गणना 28
28
दैनंदिन अर्पणे
1याहवेहने मोशेला म्हटले, 2“इस्राएली लोकांना ही आज्ञा दे व त्यांना सांग: ‘तुम्ही मला नेमलेल्या वेळी मला आवडेल असे सुवासिक अन्नार्पण मला निश्चितपणे सादर करावे.’ 3त्यांना सांग: ‘जे अन्नार्पण तुम्ही याहवेहला सादर करावे ते हे: एक वर्षाची दोन निर्दोष कोकरे, जी दररोज नियमितपणे होमार्पण म्हणून अर्पण करावी. 4एक कोकरू सकाळी व दुसरे संध्याकाळी अर्पण करावे. 5त्याबरोबर धान्यार्पणासाठी एक एफाचा दहावा भाग#28:5 अंदाजे1.6 कि.ग्रॅ. बारीक पीठ, कुटून काढलेल्या एक पाव हीन#28:5 अंदाजे 1लीटर जैतुनाच्या तेलात मळून अर्पण करावे. 6सीनाय पर्वतावर स्थापित केलेले हे नियमितपणाचे होमार्पण याहवेहला आवडणारे सुवासिक अन्नार्पण आहे. 7त्याबरोबरचे पेयार्पण, एका कोकर्याबरोबर एक पाव आंबवलेले पेय असावे. हे पेयार्पण याहवेहसाठी पवित्रस्थानी ओतावे. 8दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे, सकाळच्या अर्पणाप्रमाणे धान्यार्पण व पेयार्पण यासहित अर्पण करावे. हे अन्नार्पण याहवेहसाठी सुवासिक अर्पण आहे.’ ”
शब्बाथाची अर्पणे
9“शब्बाथ दिवशी एक वर्षाची दोन निर्दोष कोकरे, व त्याबरोबर पेयार्पण व जैतुनाच्या तेलात मळलेले एका एफाचे दोन दशांश#28:9 अंदाजे 3.2 कि.ग्रॅ. बारीक पीठ धान्यार्पण असे अर्पण करावे. 10नियमित होमार्पण व त्याचे पेयार्पण याशिवाय प्रत्येक शब्बाथ दिवसाचे हे होमार्पण आहे.
मासिक अर्पणे
11“प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी दोन तरुण गोर्हे, एक मेंढा आणि एक वर्षाची सात कोकरे होमार्पण म्हणून याहवेहसाठी अर्पण करावे, हे सर्व निर्दोष असावेत. 12प्रत्येक गोर्ह्याबरोबर धान्यार्पण म्हणून तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश#28:12 अंदाजे 5 कि.ग्रॅ. बारीक पीठ; आणि एका मेंढ्याबरोबर धान्यार्पण म्हणून तेलात मळलेले दोन दशांश बारीक पीठ; 13आणि प्रत्येक कोकर्याबरोबर धान्यार्पण म्हणून तेलात मळलेले एक दशांश बारीक पीठ अर्पण करावे. हे होमार्पण सुवासिक अर्पण, अन्नार्पण म्हणून याहवेहसाठी सादर करावे. 14प्रत्येक गोर्ह्याबरोबर अर्धा हीन#28:14 अंदाजे 1.9 लीटर पेयार्पण; आणि प्रत्येक मेंढ्याबरोबर एकतृतीयांश हीन#28:14 अंदाजे 1.3 लीटर, व प्रत्येक कोकर्याबरोबर एक पाव हीन#28:14 अंदाजे 1 लीटर द्राक्षारस आणावा. वर्षभरातील प्रत्येक पोर्णिमेच्या दिवशी करावयाचे हे मासिक होमार्पण आहे. 15नियमित होमार्पण व त्याचे पेयार्पण याशिवाय एक बोकड पापार्पण म्हणून याहवेहला सादर करावा.
वल्हांडण
16“ ‘पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी तुम्ही याहवेहचा वल्हांडण पाळावा. 17या महिन्याच्या पंधराव्या दिवशीही सण पाळावा; सात दिवस खमीर न घातलेली भाकर खावी. 18पहिल्या दिवशी एक पवित्र सभा भरवावी व कोणतेही नियमित कामे करू नये. 19याहवेहसाठी अन्नार्पण सादर करा, म्हणजेच दोन तरुण गोर्हे, एक मेंढा व एक वर्षाची सात कोकरे यांचे होमार्पण करा, हे सर्व निर्दोष असावे. 20प्रत्येक गोर्ह्याबरोबर तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पीठ व मेंढ्याबरोबर दोन दशांश असे धान्यार्पण करावे. 21व सात कोकर्यातील प्रत्येकासाठी, एफाचा एक दशांश अर्पावा. 22आणि तुमच्यासाठी प्रायश्चित व्हावे म्हणून एक बोकड पापार्पण म्हणून अर्पावा. 23ही अर्पणे सकाळच्या नियमित होमार्पणाखेरीज असावीत. 24अशाप्रकारे सात दिवस दररोज याहवेहसाठी सुवास म्हणून हे अन्नार्पण करावे; नियमित होमार्पण व त्याचे पेयार्पण याबरोबरच ही अर्पणे अर्पावीत. 25सातव्या दिवशी पवित्र सभा भरवावी आणि नियमित कामे करू नये.
आठवड्याचा सण
26“ ‘प्रथमफळांच्या दिवशी, जेव्हा तुम्ही आठवड्याच्या सणाच्या वेळी याहवेहला नवीन धान्याचे अर्पण करता, तेव्हा पवित्र सभा बोलवा आणि नियमित कामे करू नका. 27याहवेहला सुवासिक होमार्पण म्हणून दोन तरुण गोर्हे, एक मेंढा व एक वर्षाची सात नरकोकरे अर्पण करा. 28प्रत्येक गोर्ह्याबरोबर तेलात मळलेले एका एफाचे तीन दशांश बारीक पीठ यांचे धान्यार्पण करावे; गोर्ह्याबरोबर दोन दशांश; 29आणि सात कोकर्यांकरिता प्रत्येकी एक दशांश बारीक पीठ अर्पावे. 30तुमच्यासाठी प्रायश्चित व्हावे म्हणून एक बोकड अर्पावा. 31नियमित होमार्पण व त्याचे धान्यार्पण याबरोबरच ही अर्पणे त्यांच्या पेयार्पणासह अर्पावीत. गुरे निर्दोष असतील याची खात्री करावी.
सध्या निवडलेले:
गणना 28: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapi.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fmr.png&w=128&q=75)
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.