YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 77

77
स्तोत्र 77
संगीत दिग्दर्शकासाठी. यदूथूनसाठी. आसाफाचे एक स्तोत्र. एक गीत.
1मी परमेश्वराकडे मदतीसाठी धावा केला;
परमेश्वराने माझे ऐकावे म्हणून मी त्यांचा धावा केला.
2माझ्या संकटाच्या वेळी मी प्रभूला हाक मारली;
रात्रीच्या वेळी न थकता मी त्यांच्याकडे हात पुढे करत राहिलो,
तरीही माझे सांत्वन झाले नाही.
3परमेश्वरा, मी कण्हत तुमचे स्मरण करतो;
मी मनन करताना माझा आत्मा क्षीण झाला आहे. सेला
4तुम्ही माझे डोळे बंद होऊ दिले नाही;
मला बोलताही येत नव्हते इतका मी खिन्न झालो होतो.
5मी पूर्वीच्या दिवसांबद्दल,
फार पूर्वीच्या वर्षांबद्दल विचार केला;
6रात्रीच्या वेळी मी माझी गाणी आठवीत असे;
माझे हृदय विचारमग्न होई आणि माझ्या आत्म्याने विचारले:
7“प्रभू कायमचाच आमचा त्याग करतील काय?
ते पुन्हा कधीच प्रसन्न होणार नाहीत काय?
8त्यांची प्रीतिपूर्ण दया कायमची नाहीशी झाली आहे काय?
त्यांनी दिलेले अभिवचन पिढ्यान् पिढ्या निष्फळ राहणार काय?
9परमेश्वर आपली दया दाखविण्याचे विसरले आहेत काय?
क्रोधाने त्यांनी आपला कळवळा रोखून धरला आहे काय?” सेला
10मग मी विचार केला, “खरेच माझ्या दुःखाचे कारण हे आहे:
की सर्वोच्च प्रभू परमेश्वराने त्यांचा उजवा हात रोखला आहे.
11मी याहवेहच्या कृत्यांचे स्मरण करेन;
पुरातन काळात त्यांनी केलेल्या अद्भुतकृत्यांची मी आठवण करेन.
12मी तुमच्या सर्व कृत्यांचे मनन करेन
आणि मी तुमच्या सर्व महत्कार्यांचा विचार करेन.”
13हे परमेश्वरा, तुमचे मार्ग पवित्र आहेत.
आपल्या परमेश्वरासारखा समर्थ ईश्वर कोणी आहे का?
14चमत्कार व अद्भुत गोष्टी करणारे परमेश्वर तुम्हीच आहात;
तुम्ही आपले सामर्थ्य लोकांमध्ये प्रगट करता.
15जे याकोबाचे आणि योसेफाचे वंशज आहेत,
त्यांना तुम्ही आपल्या भुजांनी मुक्त केले आहे. सेला
16परमेश्वरा, जलांनी तुम्हाला पाहिले,
जलांनी तुम्हाला पाहिले आणि ते धडपडू लागले!
त्यांच्या खोल तळापर्यंत धक्का बसला.
17मेघांनी मुसळधार पाऊस पाडला;
मेघगर्जनेने गडगडाट करून आकाश दुमदुमून टाकले;
तुमचे बाण आकाशातून या टोकापासून त्या टोकापर्यंत चमकले.
18चक्रीवादळामध्ये गर्जना झाली;
विजेच्या लखलखाटाने संपूर्ण जग प्रकाशित झाले;
पृथ्वी थरारली आणि डळमळली.
19तुमच्या पावलांचे ठसे दिसत नसले,
तरी तुमची वाट समुद्रातून गेली होती;
तुमचा मार्ग प्रचंड जलाशयातून गेला होता.
20मोशे व अहरोन यांच्याद्वारे
मेंढरांच्या कळपाप्रमाणे तुम्ही आपल्या लोकांना नेले.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 77: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन