YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहोशुआ 4

4
1जेव्हा सर्व लोकांनी यार्देन नदी ओलांडली, तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले, 2“लोकातील प्रत्येक गोत्रातून एक अशा बारा पुरुषांची निवड कर, 3आणि त्यांना सांग की त्यांनी यार्देनेच्या मध्यभागातून, म्हणजे जिथे याजक उभे आहेत, तिथून बारा धोंडे उचलून घ्यावे आणि ते तुमच्याबरोबर घेऊन आज रात्री ज्या ठिकाणी तुम्ही राहणार आहात त्या ठिकाणी ठेवावे.”
4तेव्हा यहोशुआने इस्राएलच्या प्रत्येक गोत्रातून एक अशा बारा पुरुषास निवडले व त्यांना बोलाविले, 5आणि यहोशुआ त्यांना म्हणाला, “यार्देनेच्या मध्यभागी जिथे याहवेह तुमच्या परमेश्वराचा कोश आहे त्याच्यापुढे जा. तिथून तुमच्यातील प्रत्येकाने एक धोंडा खांद्यावर वाहून आणावा. इस्राएलच्या बारा गोत्रातील प्रत्येक गोत्रामागे एक, असे एकूण बारा धोंडे तुम्ही बारा जणांनी आणावे. 6ते आपल्यासाठी एक चिन्ह असेल, यासाठी की जेव्हा भावी काळात तुमची मुलेबाळे तुम्हाला विचारतील, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?’ 7तेव्हा तुम्हाला त्यांना सांगता येईल, याहवेहच्या कराराच्या कोशासमोर यार्देन नदीचा वाहता प्रवाह थांबला होता. जेव्हा त्यांनी यार्देन पार केली, तेव्हा यार्देन नदीच्या पाण्याचा प्रवाह दुभागला होता. हे धोंडे इस्राएली लोकांसाठी कायमचे स्मारक चिन्ह असावे.”
8तेव्हा इस्राएली लोकांनी यहोशुआने सांगितल्याप्रमाणे केले. याहवेहने यहोशुआला आज्ञापिल्यानुसार प्रत्येक गोत्रामागे एक याप्रमाणे बारा धोंडे त्यांनी यार्देन नदीच्या मध्यभागातून उचलले व ज्या ठिकाणी त्यांनी छावणी दिली, त्या ठिकाणी ते धोंडे ठेवले. 9यहोशुआने यार्देन नदीच्या मध्यभागी असलेले बारा धोंडे जिथे कराराचा कोश वाहून नेणारे याजक उभे होते तिथे उभे केले आणि आजपर्यंत ते तिथेच आहेत.
10मोशेने यहोशुआला सुचविल्याप्रमाणे, याहवेहने यहोशुआला ज्या आज्ञा होत्या, त्या पूर्ण होईपर्यंत कोश वाहणारे याजक यार्देन नदीच्या मध्यभागी उभे राहिले, तेव्हा लोकांनी घाईने नदी ओलांडली. 11त्या सर्वांनी नदी पार करणे संपविताच याहवेहचा कोश व याजक सर्व लोकांच्या देखत पलीकडे गेले. 12मग मोशेने त्यांना सांगितल्याप्रमाणे रऊबेन, गाद आणि मनश्शेहचे अर्धे गोत्र इस्राएली लोकांपुढे युद्धासाठी सुसज्ज होऊन पुढे निघाले. 13युद्धासाठी सुसज्ज झालेले सुमारे चाळीस हजार पुरुष याहवेहसमोर यरीहोच्या मैदानात पलीकडे गेले.
14त्या दिवशी याहवेहने यहोशुआला सर्व इस्राएली लोकांच्या दृष्टीत सन्मानित केले आणि जसे त्यांनी मोशेच्या संपूर्ण आयुष्यभर त्याचा आदर केला, तसाच त्यांनी यहोशुआचाही केला.
15नंतर याहवेह यहोशुआला म्हणाले, 16“याजकांना आज्ञा दे, कराराच्या नियमांचा कोश घेऊन यार्देन नदीतून वर या.”
17तेव्हा यहोशुआने याजकांना आज्ञा दिली, “यार्देन नदीतून वर या.”
18आणि याजक याहवेहच्या कराराचा कोश घेऊन यार्देन नदीच्या पात्रातून वर आले. त्यांनी त्यांचे पाय कोरड्या जमिनीवर ठेवताच, नदीचे पाणी परत मूळ ठिकाणी आले आणि पूर्वीप्रमाणे ते भरून वाहू लागले.
19पहिल्या महिन्याच्या दहाव्या दिवशी ते यार्देनेतून वर आले आणि यरीहोच्या पूर्व सीमेवरील गिलगाल येथे त्यांनी छावणी घातली. 20आणि यहोशुआने गिलगाल येथे यार्देनेतून बाहेर काढलेल्या बारा धोंड्यांची रचना केली. 21तो इस्राएली लोकांना म्हणाला, “भविष्यकाळात तुमचे वंशज त्यांच्या वडिलांना विचारतील, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?’ 22त्यांना सांग, ‘इस्राएली लोक यार्देन नदीतून कोरड्या जमिनीवरून पलीकडे आले.’ 23कारण याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्ही यार्देन नदी पार करेपर्यंत तुमच्यासमोर नदीचे पात्र कोरडे ठेवले. याहवेह तुमच्या परमेश्वरांनी यार्देन नदीचे जसे केले तसेच त्यांनी आम्ही लाल समुद्र पार करेपर्यंत तो कोरडा केला होता. 24हे त्यांनी यासाठी केले की, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना कळावे की याहवेह सामर्थ्यशाली आहेत आणि म्हणून तुम्ही सदैव याहवेह तुमच्या परमेश्वराचे भय बाळगावे.”

सध्या निवडलेले:

यहोशुआ 4: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन