YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 107

107
पांचवे पुस्तक
स्तोत्रसंहिता 107–150
स्तोत्र 107
1याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत;
त्यांची दया सनातन आहे.
2याहवेहनी मुक्त केलेल्यांनी त्याचे कथन करावे—
ज्यांची त्यांनी शत्रूपासून सुटका केली आहे,
3ज्यांना पूर्व आणि पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशेतून
एकत्र गोळा केले आहे.
4काहीजण उजाड प्रदेशातून भटकत होते,
त्यांना स्थावर होण्यासाठी शहराकडे जाणारा मार्ग सापडत नव्हता.
5भूक व तहान यांनी ते व्याकूळ झाले होते,
ते दुर्बल होऊ लागले होते.
6त्यांच्या संकटात त्यांनी याहवेहकडे आरोळी मारली
आणि याहवेहने या दुर्दशेतून त्यांना मुक्त केले.
7त्यांनी त्यांना एका अचूक मार्गाने चालविले,
आणि वस्ती करण्यास नगरात आणले.
8याहवेहच्या या अक्षय प्रीतीबद्दल व
त्यांनी सर्व मनुष्यास्तव केलेल्या
अद्भुतकार्याबद्दल ते त्यांचे उपकारस्मरण करोत.
9कारण ते तहानेल्यास तृप्त करतात,
आणि भुकेल्या जिवास उत्तम पदार्थांनी संतुष्ट करतात.
10काही अंधारात आणि गडद अंधकारात बसले होते,
लोखंडी साखळदंडांत यातना सहन करणारे बंदिवान होते,
11कारण त्यांनी परमेश्वराच्या आदेशाविरुद्ध बंडखोरी केली
आणि परमोच्चाच्या योजनेला तुच्छ मानले.
12मग त्यांनी त्यांना कठोर परिश्रम करण्यास भाग पाडले;
ते पडले आणि त्यांचे साहाय्य करण्यास कोणीही नव्हते.
13त्यांच्या संकटात त्यांनी याहवेहकडे आरोळी मारली
आणि याहवेहने या दुर्दशेतून त्यांना मुक्त केले.
14त्यांना काळोखातून आणि गडद अंधकारातून बाहेर आणले,
आणि त्यांचे साखळदंड तोडून टाकले.
15याहवेहच्या या अक्षय प्रीतीबद्दल व
त्यांनी सर्व मनुष्यास्तव केलेल्या
अद्भुतकार्याबद्दल ते त्यांचे उपकारस्मरण करोत.
16कारण त्यांनीच त्यांचे कास्याचे दरवाजे मोडले,
आणि त्यांच्या लोखंडी सळया कापून टाकल्या.
17काही लोकांनी त्यांच्या बंडखोर वृत्तीमुळे मूर्खपणा केला,
आणि त्यांनी केलेल्या पापामुळे ते पीडित झाले.
18त्यांना सर्व अन्नाचा तिटकारा वाटू लागला
आणि ते मृत्यू दारात पोहोचले होते.
19त्यांच्या संकटात त्यांनी याहवेहकडे आरोळी मारली
आणि याहवेहने या दुर्दशेतून त्यांना मुक्त केले.
20ते शब्द मात्र बोलले आणि लोक बरे झाले;
परमेश्वराने त्यांना कबरेतून बाहेर काढले.
21याहवेहच्या या अक्षय प्रीतीबद्दल व
त्यांनी सर्व मनुष्यास्तव केलेल्या
अद्भुतकार्याबद्दल ते त्यांचे उपकारस्मरण करोत.
22ते त्याला उपकारस्तुतीचे यज्ञ अर्पोत,
आणि हर्षगीते गाऊन त्यांच्या कृत्यांचे वर्णन करोत.
23काहीजण सागरात गलबतांमधून प्रवास करीत;
ते महासागरातून येजा करून व्यापार करीत.
24त्यांनी याहवेहची कृत्ये,
समुद्राच्या खोल तळाशी केलेले चमत्कार पाहिले.
25ते बोलले व सागरात प्रचंड उत्पात होऊन,
त्या वादळाने लाटा उंचच उंच उसळल्या.
26त्या वर आकाशापर्यंत जातात,
व मग समुद्रतळापर्यंत खाली येतात;
या धोक्यातून जाताना त्यांचा धीर खचतो.
27ते मद्यप्यांसारखे डुलतात, झोकांड्या खातात;
त्यांची मति कुंठित होते.
28त्यांच्या संकटात त्यांनी याहवेहकडे आरोळी मारली
आणि याहवेहने या दुर्दशेतून त्यांना मुक्त केले.
29त्यांनी वादळ असे शांत केले की ते कुजबुज करू लागले,
आणि समुद्राच्या लाटा अगदी स्तब्ध केल्या.
30ते शांत वातावरण बघून हे लोक हर्षित झाले,
याहवेहनी त्यांना सुखरुपपणे त्यांच्या इच्छित बंदरात आणले.
31याहवेहच्या या अक्षय प्रीतीबद्दल व
त्यांनी सर्व मनुष्यास्तव केलेल्या
अद्भुतकार्याबद्दल ते त्यांचे उपकारस्मरण करोत.
32लोकांच्या सभेत त्यांनी जाहीरपणे परमेश्वराचा जयजयकार करावा,
आणि पुढार्‍यांच्या सभेत त्यांची महिमा गावी.
33ते नद्या आटवून त्यांचे वाळवंट करतात,
आणि झरे आटवून त्यांची कोरडी भूमी करतात;
34आणि दुष्टांना त्यांच्या पातकाबद्दल शासन करण्यासाठी,
त्यांच्या चांगल्या भूमीचे ते क्षारभूमीत रूपांतर करतात.
35पुन्हा ते वाळवंटांचे जलमय भूमीत,
आणि शुष्क भूमीचे वाहत्या झर्‍यात रूपांतर करतात.
36तिथे वस्ती करण्यासाठी त्यांनी भुकेल्यांस आणले,
व त्या लोकांनी तिथे वस्ती करून शहरे स्थापित केली.
37त्या ठिकाणी त्यांनी शेती केली व आपले द्राक्षमळे लावले,
ज्यांची त्यांना भरघोस पिके मिळाली.
38त्यांनी त्यांना मोठा आशीर्वाद दिला,
त्यांची संख्या अनेक पटीने वाढली,
तिथे त्यांच्या गुरांचीही हानी होऊ दिली नाही.
39परंतु मग त्यांची संख्या घटली,
जुलूम, संकट आणि दुःख यामुळे ते लीन झाले.
40ते त्यांच्या सरदारांवर निंदा-वृष्टी करतात,
त्यांना बिनवाटेच्या टाकाऊ प्रदेशातून भटकवितात.
41परंतु गरजवंतांची ते पीडेतून सुटका करतात,
आणि त्यांच्या कुटुंबाची कळपासारखी भरभराट करतात.
42नीतिमान माणसे हे पाहून आनंदित होतील,
परंतु दुष्ट माणसांची तोंडे बंद होतील.
43ज्ञानी जणांनी या सर्व गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे
आणि याहवेहच्या प्रेममय कृत्यांचे चिंतन करावे.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 107: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन