YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 6:27-38

लूक 6:27-38 MRCV

“पण जे माझे ऐकत आहेत, त्यांना मी सांगतो, तुमच्या शत्रूवर प्रीती करा. जे तुमचा द्वेष करतात, त्यांचे चांगले करा. जे तुम्हाला शाप देतात, त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमच्याबरोबर वाईट वागतात, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जर कोणी तुमच्या एका गालावर चापट मारली, तर त्यांच्यापुढे दुसराही गाल करा. जर कोणी तुमचा अंगरखा काढून घेतला, तर त्यांना तुमची बंडीही घेण्‍यास मना करू नका. जे तुम्हाजवळ मागतात त्यांना द्या आणि जो तुमचे घेतो, त्याची परत मागणी करू नका. जो व्यवहार इतरांनी तुमच्यासाठी करावा अशी तुमची इच्छा आहे, तसेच तुम्ही त्यांच्यासाठी करा. “जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावरच तुम्ही प्रीती केली तर त्यात तुमचा काय लाभ? कारण पापी लोकही आपल्यावर प्रेम करणार्‍यांवर प्रेम करतात. आणि जे तुमचे भले करतात, त्यांचे भले केले, तर त्यात तुम्हाला काय लाभ? पापी लोकही तसेच करतात. जे तुमचे पैसे परत करू शकतील अशी तुमची आशा आहे, त्यांनाच तुम्ही उसने देता, तर त्यात तुम्ही चांगले ते काय करता? दुष्टही आपल्या सर्व रकमेची फेड करणार्‍या दुष्टाला उसने देतो. तुमच्या शत्रूवर प्रेम करा, त्यांचे चांगले करा आणि परतफेड करण्याची आशा बाळगू नका, असे केले, म्हणजे तुम्हाला फार मोठे प्रतिफळ मिळेल आणि तुम्ही परात्पराची लेकरे व्हाल, कारण तो अनुपकारी आणि दुष्ट यांनाही दयाळूपणाने वागवितो. जसा तुमचा पिता कनवाळू आहे, तसे तुम्हीही व्हा. “न्याय करू नका, म्हणजे तुमचा न्याय होणार नाही. दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हाला दोषी ठरवण्यात येणार नाही. क्षमा करा, म्हणजे तुम्हाला क्षमा केली जाईल. द्या आणि तुम्हाला दिले जाईल. मोठ्या प्रमाणात दाबून, हालवून, भरून वाहू लागेल अशा मापाने परत मिळेल. कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल.”

लूक 6 वाचा