YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 इतिहास 21

21
दावीद योद्ध्यांची शिरगणती करतो
1सैतानाने इस्राएलविरुद्ध आपत्ती आणली, त्याने दावीदाला इस्राएली लोकांची शिरगणती करण्यास चिथाविले. 2म्हणून दावीदाने योआब आणि इतर मुख्य सेनापतींना सांगितले, “जा आणि संपूर्ण इस्राएलींची बेअर-शेबापासून दानापर्यंत शिरगणती करा, म्हणजे ते किती आहेत ते मला कळेल.”
3परंतु योआबाने उत्तर दिले, “याहवेह आपल्या सैन्याची शंभरपटीने वाढ करो. माझ्या धनीराजा, ती सर्व आपलीच प्रजा नाही का? मग गणती करावी अशी इच्छा राजा का बाळगतात? इस्राएलवर आपण दोष का आणावा?”
4तथापि, राजाच्या शब्दापुढे योआब व सेनापतींचे म्हणणे सफल झाले नाही; आणि योआब सर्व इस्राएलभर प्रवास करून यरुशलेमास परतला. 5योआबाने दावीदाला योद्धे पुरुषांच्या संख्येचा अहवाल दिला: यहूदीयामधील चार लक्ष सत्तर हजार मिळून सर्व इस्राएलमध्ये अकरा लाख धनुर्धारी पुरुष होते.
6या गणतीमध्ये त्याने लेवी व बिन्यामीन वंशजांचा समावेश केला नाही, कारण राजाने सांगितलेल्या या कामाचा योआबाला वीट आला होता. 7परमेश्वराच्या दृष्टीमध्ये देखील ही शिरगणती वाईट होती; म्हणून त्यांनी त्याबद्दल इस्राएलला शिक्षा केली.
8तेव्हा दावीद परमेश्वराला म्हणाला, “असे करून मी मोठे पाप केले आहे. आता मी आपणास विनंती करतो, आपल्या सेवकाचा दोष दूर करा. मी मूर्खपण केले आहे.”
9याहवेहने दावीदाचा द्रष्टा गाद याला म्हटले, 10“जाऊन दावीदाला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझ्यापुढे तीन पर्याय ठेवतो. त्यापैकी तू एकाची निवड कर जो मी तुझ्याविरुद्ध वापरावा.’ ”
11तेव्हा गाद दावीदाकडे गेला व त्याला म्हटले, “याहवेह असे म्हणतात: ‘तू निवड कर: 12तीन वर्षाचा दुष्काळ, तुझ्या शत्रूपासून तीन महिने पलायन किंवा तीन दिवस याहवेहची तलवार; म्हणजे मरी देशात पसरून याहवेहचा दूत सर्व इस्राएलच्या भागात नाश करेल.’ आता ज्यांनी मला पाठविले आहे त्यांना काय उत्तर द्यावे ते तुम्ही ठरवून मला सांगा.” 
13दावीदाने गादला म्हटले, “मी मोठ्या पेचात पडलो आहे. मला याहवेहच्या हाती पडू दे, कारण त्यांची कृपा अतिशय अपार आहे; परंतु मला मनुष्याच्या हातात पडू देऊ नको.”
14तेव्हा याहवेहने इस्राएल देशात मरी पाठवली आणि तिच्यामुळे सत्तर हजार लोक मरण पावले. 15आणि परमेश्वराने आपले दूत पाठवून यरुशलेमचा नाश केला. परंतु दूत जे करणार होता तेव्हा ते पाहून याहवेहला अरिष्टाविषयी वाईट वाटले आणि नाश करणार्‍या दूताला याहवेहने म्हटले, “पुरे! आपला हात आवर.” त्यावेळी याहवेहचा दूत यबूसी अरवनाहच्या#21:15 अर्थात् आर्णोन खळ्याजवळ उभा होता.
