YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 90

90
चतुर्थ पुस्तक
स्तोत्रसंहिता 90–106
स्तोत्र 90
परमेश्वराचे प्रिय पात्र, मोशेची एक प्रार्थना
1हे प्रभू, पिढ्यान् पिढ्या
तुम्ही आमचे वसतिस्थान आहात.
2पर्वत निर्माण होण्यापूर्वी,
सृष्टीची घडण होण्यापूर्वी,
अनादि ते अंतापर्यंत तुम्हीच परमेश्वर आहात!
3“मर्त्य मनुष्या, मातीत परत जा” असे शब्द बोलून,
मनुष्याला तुम्ही मातीत परत पाठविता.
4हजार वर्षे ही तुम्हाला असे आहेत,
जसा कालचा गेलेला एक दिवस,
किंवा रात्रीचा एक प्रहर.
5तुम्ही लोकांना झटकन मृत करून असे नाहीसे करता—
जसे सकाळचे हिरवेगार कोमल गवत:
6ते सकाळी नवीन उगवते,
पण सायंकाळपर्यंत करपून जाते.
7तुमच्या क्रोधाने आम्ही भस्म होतो;
तुमच्या संतापाने आम्ही दडपून जातो.
8तुम्ही आमचे अपराध आपल्यापुढे पसरून ठेवता;
तुमच्या सानिध्यात आमची सर्व गुप्त पातकेही प्रकाशात येतात.
9तुमच्या क्रोधाच्या छायेखाली आम्ही आमचे जीवन जगतो;
कण्हत आमची वर्षे सरतात.
10आम्हाला सत्तर वर्षाचे आयुष्य दिले आहे;
आणि सशक्त असल्यास ऐंशी वर्षे;
परंतु यातील उत्तम वर्षेदेखील पुष्कळदा त्रास आणि दुःखे यांनीच भरलेली असतात;
लवकरच ती सरतात आणि आम्ही निघून जातो.
11तुमच्या संतापाची भयानकता जाणू शकलो असतो, तर बरे झाले असते!
तुमचा क्रोध तितकाच व्यापक आहे, जितकी त्याची भीती.
12आमच्या जीवनाचे दिवस मोजणे आम्हाला शिकवा,
जेणेकरून आमचे अंतःकरण सुज्ञ होईल.
13हे याहवेह, तुमच्या मनाला पाझर फुटू द्या, आणखी किती विलंब लागणार?
आपल्या सेवकांवर दया करा.
14सकाळच्या समयी तुमच्या अक्षयप्रीतीने आम्हाला तृप्त करा,
म्हणजे आम्ही आनंदात राहू व आमचे सर्व दिवस हर्षभरित होतील.
15तुम्ही जितके दिवस हालअपेष्टा भोगावयास लावले, तितके दिवस हर्षभरित करा,
त्या वर्षांच्या प्रमाणात आता आम्हाला आनंद द्या.
16तुमची गौरवशाली कृत्ये तुमच्या सेवकांना दिसो,
तुमचे वैभव त्यांची मुलेबाळे बघोत.
17आमच्या प्रभू परमेश्वराची कृपा#90:17 किंवा सौंदर्य आम्हावर होवो;
आणि आमची सर्व कार्ये सुस्थिर होवोत—
होय, आमच्या हाताच्या कार्यास सुस्थिरता येवो.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 90: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन