YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 74

74
स्तोत्र 74
आसाफाचे मासकील
1हे परमेश्वरा, तुम्ही आम्हाला कायमचे टाकून दिले आहे का?
स्वतःच्या कुरणातील कळपावर तुमचा क्रोधाग्नी एवढा का भडकला आहे?
2जे राष्ट्र प्राचीन काळी मोलाने विकत घेतले,
ज्यांना आपले वारस होण्याकरिता तुम्ही खंडणी भरून सोडविले—
सीयोन पर्वत जे तुमचे वसतिस्थान, त्यांचे स्मरण करा.
3या नगरीचा जो भयानक विध्वंस झाला आहे, त्यात तुम्ही चालत जा,
शत्रूंनी पवित्रस्थानाची काय दुर्दशा केली आहे ती पाहा.
4तुमच्या सभागृहात त्यांनी आपल्या रणगर्जना केल्या,
आणि त्यांनी प्रमाण स्वरूप आपले ध्वज उभारले आहेत.
5दाट वृक्षांना कुर्‍हाडीने
उद्ध्वस्त करणार्‍या माणसांसारखे ते वागले.
6त्यांनी कुर्‍हाडी आणि घण घेऊन
सर्व कोरीव नक्षीकामांची मोडतोड करून तुकडे केले.
7त्यांनी तुमच्या मंदिराला आग लावून ते जमीनदोस्त केले;
त्यांनी तुमच्या नावाचे निवासस्थान भ्रष्ट केले.
8ते त्यांच्या मनात म्हणाले, “आम्ही अस्तित्वाचा मागमूसही आम्ही पुसून टाकू!”
देशात परमेश्वराची उपासना होत असलेली सर्व सभास्थाने त्यांनी जाळून टाकली.
9परमेश्वराकडून आम्हाला एकही चिन्ह मिळाले नाही;
आता कोणताही संदेष्टा उरला नाही,
हे असे कधीपर्यंत चालेल हे सांगणारा आमच्यात कोणी नाही.
10हे परमेश्वरा, किती वेळ शत्रू तुमचा उपहास करणार?
तुमच्या नावाची निंदा शत्रू सर्वकाळ करणार काय?
11तुम्ही आपला हात, आपला उजवा हात का आवरून धरला आहे?
आपल्या वस्त्रांमध्ये लपलेला हात बाहेर काढा आणि तुमच्या शत्रूचा संहार करा!
12परमेश्वर तुम्ही पुरातन काळापासून माझे राजे आहात;
पृथ्वीवर तारणाचे कार्य करणारे तुम्हीच आहात.
13तुम्हीच आपल्या शक्तीने समुद्र दुभागले;
तुम्हीच जलाशयातील प्रचंड प्राण्यांची मस्तके फोडली.
14लिव्याथानाची मस्तके तुम्हीच चिरडून टाकली;
तुम्हीच त्यांचे मांस वाळवंटातील पशूंना खाऊ घातले.
15तुम्हीच झरे उफाळून जलप्रवाह बाहेर आणले;
तुम्हीच सतत वाहणार्‍या नदीचे पाणी आटवून दिले.
16दिवस तुमचा आहे, रात्रही तुमचीच आहे;
सूर्य आणि चंद्र तुम्हीच निर्माण केले आहे.
17पृथ्वीच्या सर्व सीमा तुम्हीच निर्धारित केल्या आहेत;
उन्हाळा आणि हिवाळादेखील तुम्हीच निर्माण केले आहे.
18याहवेह, पाहा हे शत्रू तुमची कशी थट्टा करीत आहेत;
उन्मत्त राष्ट्राने तुमच्या नावाची कशी निंदा केली आहे, याचे स्मरण करा.
19आपल्या कबुतराचे जीवन हिंसक श्वापदाच्या हाती देऊ नका;
आपल्या पीडित प्रजेचे जीवन कायमचे विसरू नका.
20तुमच्या कराराचे स्मरण करा,
कारण पृथ्वीवरील काळोखाचे प्रदेश हिंसेची स्थाने झाली आहेत.
21पीडितांना अपमानात मागे फिरू देऊ नका;
दरिद्री आणि दुःखी तुमच्या नावाची स्तुती करोत.
22परमेश्वरा, उठा आणि आपला दावा स्वतःच चालवा;
मूर्ख तुमची दिवसभर अवहेलना करीत असतात, याची आठवण ठेवा.
23तुमच्या विरोधकांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करू नका,
तुमच्या शत्रूंचा कोलाहल क्षणोक्षणी वाढतच आहे.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 74: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन