YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहोशुआ 3

3
यार्देन नदी पार करणे
1दुसर्‍या दिवशी पहाटेच यहोशुआ आणि सर्व इस्राएली लोकांनी शिट्टीम सोडले आणि ते यार्देन नदी पार करण्यापूर्वी त्यांनी काही दिवस तिथेच तळ दिला. 2मग तीन दिवसानंतर अधिकार्‍यांनी छावणीत फिरून लोकांना या सूचना दिल्या: 3“तुम्ही जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वराच्या कराराचा कोश व तो वाहत असणार्‍या लेवी याजकांना पाहाल, तेव्हा तुमच्या ठिकाणातून निघून त्यांच्या पाठोपाठ जा. 4तेव्हा कोणत्या मार्गाने जावे हे तुम्हाला समजेल, कारण तुम्ही या मार्गाने पूर्वी कधी गेला नाही. परंतु तुमच्यात व कोशात अंदाजे वीस हजार हाताचे#3:4 अंदाजे 900 मीटर अंतर असावे; तुम्ही त्याजवळ जाऊ नये.”
5मग यहोशुआने लोकांना सांगितले, “तुम्ही शुद्ध व्हा, कारण उद्या तुम्हामध्ये याहवेह एक महान चमत्कार करणार आहेत.”
6यहोशुआने याजकांस म्हटले, “कराराचा कोश उचलून घ्या आणि लोकांच्या पुढे चला.” तेव्हा त्यांनी कोश घेतला व लोकांच्या पुढे निघाले.
7मग याहवेह यहोशुआस म्हणाले, “आज मी तुला मोठा सन्मान बहाल करणार आहे, म्हणजे सर्व इस्राएली लोकांना कळून येईल की, मी जसा मोशेबरोबर होतो, अगदी तसाच तुझ्याबरोबर देखील आहे. 8कराराचा कोश वाहून नेणार्‍या याजकांना सांग, ‘जेव्हा तुम्ही यार्देन नदीच्या पाण्याच्या काठावर पोहोचाल तेव्हा जा व नदीत उभे राहा.’ ”
9मग यहोशुआने इस्राएली लोकांस म्हटले, “इकडे या व याहवेह तुमच्या परमेश्वराचे शब्द ऐका. 10यहोशुआ म्हणाला, अशाप्रकारे तुम्हाला कळेल की जिवंत परमेश्वर तुमच्यामध्ये आहेत व कनानी, हिथी, हिव्वी, परिज्जी, गिर्गाशी, अमोरी व यबूसींना ते खचितच तुमच्या समोरून घालवून देतील. 11पाहा, अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या कराराचा कोश तुमच्यापुढे यार्देन नदीत प्रवेश करेल. 12तर आता इस्राएलच्या प्रत्येक गोत्रातून एक असे बारा पुरुष निवडा. 13याहवेह अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या कराराचा कोश वाहून नेणार्‍या याजकांचे पाय यार्देनला लागताच, वरून वाहत येणारे पाणी थांबेल व त्याची रास उभी राहील.”
14जेव्हा यार्देन नदी पार करण्यासाठी लोकांनी आपली छावणी उठविली, तेव्हा कराराचा कोश वाहून नेणारे याजक त्यांच्या पुढे निघाले. 15तो हंगामाचा काळ होता व त्या संपूर्ण काळात यार्देन नदीला पूर आलेला असतो. तरीही कोश वाहणारे याजक यार्देनपर्यंत पोहोचताच व त्यांचे पाय पाण्याला स्पर्श करताच, 16वरून वाहत येणारे पाण्याचे प्रवाह थांबले. सारेथान जवळील आदाम नावाच्या गावात खूप अंतरावर पाण्याची एक रास झाली, तर अराबाच्या समुद्राकडे (म्हणजे मृत समुद्रात) वाहणारे पाणी पूर्णपणे कापले गेले. तेव्हा लोक यरीहो समोर नदीपलीकडे गेले. 17सर्व इस्राएली लोकांच्या संपूर्ण राष्ट्राने कोरड्या जमिनीवरून पलीकडे जाईपर्यंत, याहवेहचा कराराचा कोश वाहून नेणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी थांबले आणि कोरड्या जमिनीवर उभे राहिले.

सध्या निवडलेले:

यहोशुआ 3: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन