गणना 32
32
यार्देनेच्या पूर्वेकडील गोत्र
1रऊबेन गोत्राचे लोक व गाद गोत्राच्या लोकांकडे मोठी खिल्लारे व कळपे होती. त्यांनी पाहिले की याजेर आणि गिलआद हे प्रांत कळपासाठी उत्तम आहेत. 2म्हणून गाद गोत्राचे व रऊबेन गोत्राचे लोक मोशे, एलअज़ार याजक व समाजाच्या पुढाऱ्यांकडे आले आणि म्हणाले, 3“अतारोथ, दिबोन, याजेर, निमराह, हेशबोन, एलिआलेह, सेबाम, नबो व बेओन; 4हा प्रांत जो याहवेहने इस्राएली लोकांपुढे कब्जा केला आहे, तो गुरांसाठी उत्तम आहे आणि तुझ्या सेवकांजवळ गुरे आहेत.” 5ते म्हणाले, “जर आम्ही तुझ्या दृष्टीत कृपा पावलो असलो तर हा प्रदेश तुझ्या सेवकांना आमचे वतन असा दिला जावा. आम्हाला यार्देनच्या पलीकडे नेऊ नकोस.”
6मोशे गाद गोत्राच्या व रऊबेन गोत्राच्या लोकांना म्हणाला, “इस्राएलमधील तुमचे इतर भाऊ युद्धाला जातील तेव्हा तुम्ही इथे बसून राहावे काय? 7याहवेहने जो देश त्यांना देऊ केला आहे, त्यात जाण्यासाठी तुम्ही इस्राएली लोकांना का निराश करता? 8मी तुमच्या पूर्वजांना कादेश-बरनेआपासून देश हेरायला पाठवले तेव्हाही त्यांनी असेच केले होते. 9अष्कोलच्या खोर्यापर्यंत गेल्यानंतर त्यांनी देश पाहिला व जो देश याहवेहने त्यांना दिला होता त्यात जाण्यापासून त्यांनी इस्राएली लोकांना निराश केले. 10त्या दिवशी याहवेहचा क्रोध भडकला आणि त्यांनी ही शपथ वाहिली: 11‘कारण त्यांनी पूर्ण अंतःकरणाने मला अनुसरले नाही, म्हणून इजिप्तमधून बाहेर येताना ज्यांचे वय वीस वर्षे व त्याहून अधिक होते त्यातील एकही, जो देश मी अब्राहाम, इसहाक व याकोबाला शपथ घेऊन देऊ केला तो पाहणार नाही; 12कनिज्जी यफुन्नेहचा पुत्र कालेब आणि नूनाचा पुत्र यहोशुआ मात्र तो पाहतील, कारण त्यांनी याहवेहला पूर्ण हृदयाने अनुसरले.’ 13याहवेहचा क्रोध इस्राएलवर भडकला व ज्या पिढीने याहवेहच्या दृष्टीने दुष्टाई केली होती त्या सर्वांचा नाश होईपर्यंत याहवेहने इस्राएली लोकांना चाळीस वर्षे रानात भटकण्यास लावले.
14“आणि पाहा, पातक्यांच्या पिल्लांनो, इस्राएलावर याहवेहचा राग आणखी वाढविण्यासाठी तुम्ही तुमच्या पित्याच्या जागी उभे राहिला आहात. 15जर तुम्ही याहवेहच्या मागे चालण्यापासून दूर फिराल, तर याहवेह या इस्राएली लोकांना पुन्हा रानात सोडून देतील व तुम्ही त्यांच्या नाशास कारणीभूत ठराल.”
16नंतर ते मोशेकडे येऊन त्याला म्हणाले, “येथे आम्ही आमच्या गुरामेंढरांसाठी मेंढवाडे व आमच्या स्त्रिया व लेकरांसाठी नगरे बांधू. 17परंतु आम्ही स्वतःला युद्धासाठी सशस्त्र करू व इस्राएली लोकांना त्यांच्या ठिकाणी पोहचवेपर्यंत त्यांच्यापुढे जाऊ. तोपर्यंत आमच्या स्त्रिया व लेकरे देशातील रहिवाशांपासून तटबंदीच्या नगरात सुरक्षित राहतील. 18प्रत्येक इस्राएली व्यक्तीला आपले वतन मिळेपर्यंत आम्ही आमच्या घरी परत जाणार नाही. 19यार्देन नदीच्या पलीकडे त्यांच्याबरोबर आम्ही कोणतेही वतन घेणार नाही, कारण आमचे वतन आम्हाला यार्देनेच्या पूर्वेस मिळाले आहे.”
20तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, “जर तुम्ही हे कराल, म्हणजे जर तुम्ही याहवेहसमोर युद्धासाठी स्वतःला हत्यारबंद कराल 21आणि याहवेह आपल्या शत्रूंना आपल्यासमोरून घालवून देईपर्यंत तुम्ही सर्व जे हत्यारबंद झालेले आहात, ते याहवेहच्या पुढे यार्देन पार कराल; 22तर जेव्हा याहवेहपुढे देश ताब्यात घेतला जाईल, तेव्हा तुम्ही परत जा व याहवेहच्या व इस्राएलच्या कर्तव्यातून तुम्ही मुक्त व्हाल आणि हा देश याहवेहसमोर तुमचे वतन होईल.
23“परंतु तुम्ही असे करण्यास चुकला, तर तुम्ही याहवेहविरुद्ध पाप कराल; आणि खचितच तुमचे पाप तुम्हाला शोधणार. 24तुमच्या स्त्रिया व लेकरांकरिता नगरे व तुमच्या गुरामेंढरांकरिता वाडे बांधा, परंतु तुम्ही वचन दिल्याप्रमाणे करा.”
25गाद आणि रऊबेन गोत्राच्या लोकांनी मोशेला म्हटले, “आम्ही तुझे सेवक, आमच्या प्रभूच्या आज्ञेप्रमाणे करू. 26आमची लेकरे, स्त्रिया, आमचे कळप आणि गुरे या ठिकाणी गिलआदाच्या शहरांमध्ये राहतील. 27पण तुझे सेवक, म्हणजे युद्धासाठी हत्यारबंद झालेला प्रत्येक पुरुष, जसे आमचे प्रभू सांगतात त्याप्रमाणेच युद्धासाठी याहवेहपुढे पार जातील.”
28नंतर मोशेने एलअज़ार याजकाला व नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएली गोत्राच्या कुटुंबप्रमुखांना आज्ञा दिली. 29मोशे त्यांना म्हणाला, “जर गाद आणि रऊबेन गोत्राचे लोक, त्यांच्यातील प्रत्येक पुरुष जो युद्धासाठी हत्यारबंद झालेला, याहवेहसमोर तुमच्याबरोबर यार्देन पार करतील, जेव्हा तुमच्यापुढे देश ताब्यात घेतला जाईल, तेव्हा तुम्ही गिलआदाचा प्रांत त्यांना त्यांचे वतन म्हणून द्यावा. 30पण ते जर तुमच्याबरोबर हत्यारबंद होऊन पार गेले नाहीत, तर त्यांनी कनान देशात तुमच्याबरोबर वतन स्वीकारावे.”
31गाद आणि रऊबेन गोत्राच्या लोकांनी उत्तर दिले, “तुझे सेवक तेच करतील जे याहवेहने सांगितले आहे. 32आम्ही हत्यारबंद होऊन याहवेहपुढे कनान देशात पार जाऊ, परंतु आमचे वतन यार्देनेच्या अलीकडे असणार.”
33तेव्हा मोशेने गाद गोत्राचे लोक, रऊबेन गोत्राचे लोक आणि योसेफाचा पुत्र मनश्शेहचे अर्ध्या गोत्रांना अमोर्यांचा राजा सीहोनाचे राज्य आणि बाशानचा राजा ओगच्या राज्याचा सर्व प्रदेश, शहरे व चहूकडील नगरे दिली.
34गाद गोत्राच्या लोकांनी दिबोन, अतारोथ, अरोएर, 35अटरोथ-शोफान, याजेर, योगबेहाह, 36बेथ-निमराह व बेथ-हारान ही सर्व तटबंदीची नगरे बांधली व त्यांच्या कळपासाठी मेंढवाडे सुद्धा बांधले. 37रऊबेन गोत्राच्या लोकांनी हेशबोन, एलिआलेह, आणि किर्याथाईमची पुनर्बांधणी केली, 38याशिवाय नबो, बआल-मेओन (यांची नावे बदलली गेली) व सिबमाह हे देखील. ज्या नगरांची त्यांनी पुनर्बांधणी केली त्या नगरांना त्यांनीच नावे दिली.
39मनश्शेहचा पुत्र माखीरचे वंशज गिलआद प्रांताकडे गेले, त्यावर ताबा करून तिथे असलेल्या अमोरी लोकांना तिथून घालवून दिले. 40म्हणून मोशेने मनश्शेहचे वंशज माखीरी लोकांना गिलआद प्रांत देऊ केला आणि ते तिथे स्थायिक झाले. 41मनश्शेहचे वंशज याईरी लोकांनी एका नगराला ताब्यात घेतले व त्याचे नाव हव्वोथ-याईर#32:41 म्हणजे याईराची वस्ती असे ठेवले. 42आणि नोबाहने केनाथ आणि त्याच्या परिसरातील वस्त्या ताब्यात घेतल्या व त्याला नोबाह असे आपलेच नाव दिले.
सध्या निवडलेले:
गणना 32: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.