YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 21:1-17

१ इतिहास 21:1-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आणि सैतान इस्राएलाविरुध्द उठला व त्याने दावीदाला इस्राएलाची मोजणी करण्यास भाग पाडले. दावीद यवाबाला आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, “जा बैर-शेबापासून दानापर्यंत सर्व इस्राएल लोकांची मोजणी करा आणि मग मला त्यांची एकंदर संख्या माहित व्हावी म्हणून मला परत येऊन अहवाल द्या.” यवाब म्हणाला “परमेश्वर आपले सैन्य आहे त्यापेक्षा शंभर पटीने अधिक वाढवो. पण माझ्या प्रभू राजा, ते सर्व माझ्या धन्याचे सेवा करत नाही का? मग माझ्या धन्याला हे का पाहिजे? इस्राएलावर त्याने दोष का आणावा?” पण राजाचा शब्द यवाबाविरुध्द अंतिम होता, यामुळे यवाब निघून गेला आणि सर्व इस्राएलातून फिरला. मग यरूशलेमाला परत आला. मग यवाबाने दावीदाला एकंदर लढाई करणाऱ्यांची मोजणी सांगितली. इस्राएलात अकरा लाख तलवार काढणारे पुरुष होते. यहूदात चार लाख सत्तर हजार पुरुष होते. पण लेवी आणि बन्यामीन यांच्या घराण्यांची मोजदाद केली नव्हती, कारण यवाबाला राजाच्या आज्ञेचा अत्यंत तिटकारा आला होता. देवाला या कृतीमुळे वाईट वाटले म्हणून त्याने इस्राएलावर मारा केला. मग दावीद देवाला म्हणाला, “मी ही गोष्ट करून महान पाप केले आहे. आता आपल्या सेवकाचे अपराध दूर कर, कारण मी फार मूर्खपणाची कृती केली आहे.” परमेश्वर दावीदाचा संदेष्टा गादला म्हणाला, “जाऊन दावीदाला सांग, ‘परमेश्वराचे म्हणणे असे आहे, मी तुझ्यापुढे तीन पर्याय ठेवतो. त्यातील एक निवड.” मग गाद दावीदाकडे गेला व त्यास म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे असे आहे, ‘त्यातून एक निवड. तीन वर्षाचा दुष्काळ पडावा, किंवा तीन महिने तुझ्या शत्रूने तलवारीने तुझा पाठलाग करावा आणि तुझा नाश करावा किंवा इस्राएलाच्या सर्व देशात परमेश्वराचा दूत लोकांचा संहार करीत असताना देशात तीन दिवस परमेश्वराची तलवार म्हणजे मरी असावी? तर आता, ज्याने मला पाठवले, त्यास मी काय उत्तर द्यावे ते तू ठरवून मला सांग.” मग दावीद गादला म्हणाला, “मी गंभीर अडचणीत आहे. मला लोकांच्या हातात पडण्यापेक्षा परमेश्वराच्या हातात पडू दे, कारण त्याच्या दयेची कृती फार महान आहे.” तेव्हा परमेश्वराने इस्राएलावर मरी पसरवली आणि त्यामध्ये सत्तर हजार लोक मृत्युमुखी पडले. यरूशलेमेचा नाश करण्यास देवाने दूत पाठवला. तो तिचा नाश करणार, हे परमेश्वराने पाहिले व हानी करण्यापासून त्याचे मन बदलले. तो त्या नाश करणाऱ्या दूताला म्हणाला, “पुरे झाले, आता तुझा हात मागे घे.” त्यावेळी परमेश्वराचा दूत अर्णान यबूसी याच्या खळ्याजवळ उभा होता. दावीदाने वर पाहिले व तेव्हा त्यास परमेश्वराचा दूत आकाश व पृथ्वी यांच्यामध्ये उभा असलेला दिसला. त्याच्या हातात उपसलेली तलवार असून त्याने ती यरूशलेमेवर उगारलेली होती. तेव्हा गोणताट घातलेले दावीद आणि वडील जमिनीकडे तोंड करून खाली पडले. दावीद देवाला म्हणाला, “सैन्याची मोजणी करण्याचा हूकूम मी दिला होता की नाही? मीच हे पाप केले आहे, मीच हे दुष्ट काम केले आहे. पण या मेंढरांनी काय केले आहे? हे परमेश्वरा माझ्या देवा, मी विनंती करतो तुझा हात माझ्यावर व माझ्या घराण्यावर पडून तू आम्हास शिक्षा दे, पण तुझ्या लोकांस या मरीने शिक्षा देऊ नको.”

