मग परमेश्वराच्या दूताने गादला आज्ञा केली की, तू दावीदाला सांग, दावीदाने वर जाऊन अर्णान यबूसी याच्या खळ्यात परमेश्वरासाठी एक वेदी बांधावी. मग गादाने परमेश्वराच्या नावाने बोलून जे सांगितले त्यावरून दावीद वरती गेला. अर्णान तेव्हा गव्हाची मळणी करत होता, तो मागे वळला व त्याने देवदूताला पाहिले. तो व त्याचे चारही पुत्र त्याच्याबरोबर होते ते लपले. आणि दावीद अर्णानाकडे आला, तेव्हा अर्णानाने वर दृष्टी करून व दावीदाला पाहिले. तो खळ्यातून निघाला आणि त्याने दावीदाला तोंड जमिनीपर्यंत लववून नमस्कार केला. मग दावीद अर्णानला म्हणाला, “हे खळे मला विकत दे. त्याची पूर्ण किंमत मी तुला देईन. लोकांवरून मरी बंद व्हावी म्हणून तेथे मी परमेश्वराकरता वेदी बांधीन.” अर्णान दावीदाला म्हणाला, “माझ्या स्वामी राजाला जे काही तुमच्या दृष्टीने जे चांगले आहे ते करा. पाहा, होमार्पण करण्यासाठी मी बैल, तसेच वेदीवरील होमात जाळण्यासाठी मळणीची लाकडे, आणि अन्नार्पणासाठी गहू हे सर्व मी तुम्हास देईन.” तेव्हा राजा दावीद अर्णानाला म्हणाला, “नाही, मी तुला त्याची पूर्ण किंमत देऊनच विकत घेईन. कारण जे तुझे आहे ते मी परमेश्वरासाठी घेणार नाही. आणि किंमत दिल्यावाचून घेतलेले होमार्पण मी अर्पण करणार नाही.” आणि दावीदाने त्या जागेसाठी अर्णानाला सहाशें शेकेल सोने दिले. दावीदाने तेथे परमेश्वराकरता वेदी बांधली आणि त्यावर त्याने होमार्पणे आणि शांत्यर्पणे अर्पण केली. त्याने परमेश्वरास हाक मारली व त्याने स्वर्गातून होमार्पणाच्या वेदीवर अग्नी पाठवून उत्तर दिले. मग परमेश्वराने देवदूताला आज्ञा केली आणि त्याने आपली तलवार म्यानात परत घातली. त्या वेळेस, जेव्हा दावीदाने पाहिले की अर्णान यबूसीच्या खळ्यात परमेश्वराने आपल्याला उत्तर दिले तेव्हा त्याने तेथे यज्ञ केले. कारण मोशेने रानात केलेला परमेश्वराचा निवासमंडप आणि होमार्पणाची वेदी, त्याकाळी गिबोनामध्ये उच्च स्थानावर होती. पण परमेश्वराच्या दूताच्या तलवारीच्या भीतीने दावीद देवापुढे मार्ग विचारायला जाण्यास घाबरत होता.
1 इति. 21 वाचा
ऐका 1 इति. 21
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 इति. 21:18-30
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