यहोशुआ 5
5
1आता जेव्हा यार्देनेच्या पश्चिमेकडील सर्व अमोरी राजांनी आणि किनार्यावरील सर्व कनानी राजांनी ऐकले की, याहवेहनी कशाप्रकारे इस्राएली लोकांसमोर ते पार करून जाईपर्यंत यार्देन नदी कोरडी करून दिली, त्यांची अंतःकरणे भीतीने गळून गेली आणि पुन्हा इस्राएली लोकांना सामोरे जाण्यास त्यांना धैर्य राहिले नाही.
गिलगाल येथे वल्हांडण आणि सुंता
2त्यावेळेस याहवेहनी यहोशुआस सांगितले, “गारगोटीच्या सुर्या तयार कर आणि ज्या इस्राएली लोकांची रानात सुंता झाली नव्हती त्यांची सुंता कर.” 3तेव्हा यहोशुआने गारगोटीच्या सुर्या तयार केल्या आणि गिबियाथ हारालोथ#5:3 म्हणजे अग्रत्वचेची टेकडी या ठिकाणी इस्राएली लोकांची सुंता केली.
4यहोशुआने सुंता यासाठी केली की: इजिप्त देश सोडून जे सर्व बाहेर आले—युद्धाचे वय असलेले सर्व पुरुष—इजिप्त सोडून येत असताना रानामध्ये मरण पावले. 5बाहेर पडलेल्या सर्व पुरुषांची सुंता झाली होती, परंतु इजिप्त सोडल्यानंतरच्या प्रवासाच्या काळात जे सर्व पुरुष जन्मले त्यांची सुंता झाली नव्हती. 6इस्राएली लोक चाळीस वर्षे संपेपर्यत रानात भ्रमण करीत राहिले होते. इजिप्त सोडताना जे पुरुष युद्ध करण्याच्या वयाचे होते, ते सर्वजण याकाळात मरण पावले होते, कारण त्यांनी याहवेहची आज्ञा पाळली नव्हती. याहवेहनी त्यांना शपथपूर्वक सांगितले होते की, जो देश इस्राएलला देण्याचे वचन मी त्यांच्या पूर्वजास दिलेले होते त्या “दुधामधाचे प्रवाह वाहणार्या” देशात, मी त्यांना प्रवेश करू देणार नाही. 7म्हणून जी मुले आपल्या वडिलांची जागा घेण्यायोग्य झाली होती, यहोशुआने त्यांची सुंता केली. ते अजूनही बेसुंती होते कारण वाटेत त्यांची सुंता झाली नव्हती 8सुंतेच्या विधीनंतर जखमा बर्या होईपर्यंत संपूर्ण इस्राएली राष्ट्राने छावणीत विश्रांती घेतली.
9मग याहवेह यहोशुआस म्हणाले, “आज मी तुमच्यापासून इजिप्तचा कलंक दूर लोटून दिला आहे,” यास्तव त्या ठिकाणाला गिलगाल#5:9 म्हणजे लोटून देणे असे नाव देण्यात आले आणि आज देखील ते ठिकाण त्याच नावाने ओळखले जाते.
10यरीहोच्या मैदानावर गिलगाल येथे इस्राएली लोकांनी तळ दिलेला असताना, त्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी सायंकाळी त्यांनी वल्हांडण सण साजरा केला. 11वल्हांडणाच्या दुसर्या दिवशी, त्याच दिवशी त्यांनी त्या जमिनीतील काही उपज खाल्ले: बेखमीर भाकरी आणि भाजलेले धान्य. 12त्यांनी त्या जमिनीतून उगविलेले धान्य खाल्ले त्याच्या दुसर्या दिवसापासून मान्ना मिळण्याचे थांबले; तिथून पुढे इस्राएली लोकांना कोणताही मान्ना मिळाला नाही, परंतु त्या वर्षी त्यांनी कनानमधील उपज खाल्ला.
यरीहोचा पराभव
13आता यहोशुआ जेव्हा यरीहोजवळ होता, त्याने वर पाहिले आणि त्याला दिसले की त्याच्यासमोर एक पुरुष तलवार हातात घेऊन त्याच्यासमोर उभा आहे. यहोशुआ त्याच्याजवळ गेला आणि त्याला विचारले, “तू आमच्या बाजूने आहेस की आमच्या शत्रूच्या बाजूने आहेस?”
14“कोणाच्याही बाजूचा नाही,” त्याने उत्तर दिले, “परंतु याहवेहचा सेनानायक म्हणून मी आलो आहे.” तेव्हा यहोशुआने आदराने त्याच्यासमोर लोटांगण घातले आणि त्याला विचारले, “माझ्या प्रभूकडून त्याच्या सेवकासाठी काय आदेश आहे?”
15याहवेहच्या सेनानायकाने उत्तर दिले, “तुझ्या पायातील पायतण काढ, कारण ज्या भूमीवर तू उभा आहेस ती पवित्र आहे.” तेव्हा यहोशुआने त्याप्रमाणे केले.
सध्या निवडलेले:
यहोशुआ 5: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.