YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 36

36
सलाफहादच्या कन्यांचे वतन
1योसेफाच्या वंशाच्या कुळातील, मनश्शेहचा पुत्र माखीरचा पुत्र गिलआदच्या कुटुंबाचे कुलप्रमुख मोशे व पुढारी, म्हणजे इस्राएली कुटुंबाच्या पुढाऱ्यांपुढे येऊन बोलले. 2ते म्हणाले, “माझ्या प्रभूला याहवेहने आज्ञा दिली की इस्राएली लोकांना हा देश चिठ्ठ्या टाकून वतन म्हणून द्यावा, याहवेहने तुला आज्ञा दिली की आमचा भाऊ सलाफहादचे वतन त्याच्या मुलींना द्यावे. 3परंतु त्यांनी जर इस्राएलातील इतर गोत्रातील पुरुषांशी लग्न केले, तर त्यांचे वतन आमच्या पूर्वजांच्या वतनातून काढून ज्या गोत्रात त्या लग्न करून जातील त्यांच्यात जोडले जाईल. म्हणजे आम्हाला मिळालेल्या वतनाचा भाग काढून घेतला जाईल. 4आणि जेव्हा इस्राएल लोकांचे योबेल वर्ष येईल, तेव्हा त्यांचे वतन ज्या गोत्रात ते लग्न करून जातील त्यांच्यात जोडले जाईल आणि त्यांचे वतन आमच्या पूर्वजांच्या गोत्रातून काढून घेतले जाईल.”
5नंतर याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने इस्राएली लोकांना हा हुकूम दिला: “योसेफाच्या गोत्राचे वंशज जे म्हणत आहेत ते बरोबर आहे. 6सलाफहादच्या कन्यांसंबंधी याहवेह अशी आज्ञा देतात: त्यांना आवडेल त्या व्यक्तीशी त्यांनी विवाह करावा, परंतु आपल्याच पित्याच्या गोत्राच्या कुळात त्यांनी विवाह करावा. 7इस्राएलचे वतन एका गोत्रातून दुसर्‍या गोत्रात जाऊ नये, तर प्रत्येक इस्राएली व्यक्तीने आपल्या पूर्वजांच्या गोत्राच्या वतनाला जपावे. 8इस्राएली लोकांतील कोणत्याही गोत्रातील ज्या प्रत्येक मुलीला वतन मिळाले असेल, तिने आपल्या पित्याच्या गोत्राच्या कुळातील एखाद्या व्यक्तीशी विवाह करावा, यासाठी की प्रत्येक इस्राएली व्यक्तीला आपल्या पूर्वजांचे वतन मिळेल. 9कोणतेही वतन एका गोत्रातून दुसर्‍या गोत्रात जाणार नाही, तर इस्राएली लोकांच्या प्रत्येक गोत्राने आपल्या वतनाला जपावे.”
10याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञेनुसार सलाफहादच्या कन्यांनी केले. 11सलाफहादच्या कन्या म्हणजे महलाह, तिरजाह, होगलाह, मिल्काह व नोआहने त्यांच्या पित्याच्या चुलत भावांशी विवाह केला. 12त्यांनी योसेफाचा पुत्र मनश्शेहच्या गोत्राच्या कुळातच विवाह केला व त्यांचे वतन त्यांच्या पित्याच्या गोत्रात व कुळातच राहिले.
13मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनकडे मोशेद्वारे याहवेहने इस्राएली लोकांसाठी ज्या आज्ञा व नियम लावून दिले ते हेच आहेत.

सध्या निवडलेले:

गणना 36: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन