सैतानाने इस्राएलविरुद्ध आपत्ती आणली, त्याने दावीदाला इस्राएली लोकांची शिरगणती करण्यास चिथाविले. म्हणून दावीदाने योआब आणि इतर मुख्य सेनापतींना सांगितले, “जा आणि संपूर्ण इस्राएलींची बेअर-शेबापासून दानापर्यंत शिरगणती करा, म्हणजे ते किती आहेत ते मला कळेल.” परंतु योआबाने उत्तर दिले, “याहवेह आपल्या सैन्याची शंभरपटीने वाढ करो. माझ्या धनीराजा, ती सर्व आपलीच प्रजा नाही का? मग गणती करावी अशी इच्छा राजा का बाळगतात? इस्राएलवर आपण दोष का आणावा?” तथापि, राजाच्या शब्दापुढे योआब व सेनापतींचे म्हणणे सफल झाले नाही; आणि योआब सर्व इस्राएलभर प्रवास करून यरुशलेमास परतला. योआबाने दावीदाला योद्धे पुरुषांच्या संख्येचा अहवाल दिला: यहूदीयामधील चार लक्ष सत्तर हजार मिळून सर्व इस्राएलमध्ये अकरा लाख धनुर्धारी पुरुष होते. या गणतीमध्ये त्याने लेवी व बिन्यामीन वंशजांचा समावेश केला नाही, कारण राजाने सांगितलेल्या या कामाचा योआबाला वीट आला होता. परमेश्वराच्या दृष्टीमध्ये देखील ही शिरगणती वाईट होती; म्हणून त्यांनी त्याबद्दल इस्राएलला शिक्षा केली. तेव्हा दावीद परमेश्वराला म्हणाला, “असे करून मी मोठे पाप केले आहे. आता मी आपणास विनंती करतो, आपल्या सेवकाचा दोष दूर करा. मी मूर्खपण केले आहे.” याहवेहने दावीदाचा द्रष्टा गाद याला म्हटले, “जाऊन दावीदाला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझ्यापुढे तीन पर्याय ठेवतो. त्यापैकी तू एकाची निवड कर जो मी तुझ्याविरुद्ध वापरावा.’ ” तेव्हा गाद दावीदाकडे गेला व त्याला म्हटले, “याहवेह असे म्हणतात: ‘तू निवड कर: तीन वर्षाचा दुष्काळ, तुझ्या शत्रूपासून तीन महिने पलायन किंवा तीन दिवस याहवेहची तलवार; म्हणजे मरी देशात पसरून याहवेहचा दूत सर्व इस्राएलच्या भागात नाश करेल.’ आता ज्यांनी मला पाठविले आहे त्यांना काय उत्तर द्यावे ते तुम्ही ठरवून मला सांगा.” दावीदाने गादला म्हटले, “मी मोठ्या पेचात पडलो आहे. मला याहवेहच्या हाती पडू दे, कारण त्यांची कृपा अतिशय अपार आहे; परंतु मला मनुष्याच्या हातात पडू देऊ नको.” तेव्हा याहवेहने इस्राएल देशात मरी पाठवली आणि तिच्यामुळे सत्तर हजार लोक मरण पावले. आणि परमेश्वराने आपले दूत पाठवून यरुशलेमचा नाश केला. परंतु दूत जे करणार होता तेव्हा ते पाहून याहवेहला अरिष्टाविषयी वाईट वाटले आणि नाश करणार्या दूताला याहवेहने म्हटले, “पुरे! आपला हात आवर.” त्यावेळी याहवेहचा दूत यबूसी अरवनाहच्या खळ्याजवळ उभा होता. दावीदाने वर दृष्टी केली आणि याहवेहच्या दूताला स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या मध्ये यरुशलेमकडे तलवार उगारून उभे असलेले पाहिले, तेव्हा दावीद आणि वडीलजनांनी अंगावर गोणपाटाची वस्त्रे घालून दंडवत घातले. दावीदाने परमेश्वराला म्हटले, “योद्ध्यांची शिरगणती करण्यासाठी मीच आज्ञा केली होती ना? मी मेंढपाळ असून पाप केले आहे आणि चुकीचे वागलो. ही तर केवळ मेंढरे आहेत. त्यांनी काय केले आहे? हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, आपला हात माझ्यावर व माझ्या घराण्यावर पडो. परंतु तुमच्या या लोकांवर मरी राहू देऊ नका.”
1 इतिहास 21 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 इतिहास 21:1-17
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