सामायिक करा
१ इतिहास 21 वाचा

१ इतिहास 21:1-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

सैतानाने इस्राएलविरुद्ध आपत्ती आणली, त्याने दावीदाला इस्राएली लोकांची शिरगणती करण्यास चिथाविले. म्हणून दावीदाने योआब आणि इतर मुख्य सेनापतींना सांगितले, “जा आणि संपूर्ण इस्राएलींची बेअर-शेबापासून दानापर्यंत शिरगणती करा, म्हणजे ते किती आहेत ते मला कळेल.” परंतु योआबाने उत्तर दिले, “याहवेह आपल्या सैन्याची शंभरपटीने वाढ करो. माझ्या धनीराजा, ती सर्व आपलीच प्रजा नाही का? मग गणती करावी अशी इच्छा राजा का बाळगतात? इस्राएलवर आपण दोष का आणावा?” तथापि, राजाच्या शब्दापुढे योआब व सेनापतींचे म्हणणे सफल झाले नाही; आणि योआब सर्व इस्राएलभर प्रवास करून यरुशलेमास परतला. योआबाने दावीदाला योद्धे पुरुषांच्या संख्येचा अहवाल दिला: यहूदीयामधील चार लक्ष सत्तर हजार मिळून सर्व इस्राएलमध्ये अकरा लाख धनुर्धारी पुरुष होते. या गणतीमध्ये त्याने लेवी व बिन्यामीन वंशजांचा समावेश केला नाही, कारण राजाने सांगितलेल्या या कामाचा योआबाला वीट आला होता. परमेश्वराच्या दृष्टीमध्ये देखील ही शिरगणती वाईट होती; म्हणून त्यांनी त्याबद्दल इस्राएलला शिक्षा केली. तेव्हा दावीद परमेश्वराला म्हणाला, “असे करून मी मोठे पाप केले आहे. आता मी आपणास विनंती करतो, आपल्या सेवकाचा दोष दूर करा. मी मूर्खपण केले आहे.” याहवेहने दावीदाचा द्रष्टा गाद याला म्हटले, “जाऊन दावीदाला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझ्यापुढे तीन पर्याय ठेवतो. त्यापैकी तू एकाची निवड कर जो मी तुझ्याविरुद्ध वापरावा.’ ” तेव्हा गाद दावीदाकडे गेला व त्याला म्हटले, “याहवेह असे म्हणतात: ‘तू निवड कर: तीन वर्षाचा दुष्काळ, तुझ्या शत्रूपासून तीन महिने पलायन किंवा तीन दिवस याहवेहची तलवार; म्हणजे मरी देशात पसरून याहवेहचा दूत सर्व इस्राएलच्या भागात नाश करेल.’ आता ज्यांनी मला पाठविले आहे त्यांना काय उत्तर द्यावे ते तुम्ही ठरवून मला सांगा.”  दावीदाने गादला म्हटले, “मी मोठ्या पेचात पडलो आहे. मला याहवेहच्या हाती पडू दे, कारण त्यांची कृपा अतिशय अपार आहे; परंतु मला मनुष्याच्या हातात पडू देऊ नको.” तेव्हा याहवेहने इस्राएल देशात मरी पाठवली आणि तिच्यामुळे सत्तर हजार लोक मरण पावले. आणि परमेश्वराने आपले दूत पाठवून यरुशलेमचा नाश केला. परंतु दूत जे करणार होता तेव्हा ते पाहून याहवेहला अरिष्टाविषयी वाईट वाटले आणि नाश करणार्‍या दूताला याहवेहने म्हटले, “पुरे! आपला हात आवर.” त्यावेळी याहवेहचा दूत यबूसी अरवनाहच्या खळ्याजवळ उभा होता. दावीदाने वर दृष्टी केली आणि याहवेहच्या दूताला स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या मध्ये यरुशलेमकडे तलवार उगारून उभे असलेले पाहिले, तेव्हा दावीद आणि वडीलजनांनी अंगावर गोणपाटाची वस्त्रे घालून दंडवत घातले. दावीदाने परमेश्वराला म्हटले, “योद्ध्यांची शिरगणती करण्यासाठी मीच आज्ञा केली होती ना? मी मेंढपाळ असून पाप केले आहे आणि चुकीचे वागलो. ही तर केवळ मेंढरे आहेत. त्यांनी काय केले आहे? हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, आपला हात माझ्यावर व माझ्या घराण्यावर पडो. परंतु तुमच्या या लोकांवर मरी राहू देऊ नका.”

सामायिक करा
१ इतिहास 21 वाचा

१ इतिहास 21:1-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर सैतानाने इस्राएलाविरुद्ध उठून इस्राएलाची गणती करायला दाविदाला प्रवृत्त केले. दाविदाने यवाबाला व लोकांच्या सरदारांना सांगितले, “जा, बैर-शेबापासून दानापर्यंत इस्राएलाची मोजदाद करून मला कळवा म्हणजे त्यांची संख्या किती आहे हे मला समजेल.” यवाब म्हणाला, “लोक कितीही असोत, परमेश्वर त्यांना शतगुणित करो; पण माझे स्वामीराज, हे सर्व स्वामींचे दास आहेत ना? माझे स्वामी हे करायला का सांगतात? इस्राएलावर दोष आणण्यासाठी त्यांनी कारण का व्हावे?” तथापि राजाज्ञेपुढे यवाबाचे काही चालले नाही, म्हणून यवाब निघून सर्व इस्राएल देशभर फिरून यरुशलेमास आला. तेव्हा यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी दाविदाला दिली. सर्व धारकरी पुरुष इस्राएलात अकरा लक्ष आणि यहूदात चार लक्ष सत्तर हजार भरले. त्यांच्यात लेवी व बन्यामिनी ह्यांची टीप घेतली नाही; कारण ह्या राजाज्ञेचा यवाबाला वीट आला होता. ह्या गोष्टीवरून देवाची इतराजी होऊन त्याने इस्राएलावर मारा केला. दावीद देवाला म्हणाला, “हे मी केले त्यात मी मोठे पाप केले आहे, तर आता आपल्या सेवकाला दोषमुक्त कर; कारण मी मोठा मूर्खपणा केला आहे.” परमेश्वराने दाविदाचा द्रष्टा गाद ह्याला म्हटले, “जा, दाविदाला सांग, परमेश्वर म्हणतो, ‘मी तुझ्यापुढे तीन गोष्टी ठेवतो त्यांपैकी कोणती करावी ती निवड.”’ तेव्हा गादाने दाविदाकडे जाऊन त्याला सांगितले, “परमेश्वर म्हणतो, ‘पुढील गोष्टींपैकी तुला वाटेल ती एक निवड : तीन वर्षे दुष्काळ पडावा, अथवा तीन महिने तुझ्या शत्रूंची तलवार तुझ्यावर चालून तुझा नाश व्हावा, किंवा तीन दिवस परमेश्वराची तलवार म्हणजे मरी देशात पसरून परमेश्वराच्या दूताने सर्व इस्राएली मुलखाचा नाश करावा.’ ज्याने मला पाठवले आहे त्याला मी काय उत्तर द्यावे ते चांगला विचार करून सांग.” दावीद गादाला म्हणाला, “मी मोठ्या पेचात पडलो आहे; आता परमेश्वराच्या हातात मला पडू द्या, कारण त्याचे वात्सल्य मोठे आहे; मनुष्याच्या हातात मी पडू नये.” मग परमेश्वराने इस्राएलात मरी पाठवली आणि त्यांच्यातले सत्तर हजार लोक पडले. देवाने यरुशलेमाचा नाश करायला एक देवदूत पाठवला; तो त्याचा नाश करणार हे परमेश्वराने पाहिले तेव्हा ह्या अरिष्टाविषयी परमेश्वराला वाईट वाटले व त्या नाश करणार्‍या देवदूताला तो म्हणाला, “आता पुरे कर, आपला हात आटोप.” त्या वेळी परमेश्वराचा दूत अर्णान1 यबूसी ह्याच्या खळ्यानजीक होता. दाविदाने वर दृष्टी केली तो परमेश्वराचा दूत आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन यरुशलेमावर उगारून आकाश व पृथ्वी ह्यांच्यामध्ये उभा आहे असे त्याला दिसले, तेव्हा दावीद व वडील जन ह्यांनी दंडवत घातले; त्या वेळी त्यांनी गोणपाट नेसले होते. दावीद देवाला म्हणाला, “लोकांची मोजदाद करण्याची आज्ञा करणारा मीच ना? मीच हे पाप केले आहे, मीच हे दुराचरण केले आहे; ह्या मेंढरांनी काय केले आहे? हे परमेश्वरा, माझ्या देवा, तुझा हात माझ्यावर व माझ्या पितृकुळावर पडावा, तुझ्या लोकांवर पडून त्यांचा नाश होऊ नये.”

सामायिक करा
१ इतिहास 21 वाचा