YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 30

30
नवसांविषयीचे नियम
1मोशे इस्राएली लोकांच्या गोत्रांच्या पुढार्‍यांशी बोलला: “याहवेहने जे आज्ञापिले ते हे: 2जेव्हा एखादा पुरुष याहवेहला नवस करतो किंवा शपथ घेऊन स्वतःला बांधील करण्याचे वचन देतो, तेव्हा त्याने त्याचा शब्द मोडू नये व बोलल्याप्रमाणे त्याने ते करावे.
3“एखादी स्त्री अजूनही आपल्या पित्याच्या घरात राहून याहवेहस नवस करते किंवा वचन देऊन स्वतःला बांधील करते 4आणि तिचा नवस किंवा शपथ याविषयी तिच्या पित्याने ऐकले आणि तिला काही बोलला नाही, तर ते वचन तिच्यावर कायम राहील. 5परंतु ते ऐकून त्याने तिला मना केले तर तिचे नवस व शपथ यापैकी कोणतेही कायम राहणार नाही; कारण तिच्या पित्याने तिला मनाई केली, म्हणून याहवेह तिला क्षमा करतील.
6“तिने नवस केल्यावर किंवा तिच्या ओठांनी अविचाराने शपथ उच्चारली व स्वतःला बांधील केल्यानंतर जर तिने विवाह केला 7आणि तिच्या पतीने त्याविषयी ऐकले आणि तिला काही बोलला नाही, तर तिचे नवस किंवा शपथ ज्याने तिने स्वतःला बांधील केले ते तिच्यावर कायम राहील. 8पण त्याविषयी ऐकून जर तिच्या पतीने तिला मनाई केली, तर ज्या नवसाने व शपथेने तिने स्वतःला बांधील करून घेतले आहे, ते तो रद्द करतो व याहवेह तिला क्षमा करतील.
9“विधवा किंवा घटस्फोट झालेली स्त्री शपथेने किंवा नवसाने स्वतःला बांधील करून घेते, तर ते तिच्यावर कायम राहील.
10“आपल्या पतीबरोबर राहून एखादी स्त्री जर नवस करते किंवा स्वतःला बांधील करून शपथ घेते 11आणि तिचा पती त्याविषयी ऐकून तिला काही बोलत नाही किंवा तिला मनाई करीत नाही, तर ज्या नवसांनी व शपथांनी तिने स्वतःला बांधील करून घेतले आहे ते कायम राहतील. 12पण त्याविषयी ऐकून जर त्याने ते रद्द केले, तर तिच्या मुखातून आलेले कोणतेही नवस किंवा शपथ कायम राहणार नाहीत. तिच्या पतीने ते रद्द केले आहेत आणि याहवेह तिला क्षमा करतील. 13तिचा पती तिने केलेला नवस किंवा स्वतःचा त्याग करण्यासाठी घेतलेली शपथ कायम करेल किंवा रद्द करेल. 14पण रोजच्यारोज जर तिचा पती त्याविषयी तिला काहीही बोलत नाही, तर तिने केलेले सर्व नवस व शपथ ज्यांनी तिने स्वतःला बद्ध करून घेतले आहे ते तो कायम करतो. तो काहीही बोलला नाही म्हणून तिने केलेले नवस तो कायम करतो. 15पण ते ऐकल्यानंतर काही काळाने जर त्याने ते रद्द केले, तर तिचा दोष त्याला भोगावा लागेल.”
16पुरुष व त्याची पत्नी, यांच्यामधील नाते व पिता व त्याची तरुण मुलगी जी अजूनही त्याच्या घरात राहते यांच्यामधील नाते याविषयी याहवेहने मोशेला दिलेले नियम ते हे आहेत.

सध्या निवडलेले:

गणना 30: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन