नीतिसूत्रे 12
12
1जो अनुशासन प्रिय असतो, त्याला ज्ञान प्रिय असते,
परंतु ज्याला सुधारणा अप्रिय आहे, तो मूर्ख होय.
2नीतिमान लोकांना याहवेहची कृपा प्राप्त होते,
पण दुष्ट योजना रचणार्या मनुष्याला याहवेह दोषी ठरवितात.
3दुष्टाईने मनुष्य जीवनात स्थिर होत नाही,
परंतु नीतिमानाचे मूळ कधीही उखडले जाऊ शकत नाही.
4सद्गुणी स्त्री ही आपल्या पतीला मुकुटासारखी आहे,
परंतु लज्जास्पद आचरणाची स्त्री त्याच्या हाडातील कुजकेपणासारखी आहे.
5नीतिमान मनुष्याची योजना न्याय्य असते,
परंतु दुष्टाचा सल्ला कपटी असतो.
6दुष्टांचे शब्द रक्तपात करण्यासाठी टपून बसतात
परंतु नीतिमानाची वाणी त्यांची सुटका करते.
7दुर्जन उलथून टाकले जातात आणि ते नाहीसे होतात,
परंतु नीतिमानाचे घराणे स्थिर उभे असते.
8मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेच्या प्रमाणात होते,
परंतु विकृत बुद्धीचा मनुष्य घृणित लेखला जातो.
9स्वतःला प्रतिष्ठित दर्शवून अन्नाचा अभाव असण्यापेक्षा
सर्वसामान्य असून जवळ चाकर बाळगणारा असणे बरे.
10नीतिमान मनुष्य आपल्या पशूच्या गरजांची काळजी घेतो,
परंतु दुष्ट लोकांच्या अत्यंत दयेची कार्येही क्रूर असतात.
11जे आपल्या जमिनीची मशागत करतात, त्यांना विपुल अन्न प्राप्त होईल,
परंतु जे काल्पनिक गोष्टींच्या मागे धावतात, तो अक्कलशून्य असतात.
12दुष्ट मनुष्य दुर्जनांच्या लुटीची इच्छा करतो,
परंतु नीतिमानाचे मूळ टिकून राहते.
13दुष्ट माणसे त्यांच्या वाईट बोलण्याने जाळ्यात सापडतात,
आणि निर्दोष मनुष्य संकटातून बाहेर पडतो.
14ओठांच्या फळांनी मनुष्याला उत्तम गोष्टी लाभतात,
आणि हाताने केलेले परिश्रम त्यांना बक्षीस मिळवून देतात.
15मूर्खाच्या दृष्टीने त्याचाच मार्ग योग्य असतो;
परंतु जो शहाणा असतो, तो सल्ला ऐकतो.
16मूर्ख आपला क्रोध तत्काळ दर्शवितो,
परंतु सुज्ञ मनुष्य अपमानाकडे दुर्लक्ष करतो.
17प्रामाणिक साक्षीदार सत्य बोलतो,
परंतु खोटा साक्षीदार लबाड बोलतो.
18निष्काळजीपणाने बोललेला शब्द तलवारीसारखा वेध घेतो,
पण सुज्ञ मनुष्याचे बोलणे आरोग्यदायी असते.
19सत्याची वाणी काळाच्या कसोटीला उतरते;
लबाड जिव्हा ही क्षणिक आहे.
20दुष्ट योजना करणार्यांच्या हृदयात कपट असते,
पण शांतीची मसलत देणार्यांच्या हृदयात आनंद असतो.
21न्यायी मनुष्यावर काहीही आपत्ती येणार नाही,
परंतु दुष्ट लोक आपत्तींनी व्याप्त होतात.
22असत्य बोलणार्या ओठांची याहवेह घृणा करतात,
परंतु विश्वसनीय लोक त्यांना प्रसन्न करतात.
23सुज्ञ मनुष्य आपले ज्ञान प्रकट करीत नाही,
परंतु मूर्खाचे हृदय मूर्खपणाचे प्रसरण करतात.
24उद्योगी मनुष्यांचे हात सत्ता धारण करतील,
पण आळशी लोकांना गुलामगिरी प्राप्त होईल.
25चिंता हृदयावर दबाव आणते,
परंतु कोमल शब्द ते आनंदित करते.
26नीतिमान आपल्या मित्रांची काळजीपूर्वकरित्या निवड करतो,
परंतु दुष्ट लोकांचा मार्ग त्यांनाच बहकवितो.
27आळशी मनुष्याला शिकार मिळत नाही,
परंतु उद्योगी मनुष्याला भरपूर मिळकत प्राप्त होते.
28नीतिमानाचा मार्ग जीवनाकडे जातो,
व त्याच मार्गामधून अमरत्व मिळते.
सध्या निवडलेले:
नीतिसूत्रे 12: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.