स्तोत्रसंहिता 92
92
स्तोत्र 92
एक स्तोत्र. एक गीत. शब्बाथ दिवसासाठी निर्धारित.
1याहवेहची स्तुती गाणे,
आणि हे परात्परा, तुमच्या नावाची गीते गाणे उत्तम आहे.
2प्रातःकाळी तुमच्या करुणामय प्रीतीची,
आणि सायंकाळी तुमच्या विश्वसनीयतेची घोषणा,
3दशतंत्री सारंगीच्या संगीताद्वारे,
आणि वीणेच्या तालावर गायन-वादन करीत आहे.
4हे याहवेह, तुमच्या कृत्त्यांनी तुम्ही मला उल्हासित करता;
तुमच्या हाताने केलेल्या कार्यांमुळे मी हर्षगीते गात आहे.
5हे याहवेह, तुमची कृत्ये किती महान आहेत!
तुमचे विचार किती गहन आहेत!
6मतिमंद लोकांना त्याचे आकलन होत नाही;
मूर्खांना हे समजत नाही की,
7दुष्ट लोक गवताप्रमाणे जरी भराभर उगवतात
व त्यांची भरभराट होते,
तरी त्यांच्यापुढे केवळ अनंतकालचा नाशच आहे.
8परंतु याहवेह तुम्ही सदासर्वकाळ सर्वोच्च आहात!
9हे याहवेह, तुमच्या सर्व शत्रूंचा,
निश्चितच सर्व शत्रूंचा नाश होईल,
आणि समस्त दुष्कर्म्यांची दाणादाण होईल.
10परंतु तुम्ही माझे शिंग#92:10 शिंग सामर्थ्याचे चिन्ह रानबैलासारखे उंच केले आहे;
नवीन तेलाने मला अभिषिक्त केले आहे.
11माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा पराजय पाहिला;
माझ्या विरोधकांची दाणादाण माझ्या कानांनी ऐकली.
12नीतिमान लोक खजुरीच्या झाडासारखे समृद्ध होतील,
ते लबानोनातील गंधसरूसारखे अभिवृद्ध होतील;
13जे याहवेहच्या घरात रोपलेले,
आणि परमेश्वराच्या अंगणात लावलेले आहेत, ते समृद्ध होतील.
14वृद्धापकाळातही ते फळे देतच राहतील,
आणि ते टवटवीत व हिरवेगार राहतील.
15ते ही घोषणा करतील, “याहवेह नीतिमान आहेत;
ते माझे खडक आहेत; त्यांच्यामध्ये दुष्टता नाही.”
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 92: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.