YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 51

51
स्तोत्र 51
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे एक स्तोत्र. दावीद बथशेबाशी व्यभिचार केल्यावर नाथान संदेष्टा त्याच्याकडे आला तेव्हा.
1परमेश्वरा, तुमच्या
प्रेमदयेमुळे माझ्यावर दया करा,
तुमच्या महान करुणेनुसार
माझे अपराध पुसून टाका.
2मला धुऊन माझे अपराध काढून टाका
आणि माझ्या पापदोषापासून मला शुद्ध करा.
3कारण माझे अपराध मला माहीत आहेत;
माझी पापे नित्य माझ्यापुढे आहेत.
4तुमच्याविरुद्ध आणि केवळ तुमच्याविरुद्धच मी पातक केले आहे
आणि तुमच्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे;
म्हणून तुम्ही यथायोग्य न्याय दिला आहे
आणि जेव्हा तुम्ही न्याय देता तेव्हा ते दोषमुक्त असतात.
5मी तर जन्माचाच पापी आहे,
माझ्या आईने गर्भधारण केले, तेव्हापासूनच मी पातकी आहे.
6पाहा, अंतःकरणाची सत्यता तुम्हाला आवडते,
म्हणून माझ्या खोल अंतर्यामाला तुमच्या ज्ञानाचे शिक्षण दिले.
7एजोबाने मला स्वच्छ करा, म्हणजे मी शुद्ध होईन;
मला धुवा, म्हणजे मी हिमाहून पांढरा होईन.
8आनंदाची व हर्षाची वाणी मला ऐकू द्या;
म्हणजे तुम्ही चिरडलेली माझी हाडे प्रफुल्लित होतील.
9माझ्या पातकांपासून आपले मुख फिरवा
आणि माझे सर्व अपराध पुसून टाका.
10परमेश्वरा, माझ्यामध्ये शुद्ध हृदय निर्माण करा
आणि माझ्यात स्थिर असा आत्मा पुनर्स्थापन करा.
11मला आपल्या समक्षतेतून दूर करू नका
व तुमचा पवित्र आत्मा मजमधून काढून घेऊ नका.
12तुमच्या तारणाचा आनंद मला पुनरपि द्या
आणि स्वतःला सावरून घेण्यासाठी मला राजीपणाचा आत्मा द्या.
13तेव्हा मी अपराध्यांना तुमचे मार्ग शिकवेन,
म्हणजे पातकी तुमच्याकडे परत वळतील.
14परमेश्वरा, माझ्या तारणकर्ता परमेश्वरा,
मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त करा,
म्हणजे माझी जीभ तुमच्या नीतिमत्तेची स्तुती करेल.
15प्रभू, माझे ओठ उघडा,
म्हणजे माझे मुख तुमची स्तुती करेल.
16तुम्हाला यज्ञ आवडत नाही, नाहीतर मी तो केला असता;
तुम्ही होमार्पणाने प्रसन्न होत नाही.
17भग्न आत्मा हेच माझे अर्पण आहे,
हे परमेश्वरा, पश्चात्तापी आणि अनुतप्त हृदय
तुम्ही धिक्कारणार नाही.
18सीयोनचे हित करणे,
यरुशलेमेचे कोट बांधणे तुम्हाला प्रसन्न करो.
19मग तुम्ही नीतिमान लोकांचे यज्ञ
आणि सर्व होमार्पणाच्या यज्ञाने प्रसन्न व्हाल.
तेव्हा ते तुमच्या वेदीवर बैल अर्पित करतील.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 51: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन