इय्योब 33
33
1“परंतु आता हे इय्योबा, माझे शब्द ऐक;
मी जे बोलणार आहे त्या सर्वाकडे लक्ष दे.
2मी बोलायला माझे मुख उघडत आहे;
माझे शब्द माझ्या जिभेच्या टोकावर आहेत.
3माझे शब्द सरळ हृदयातून येतात;
माझे ओठ जे मला माहीत आहे तेच खरेपणाने बोलतील.
4परमेश्वराच्या आत्म्याने मला घडविले आहे;
आणि सर्वसमर्थाचा श्वास मला जीवन देतो.
5तुला उत्तर देता येत असेल, तर मला उत्तर दे;
ऊठ आणि तुझा खटला माझ्यासमोर चालव.
6परमेश्वरासमोर जसा तू, तसा मीही आहे;
मी सुद्धा मातीचा घडविलेला आहे.
7माझे भय बाळगण्याची तुला गरज नाही,
किंवा माझा हात तुझ्यावर भारी नसो.
8“तुला असे बोलताना मी ऐकले आहे—
हेच शब्द मी ऐकले आहेत—
9‘मी शुद्ध आहे, मी काही पाप केले नाही;
मी स्वच्छ आणि दोषविरहीत आहे.
10तरी देखील परमेश्वराला माझ्यात दोष सापडला आहे;
आणि ते मला त्यांचा शत्रू मानतात.
11ते माझे पाय साखळ्यांनी बांधतात;
आणि माझ्या सर्व मार्गावर कडक नजर ठेवतात.’
12“परंतु मी तुला सांगतो, याबाबतीत तू चुकतोस,
कारण परमेश्वर कोणत्याही मनुष्यापेक्षा महान आहे.
13तू त्यांच्याविरुद्ध तक्रार का करतोस
की ते कोणाच्याही शब्दास प्रतिसाद देत नाही?
14कारण परमेश्वर एकदा एका, मग दुसर्या मार्गाने मानवांशी बोलत असतात—
जरी कोणाला त्याचे अवलोकन होत नाही.
15रात्रीच्या स्वप्नात, दृष्टान्तामध्ये,
जेव्हा लोकांना गाढ झोप लागलेली असते
त्यांच्या बिछान्यावर डुलक्या घेत असताना,
16परमेश्वर त्यांच्या कानात बोलून
आणि चेतावणी देऊन त्यांना घाबरवितात,
17म्हणजे ते मनुष्याच्या चुकीच्या वर्तनापासून फिरतील
आणि अहंकारापासून दूर राहतील,
18खड्ड्यात पडण्यापासून
आणि तलवारीने त्यांचे जीवन नष्ट होण्यापासून त्यांना राखतील.
19“किंवा काहींना वेदनादायक बिछान्यावर
त्यांच्या हाडांमध्ये सततच्या क्लेशाने शासन होते,
20अशासाठी की त्यांच्या शरीराला अन्नाची किळस वाटेल
आणि त्यांचा जीव मिष्टान्नाचा तिरस्कार करतो.
21त्यांचे मांस दिसेनासे होते,
आणि त्यांची लपलेली हाडे आता बाहेर लटकलेली दिसतात.
22ते त्यांच्या कबरेजवळ पोहोचतात,
आणि त्यांचे जीवन मृतांच्या ठिकाणाकडे#33:22 किंवा मृतांच्या संदेष्ट्यांच्या ठिकाणाकडे जाऊन ठेपते.
23तरीही त्यांच्या बाजूला जर एखादा दूत,
हजारांमधला कोणी एक मनुष्य निरोप्या असला,
जो न्यायी जीवन कसे जगावे याविषयी सांगण्यासाठी पाठविलेला असला,
24आणि त्या व्यक्तीबद्दल दया दाखवून तो परमेश्वराला म्हणतो,
‘त्यांना मरणाकडे जाण्यापासून वाचवा;
त्यांच्यासाठी खंडणी मला मिळाली आहे—
25लहान लेकराप्रमाणे त्यांचे मांस पुन्हा भरून येवो;
तरुणपणाच्या दिवसांप्रमाणे त्यांची पुनर्रचना होवो’;
26मग तो व्यक्ती प्रार्थना करेल आणि परमेश्वराचा अनुग्रह त्याच्यावर होईल,
ते परमेश्वराचे मुख पाहतील आणि आनंदाचा गजर करतील;
आणि परमेश्वर त्यांना सुयश देऊन, त्यांची पुनर्स्थापना करतील.
27मग ते जाऊन इतरांना जाहीर करून सांगतील,
‘मी पाप केले होते, जे सरळ ते मी विकृत केले,
परंतु ज्यास मी पात्र होतो ते मला मिळाले नाही.
28परमेश्वराने मला त्या मृत्यूच्या गर्तेत जाण्यापासून वाचविले,
आणि जीवनाच्या प्रकाशाचा आनंद उपभोगत मी जीवन जगेन.’
29“परमेश्वर मानवासाठी या सर्वगोष्टी करतात;
दोनदा किंवा तीनदाही ते करीत असतात—
30त्याचा जीव त्या गर्तेपासून फिरवितात,
यासाठी की जीवनाचा प्रकाश त्याच्यावर उज्वल व्हावा.
31“हे इय्योबा, लक्ष दे आणि माझे ऐक;
तू शांत राहा आणि मी बोलेन.
32जर तुला काही बोलायचे असेल तर मला उत्तर दे;
बोल, कारण तुझे समर्थन मी करावे असे मला वाटते.
33परंतु जर नाही तर माझे ऐक;
तू शांत राहा आणि मी तुला ज्ञान शिकवेन.”
सध्या निवडलेले:
इय्योब 33: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapi.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fmr.png&w=128&q=75)
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.