक वेदी बांधली व होमार्पणे व शांत्यर्पणे अर्पिली. त्याने याहवेहचा धावा केला आणि याहवेहने स्वर्गातून होमार्पणाच्या वेदीवर अग्नी पाठवून त्याला उत्तर दिले. मग याहवेहने देवदूताला आज्ञा दिली आणि त्याने आपली तलवार म्यानात परत ठेवली. याहवेहने आपल्या प्रार्थनेचे उत्तर दिले, हे पाहून दावीदाने आर्णोन यबूसीच्या खळ्यात अर्पणे वाहिली. मोशेने रानात याहवेहसाठी केलेला सभामंडप आणि होमबलीची वेदी या दोन्ही गिबोनच्या टेकडीवर होती. परंतु दावीद परमेश्वराला प्रश्न विचारावयास त्यांच्या पुढे जाण्यास धजेना, कारण याहवेहच्या दूताच्या तलवारीने तो भयभीत झाला होता.
१ इतिहास 21:18-30 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा परमेश्वराच्या दूताने गादाला आज्ञा केली, “तू दाविदाला सांग की तू वरती जाऊन अर्णान यबूसी ह्याच्या खळ्यात परमेश्वराप्रीत्यर्थ एक वेदी बांध.” गादाने परमेश्वराच्या नामाने सांगितले त्याप्रमाणे दावीद वरती गेला. अर्णान मागे वळून पाहतो तेव्हा देवदूत त्याच्या दृष्टीस पडला, तेव्हा त्याच्याबरोबर असलेले त्याचे चार पुत्र लपून राहिले. ह्या वेळी अर्णान गव्हाची मळणी करत होता. दावीद आपल्याकडे येत आहे हे पाहून अर्णान खळ्याबाहेर गेला व त्याने भूमीपर्यंत लवून दाविदाला प्रणाम केला. दावीद अर्णानास म्हणाला, “ह्या खळ्याची जागा मला दे; लोकांवरची ही मरी दूर व्हावी म्हणून येथे परमेश्वराप्रीत्यर्थ मला एक वेदी बांधायची आहे; पुरे मोल घेऊन ही मला दे.” अर्णान दाविदाला म्हणाला, “ही जमीन आपणाला घ्या, माझ्या स्वामीराजांनी जे काही ठीक दिसेल ते करावे. पाहा, होमबलीसाठी बैल, इंधनासाठी मळणीची औते व अन्नार्पणासाठी गहू ही सर्व मी आपणाला देतो.” दावीद राजा अर्णानाला म्हणाला, “नाही, नाही, मी पुरे मोल देऊन ह्या वस्तू घेईन; कारण जे तुझ्या मालकीचे आहे ते मी परमेश्वरासाठी घेणार नाही; फुकट मिळालेला होमबली मी अर्पण करणार नाही.” तेव्हा दाविदाने त्या जागेबद्दल सहाशे शेकेल सोने तोलून दिले. दाविदाने तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधून होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली आणि परमेश्वराचा धावा केला, परमेश्वराने त्या होमबलीच्या वेदीवर दिव्याग्नी पाडून त्याला उत्तर दिले. परमेश्वराने देवदूताला आज्ञा केली; आणि त्याने आपली तलवार म्यानात परत घातली. त्या प्रसंगी परमेश्वराने अर्णान यबूसी ह्याच्या खळ्यात आपली विनंती ऐकली हे पाहून दाविदाने यज्ञ केला. मोशेने रानात केलेला परमेश्वराचा निवासमंडप आणि होमार्पणाची वेदी ही दोन्ही त्या वेळेस गिबोन येथल्या उच्च स्थानी होती. पण दावीद देवाला प्रश्न विचारण्यासाठी त्याच्यापुढे जाण्यास धजेना; परमेश्वराच्या दूताच्या तलवारीचा त्याला धाक पडला होता.