16दावीदाने वर दृष्टी केली आणि याहवेहच्या दूताला स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या मध्ये यरुशलेमकडे तलवार उगारून उभे असलेले पाहिले, तेव्हा दावीद आणि वडीलजनांनी अंगावर गोणपाटाची वस्त्रे घालून दंडवत घातले.
17दावीदाने परमेश्वराला म्हटले, “योद्ध्यांची शिरगणती करण्यासाठी मीच आज्ञा केली होती ना? मी मेंढपाळ असून पाप केले आहे आणि चुकीचे वागलो. ही तर केवळ मेंढरे आहेत. त्यांनी काय केले आहे? हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, आपला हात माझ्यावर व माझ्या घराण्यावर पडो. परंतु तुमच्या या लोकांवर मरी राहू देऊ नका.”
दावीद वेदी बांधतो
18तेव्हा याहवेहच्या दूताने गादला दावीदाला सूचना देण्यास सांगितले की, जा आणि यबूसी अरवनाहच्या खळ्यात याहवेहप्रीत्यर्थ वेदी बांध. 19मग याहवेहच्या नावाने गादने जे सांगितले होते त्यानुसार दावीद वर गेला.
20आर्णोन गव्हाची मळणी करीत होता, त्याने वळून पाहिले, तर त्याच्या दृष्टीस एक दूत पडला. आर्णोनाचे चार पुत्र सोबत होते, तिथून ते गेले व लपून राहिले. 21जेव्हा दावीद जवळ गेला, आर्णोनाने त्याच्याकडे पाहिले, तेव्हा त्याने खळ्यापासून निघून दावीदासमोर भूमीकडे तोंड करून दंडवत घातले.
22दावीद अरवनाहला म्हणाला, “मला तुझे हे खळे दे, लोकांवर आलेली मरी थांबावी म्हणून याहवेहसाठी मी इथे वेदी बांधेन. मला हे विकत दे, मी तुला त्याची संपूर्ण किंमत देईन.”
23अरवनाह दावीदाला म्हणाला, “माझ्या धनीराजांना मनास येईल ते त्यांनी करावे. पाहा, होमार्पणासाठी मी बैल देईन, लाकडासाठी मळणीची आऊते व धान्यार्पणासाठी गहू, मी हे सर्व तुम्हाला देत आहे.”
24परंतु दावीद राजाने अरवनाहला उत्तर दिले, “नाही, मी त्याबद्दल तुला किंमत मोजून देणार. जे तुझे आहे, ते मी याहवेहसाठी तसेच घेणार नाही. फुकट मिळालेले होमार्पण मी अर्पिणार नाही.”
25मग दावीदाने आर्णोनला जागेबद्दल सोन्याची सहाशे शेकेल#21:25 अंदाजे 6.9 कि.ग्रॅ. दिली. 26नंतर दावीदाने तिथे याहवेहप्रीत्यर्थ एक वेदी बांधली व होमार्पणे व शांत्यर्पणे अर्पिली. त्याने याहवेहचा धावा केला आणि याहवेहने स्वर्गातून होमार्पणाच्या वेदीवर अग्नी पाठवून त्याला उत्तर दिले.
27मग याहवेहने देवदूताला आज्ञा दिली आणि त्याने आपली तलवार म्यानात परत ठेवली. 28याहवेहने आपल्या प्रार्थनेचे उत्तर दिले, हे पाहून दावीदाने आर्णोन यबूसीच्या खळ्यात अर्पणे वाहिली. 29मोशेने रानात याहवेहसाठी केलेला सभामंडप आणि होमबलीची वेदी या दोन्ही गिबोनच्या टेकडीवर होती. 30परंतु दावीद परमेश्वराला प्रश्न विचारावयास त्यांच्या पुढे जाण्यास धजेना, कारण याहवेहच्या दूताच्या तलवारीने तो भयभीत झाला होता.

सध्या निवडलेले:

1 इतिहास 21: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन