YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 9:1-17

लूक 9:1-17 MRCV

जेव्हा येशूंनी त्यांच्या बारा जणांना एकत्र बोलावले, तेव्हा त्यांना अशुद्ध आत्म्यांना घालवून देण्याचा व प्रत्येक रोग व दुःखणी बरे करण्याचा अधिकार दिला. नंतर त्यांनी आपल्या बारा शिष्यांना परमेश्वराच्या राज्याची घोषणा करण्यास व आजार्‍यांना बरे करण्यास पाठविले. येशूंनी त्यांना सांगितले, “प्रवासाला जाताना बरोबर काही घेऊ नका, काठी, झोळी, अन्न किंवा पैसा, अधिक अंगरखा घेऊ नका. एखाद्या घरामध्ये प्रवेश कराल, तेव्हा ते गाव सोडेपर्यंत तेथेच राहा. जर एखाद्या गावातील लोक तुमचे स्वागत करत नाहीत, तर त्या गावातून बाहेर पडा आणि ही त्यांच्याविरुद्ध साक्ष राहील म्हणून तुमच्या पायांची धूळ तेथेच झटकून टाका.” त्याप्रमाणे शिष्य शुभवार्ता गाजवीत आणि सर्वत्र आजार्‍यांना बरे करीत गावोगाव फिरू लागले. येशूंबद्दल शासक हेरोद याने सर्वकाही ऐकले. तेव्हा तो घोटाळ्यात पडला. कारण काही लोक म्हणत होते, “हा बाप्तिस्मा करणारा योहान पुन्हा जिवंत झाला आहे.” आणखी दुसरे म्हणत होते की एलीया प्रकट झाला आहे, तर आणखी काही प्राचीन संदेष्ट्यांसारखा एक संदेष्टा मृतातून उठून उदय पावला आहे असे म्हणत होते. पण हेरोद म्हणाला, “मी तर योहानाचा शिरच्छेद केला होता, मग हा माणूस कोण ज्याच्याबद्दल मी ऐकत आहे?” आणि तो येशूंना भेटण्याचा प्रयत्न करू लागला. नंतर प्रेषित परत आले आणि आपण काय केले याचा सर्व वृतांत त्यांनी सादर केला, येशू त्यांना घेऊन बेथसैदा या शहराकडे एकांतस्थळी निघून गेले. परंतु समुदायाला हे कळले व ते त्यांच्यामागे गेले. येशूंनी त्यांचे स्वागत केले व त्यांना परमेश्वराच्या राज्याविषयी शिक्षण दिले आणि बरे होण्याची ज्यांना गरज होती त्यांना बरे केले. दुपार टळल्यानंतर बारा शिष्य त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, “लोकांना पाठवून द्या म्हणजे ते आजूबाजूच्या खेड्यांमध्ये व गावांमध्ये जातील व आणि त्यांच्या खाण्याची व राहण्याची व्यवस्था करतील, कारण आपण येथे दूर ठिकाणी आहोत.” त्यांनी उत्तर दिले, “तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.” यावर ते म्हणाले, “आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत—तर या सर्व लोकांस पुरेल इतके अन्न आम्ही जाऊन विकत आणले तर हे शक्य आहे” तेथे पुरुषांचीच संख्या जवळजवळ पाच हजार होती. येशू शिष्यांना म्हणाले, “जवळजवळ पन्नास लोक अशाप्रकारे गटागटाने त्यांना खाली बसू द्या.” तेव्हा शिष्यांनी त्याप्रमाणे केले आणि सर्व लोक खाली बसले. येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले आणि स्वर्गाकडे पाहून आभार मानले आणि त्या भाकरीचे तुकडे केले. नंतर त्यांनी ते शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले. ते सर्वजण जेवले आणि समाधानी झाले आणि शिष्यांनी जेवणानंतर उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या बारा टोपल्या उचलल्या.

लूक 9 वाचा