स्तोत्रसंहिता 88
88
स्तोत्र 88
एक गीत. कोरहाच्या पुत्रांची स्तोत्र रचना. संगीत निर्देशकाकरिता. माहालाथ लान्नोथ चालीवर आधारित. एज्रावंशी हेमानचा मासकील
1हे याहवेह, माझ्या तारणकर्त्या परमेश्वरा,
रात्रंदिवस मी तुमच्यापुढे आक्रोश करीत आहे;
2माझी प्रार्थना तुमच्यापर्यंत पोहचो;
माझ्या आरोळीकडे कान द्या.
3क्लेशांनी मला जेरीस आणले आहे
आणि माझे जीवन मृत्यूच्या जवळ येत आहे.
4गर्तेत पडणार्यांमध्ये माझी गणना झाली आहे;
जणू काही माझी सर्व शक्ती नष्ट झाली आहे.
5मृतांमध्ये मला असे टाकण्यात आले आहे,
जसे वधलेल्यास कबरेत ठेवतात,
आणि ज्यांचे तुम्हाला विस्मरण झाले आहे,
ज्यांना तुमच्या आश्रयापासून दूर करण्यात आले आहे.
6तुम्ही मला अत्यंत खोल दरीत ढकलून दिले आहे,
काळ्याकुट्ट डोहात टाकले आहे.
7तुमच्या क्रोधाचा भार मला फारच जड झाला आहे;
तुमच्या क्रोधाच्या लाटांनी मला पीडले आहे. सेला
8माझ्या जिवलग मित्रांना माझ्यापासून दूर करून,
त्यांना माझा वीट येईल, असे तुम्ही केले आहे.
मी कोंडलेला असून त्यातून बाहेर पडू शकत नाही.
9वेदनेने माझे डोळे म्लान झाले आहेत.
याहवेह, मी रोज तुमचा धावा करतो;
हात पसरून तुमच्याकडे विनंती करतो.
10कारण कबरेत गेलेल्यांमध्ये तुम्ही चमत्कार करणार काय?
जे मेलेले आहेत ते उठून तुझी स्तुती करतील काय. सेला
11तुमच्या प्रेमाची घोषणा कबरेत जाहीर होणार काय?
तुमची विश्वसनीयता विनाशात कशी प्रदर्शित होणार?
12अंधकारमय स्थान तुमची अद्भुत कृत्ये घोषित करेल काय?
अथवा विस्मरणाच्या भूमीत तुमच्या नीतिमत्तेची साक्ष देता येईल काय?
13परंतु हे याहवेह, मी तुमचा धावा करतो;
माझी प्रार्थना दररोज प्रातःकाळी तुमच्यापुढे सादर होवो.
14हे याहवेह, तुम्ही माझा त्याग का केला,
आणि आपले मुख माझ्यापासून का फिरविले?
15तारुण्यापासून मी दुःखी आणि मरणोन्मुख आहे;
तुमच्या भीतीने ग्रस्त होऊन मी असहाय झालो आहे.
16तुमच्या क्रोधाने मला ग्रासले आहे.
तुमच्या भीतीने माझा विध्वंस झाला आहे.
17त्याने दिवसभर जलप्रलयाप्रमाणे सर्व बाजूंनी घेरले आहे.
त्याने मला पूर्णपणे गिळंकृत केले आहे.
18माझे प्रियजन आणि शेजाऱ्यांना तुम्ही माझ्यापासून दूर केले—
अंधारच आता माझा घनिष्ठ मित्र झाला आहे.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 88: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.