स्तोत्रसंहिता 80
80
स्तोत्र 80
संगीत निर्देशकाकरिता. “कराराची कुमुदिनी” च्या चालीवर आधारित. आसाफाची रचना. एक स्तोत्र.
1इस्राएलाच्या मेंढपाळा, आमचा धावा ऐका,
तुम्हीच योसेफाला मेंढरांच्या कळपाप्रमाणे चालविले.
करुबांच्या मध्ये विराजमान असलेले,
तुमचे तेजस्वी गौरव प्रगट करा.
2एफ्राईम, बिन्यामीन व मनश्शेहच्या समोर आपली प्रतापी शक्ती जागृत होऊ द्या;
या व आमचे तारण करा.
3हे परमेश्वरा, आम्हाला पूर्वस्थितीत आणा;
आमचे तारण होण्यासाठी,
तुमचे मुख आमच्यावर प्रकाशित करा.
4हे याहवेह, सर्वशक्तिमान परमेश्वरा,
तुमच्या प्रजेच्या प्रार्थनांविरुद्ध,
कुठवर तुमचा क्रोध भडकत राहणार?
5तुम्ही त्यांना दुःखाच्या भाकरीचा आहार खाऊ घातला;
वाट्या भरून अश्रूंचे पेय त्यांना पाजले.
6तुम्ही आम्हाला शेजार्यांच्या निंदेचा विषय केले आहे;
ते आपसात आमचा उपहास करतात.
7हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, आमची पुनर्स्थापना करा;
आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडा,
म्हणजे आमचे तारण होईल.
8तुम्ही एक द्राक्षवेल इजिप्त देशातून आणली;
इतर राष्ट्रांना तिथून हाकलून तिला रुजविले.
9तुम्ही जमिनीची मशागत केली व ती नांगरली;
या वेलीने मूळ धरले व समस्त भूमी व्यापून टाकली.
10मजबूत गंधसरू व तिच्या फांद्यांच्या सावलीने
पर्वतदेखील झाकले गेले;
11त्या फांद्या समुद्रापर्यंत#80:11 किंवा भूमध्य समुद्रापर्यंत,
तसेच फरात नदीपर्यंत पसरत गेल्या.
12तुम्ही त्याचे तट का मोडून टाकले,
म्हणजे येणारे जाणारे सर्वजण त्याचे द्राक्ष तोडतील?
13रानडुकरे त्याला गिळंकृत करत आहेत,
आणि भूमीतील कीटकांचा ते आहार झाले आहेत.
14हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, आमच्याकडे परत या!
स्वर्गातून खाली दृष्टी लावा!
या द्राक्षवेलीची काळजी घ्या.
15तुम्ही स्वतःच उजव्या हाताने लावलेल्या,
स्वतःसाठी वाढविलेल्या या पुत्राकडे लक्ष द्या#80:15 किंवा फांदी.
16कारण तुमच्या द्राक्षवेलीला छाटले गेले आहे व अग्नीत भस्म केले जात आहे;
तुमच्या फटकारण्याने लोक नष्ट होतात.
17जो मनुष्य तुमच्या उजव्या बाजूला आहे त्याच्यावर तुमचा वरदहस्त असू द्या,
स्वतःसाठी वाढविलेल्या या पुत्राकडे लक्ष द्या.
18मग आम्ही तुमचा पुन्हा कधीही त्याग करणार नाही;
आम्हाला संजीवित करा, म्हणजे आम्ही तुमच्या नावाचा धावा करू.
19हे याहवेह, सर्वशक्तिमान परमेश्वरा, आम्हाला पुनर्स्थापित करा;
आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडा,
तरच आमचे तारण होईल.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 80: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.