गणना 35
35
लेवी लोकांना नेमून दिलेली शहरे
1यरीहो समोर मोआबाच्या मैदानात यार्देनजवळ याहवेह मोशेला म्हणाले, 2“इस्राएली लोकांना आज्ञा दे की त्यांना मिळालेल्या वतनातून लेवी लोकांना राहण्यासाठी त्यांनी नगरे आणि नगराभोवतालची कुरणेही द्यावीत. 3म्हणजे त्यांना राहण्यासाठी नगरे व त्यांच्या मालकीची असणारी त्यांची गुरे मेंढरे व सर्व इतर जनावरांसाठी कुरणे असावीत.
4“नगराभोवतालची जी कुरणे तुम्ही लेवी लोकांना देणार ती नगराच्या कुसापासून एक हजार हात#35:4 अंदाजे 450 मीटर असावी. 5नगराबाहेर पूर्वेच्या दिशेने दोन हजार हात#35:5 अंदाजे 900 मीटर, दक्षिणेच्या दिशेने दोन हजार हात, पश्चिमेकडे दोन हजार हात व दोन हजार हात उत्तरेकडे मोजावे आणि नगर मध्यभागी असावे. हाच भाग त्यांच्या नगरांसाठी कुरण म्हणून असावा.”
आश्रयाची शहरे
6“लेवी लोकांना जी शहरे तुम्ही द्याल, त्यापैकी सहा शहरे आश्रयाची शहरे म्हणून असावीत, जर एखाद्या व्यक्तीने कोणाला जिवे मारले तर त्याने त्यात पळून जावे. त्याचबरोबर इतर बेचाळीस नगरे लेवी लोकांना द्यावीत. 7अशी लेवी लोकांना त्यांच्या कुरणांसह एकंदर अठ्ठेचाळीस नगरे द्यावीत. 8लेवी लोकांना जी नगरे तुम्ही द्याल ती इस्राएली लोकांच्या प्रत्येक गोत्राला मिळालेल्या वतनाच्या प्रमाणात: म्हणजे ज्यांना पुष्कळ नगरे मिळाली त्यांच्याकडून पुष्कळ, परंतु ज्यांना थोडी नगरे मिळाली त्यांच्याकडून थोडी नगरे घेऊन द्यावीत.”
9नंतर याहवेह मोशेला म्हणाले: 10“इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग: जेव्हा तुम्ही यार्देन पार करून कनानमध्ये जाल, 11तुमच्यासाठी आश्रयनगरे व्हावी म्हणून तुम्ही काही शहरे निवडून ठेवा, म्हणजे कोणी एखाद्याला चुकून जिवे मारले तर त्याने तिथे पळून जावे. 12सूड घेणार्यापासून आश्रय म्हणून ही नगरे तुमच्यासाठी असावीत, अशासाठी की खुनी असल्याचा दोष असणारा, मंडळीसमोर खटला होण्यापूर्वीच मारला जाऊ नये. 13ही जी सहा नगरे तुम्ही द्याल ती तुमच्यासाठी आश्रयाची नगरे म्हणून असतील. 14या आश्रयाच्या नगरांपैकी तीन नगरे यार्देनेच्या अलीकडे व तीन कनानमध्ये असावीत. 15ही सहा नगरे इस्राएली लोकांसाठी व त्यांच्यामध्ये रहिवासी असलेल्या परदेशीयांसाठी सुद्धा आश्रयाचे ठिकाण असे असावे, अशासाठी की कोणी एखाद्याला चुकीने जिवे मारले असता त्याने त्या ठिकाणी पळून जावे.
16“ ‘जर कोणा व्यक्तीने लोखंडी वस्तूने एखाद्यावर घातक हल्ला केला, तर तो व्यक्ती खुनी आहे; खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे. 17किंवा कोणी दगड घेऊन एखाद्यावर घातक हल्ला करतो, तो व्यक्ती खुनी आहे; खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे. 18किंवा कोणी लाकडी वस्तू घेऊन एखाद्यावर घातक हल्ला करतो, तो व्यक्ती खुनी आहे; त्या खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे. 19रक्ताचा सूड घेणार्याने त्या खुनी मनुष्याला जिवे मारावे; जेव्हा सूड घेणार्याला खुनी मनुष्य सापडेल; सूड घेणार्याने खुनी मनुष्याला जिवे मारावे. 20जर कोणी एखाद्याला द्वेषभावनेने लोटून दिले किंवा त्याने मरावे अशा हेतूने काही फेकून मारले 21किंवा जर वैरभावाने एखाद्याला बुक्की मारली व तो मेला, तर त्या व्यक्तीला मारून टाकले जावे; कारण तो खुनी आहे. रक्ताचा सूड घेणारा जेव्हा त्या खुनी व्यक्तीला भेटेल तेव्हा त्याने त्याला अवश्य जिवे मारावे.
22“ ‘पण काही शत्रुत्व नसताना अचानक कोणी एखाद्याला ढकलतो किंवा चुकीने त्यांच्यावर एखादी वस्तू फेकतो 23किंवा न पाहताच त्यांना मारून टाकू शकेल असा जड दगड त्यांच्यावर टाकेल, व तो व्यक्ती जर मेला, परंतु ज्याने मारले तो त्याचा शत्रू नव्हता व त्याने ती हानी मुद्दाम केली नाही, 24म्हणून मंडळीने या नियमानुसार आरोपी आणि रक्ताचा सूड घेणारा यांच्यात न्याय करावा. 25खुनाचा आरोप असलेल्या व्यक्तीला मंडळीने रक्ताचा सूड घेणार्यापासून वाचवावे व तो ज्या आश्रयाच्या नगराकडे पळून गेला होता त्याकडे त्याला पाठवावे. पवित्र तेलाने अभिषेक झालेल्या मुख्य याजकाचा मृत्यू होईपर्यंत आरोपी मनुष्याने तिथेच राहावे.
26“ ‘परंतु आरोपी ज्या आश्रय नगरात पळून गेला आहे त्याच्या सीमेबाहेर गेला 27आणि रक्ताचा सूड घेणार्याला तो शहराच्या बाहेर सापडला आणि रक्ताचा सूड घेणार्याने त्याला जिवे मारले तर त्या खुनासाठी तो दोषी ठरणार नाही. 28कारण आरोपीने त्या आश्रयाच्या नगरात महायाजकाचा मृत्यू होईपर्यंत राहिले पाहिजे; महायाजकाच्या मृत्यूनंतर त्याने आपल्या स्वतःच्या घरी जावे.
29“ ‘हे सर्व तुमच्या येणार्या पिढ्यांसाठी तुम्ही जिथे वस्ती कराल तिथे तुमच्या न्यायाचे नियम म्हणून असावे.
30“ ‘जो कोणी एखाद्याचा खून करतो त्याला केवळ साक्षीदाराच्या साक्षीनुसारच जिवे मारावे. परंतु केवळ एकाच साक्षीच्या आधारावर कोणाला जिवे मारू नये.
31“ ‘खुनी व्यक्तीच्या जिवासाठी खंडणी स्वीकारू नये, जो दोषी मरणास पात्र आहे त्याला अवश्य जिवे मारावे.
32“ ‘जो आश्रयाच्या नगरात पळून गेला आहे, त्याने महायाजकाच्या मृत्यूच्या आधी आपल्या स्वतःच्या घरी जाऊन राहावे म्हणून त्याच्या जिवासाठी खंडणी स्वीकारू नये.
33“ ‘तुम्ही राहत असलेला देश भ्रष्ट करू नका. रक्तपाताने देश भ्रष्ट होतो आणि ज्या देशात रक्तपात होतो त्याच्यासाठी ज्याने रक्तपात केला त्याच्या रक्ताशिवाय प्रायश्चित होऊ शकत नाही. 34ज्या देशात तुम्ही राहता व जिथे मी निवास करतो तो तुम्ही अशुद्ध करू नये, कारण मी याहवेह इस्राएली लोकांमध्ये निवास करतो.’ ”
सध्या निवडलेले:
गणना 35: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.