YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मयाह 44

44
मूर्तिपूजेमुळे ओढवलेला विनाश
1इजिप्तच्या उत्तरेस मिग्दोल, तहपनहेस, व मेम्फीस या शहरात व संबंध दक्षिण इजिप्तमधील पथरोस प्रदेशात राहत असलेल्या यहूद्यांसंबंधी याहवेहचे यिर्मयाहला हे वचन आले: 2“सर्वसमर्थ परमेश्वर याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: यरुशलेम व यहूदीयाची सर्व नगरे यांच्यावर मी कसा विनाश आणला, ते तुम्ही पाहिले आहे. ते आता टाकलेल्या लोकागत भग्नावशेषात निवास करतात, 3त्यांनी केलेल्या दुष्टाईमुळेच असे झाले. त्यांनी इतर दैवतांना धूप जाळला व त्यांची आराधना केली म्हणून माझा क्रोध त्यांच्यावर भडकला. अशी दैवते जी त्यांना किंवा तुम्हाला किंवा तुमच्या पूर्वजांनाही माहीत नव्हती. 4मी माझे सेवक संदेष्टे त्यांच्याकडे वारंवार पाठविले, हे सांगण्यास, ‘ज्यांचा मला तिरस्कार वाटतो, त्या घृणास्पद गोष्टी करू नका!’ 5पण त्यांनी माझे ऐकले नाही वा त्याकडे लक्ष दिले नाही; आणि आपल्या कुमार्गापासून ते माघारी फिरले नाहीत व इतर दैवतांना धूप जाळण्याचे बंदही केले नाही. 6यामुळे माझा क्रोधाग्नी उफाळून आला; त्याचा यहूदीयातील नगरांवर, यरुशलेमच्या रस्त्यावर वर्षाव झाला. त्याने ती नगरे ओसाड केली, जसे ते आजही आहेत.
7“आता सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: तुम्ही स्वतःवर विनाश आणला. यहूदीयातील तुमचे पुरुष, स्त्री, अथवा लेकरे व तान्हीमुले देखील वाचणार नाहीत व तुमचे कोणीही अवशेष राहणार नाहीत असे तुम्ही का करीत आहात? 8इथे तुम्ही बनविलेल्या मूर्ती केल्या. इजिप्तमध्ये, जिथे तुम्ही निवास करण्यास आला आहात, तेथील इतर दैवतांना धूप जाळून, तुम्ही माझा क्रोध का भडकावित आहात व तुमचा पूर्ण नाश करावयाला मला का लावत आहात? तुम्ही स्वतःस पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना शाप व त्यांच्या उपहासाचा विषय बनवित आहात. 9तुम्ही तुमच्या पूर्वजांनी केलेली पापे, यहूदीयाचे राजे व राण्यांनी केलेली पापे, यहूदीया नगरात व यरुशलेमच्या रस्त्यावर तुम्ही व तुमच्या स्त्रियांनी केलेली पापे, ही सर्व विसरला काय? 10आणि अद्यापही कोणी लीन होऊन माझ्याविषयी श्रद्धा व्यक्त केली नाही, किंवा मी तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिलेले नियम व आज्ञा पाळल्या नाही.
11“म्हणून सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: मी तुम्हावर अरिष्ट आणून संपूर्ण यहूदीयाचा नाश करण्याचा निर्धार केला आहे. 12इजिप्तमध्ये जाण्याचा हट्ट धरणार्‍या या यहूदीयातील उरलेल्या लोकांना मी नाहीसे करेन. ते सर्वजण इजिप्तमध्ये नष्ट होतील; ते तलवारीने वा दुष्काळाने मरण पावतील. अगदी लहानांपासून थोरापर्यंत सर्व तलवारीने वा दुष्काळाने मरतील. ते एक असा शाप होतील, ते भयानकतेचा, तिरस्काराचा, व शापाचा विषय होतील. 13यरुशलेममध्ये राहणाऱ्यांना मी जशी शिक्षा केली, तशीच या इजिप्तमध्ये राहणाऱ्यांनाही मी तलवार, दुष्काळ व मरी यांनी शिक्षा करेन. 14इजिप्तमध्ये निवास करण्यास गेलेल्या यहूदीयाच्या अवशेषांपैकी एकही जण, जिथे परत येऊन राहण्याची त्यांची उत्कट इच्छा आहे, तिथे सुटून परत यहूदीयात येण्यासाठी जिवंत राहणार नाहीत; मोजक्या फराऱ्यांशिवाय कोणीही परतणार नाही.”
15त्यांच्या स्त्रिया इतर सर्व उपस्थित स्त्रियांसोबत—एका विशाल सभेत—परकीय दैवतांना धूप जाळीत असतात हे माहीत असलेल्या पुरुषांनी व वरच्या व खालच्या इजिप्तच्या पथरोसमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांनी यिर्मयाहला उत्तर दिले: 16“याहवेहच्या नावाने तू देत असलेले संदेश आम्ही ऐकणार नाही! 17आम्ही जे करणार असे म्हटले होते, तसे आम्ही निश्चितच करू. आम्ही आकाशराणीस धूप जाळू आणि तिला पेयार्पण करू, जसे आम्ही व आमच्या पूर्वजांनी, आणि आमचे राजे व अधिपती यांनी यहूदीयाच्या नगरात, यरुशलेमच्या रस्त्यात नेहमी केले, तसेच आम्हीही करू. कारण त्या दिवसात आमच्याकडे विपुल अन्न होते आणि आम्ही सुखात होतो व आम्हाला काहीही इजा झाली नाही. 18जेव्हापासून आम्ही आकाशराणीला धूप जाळणे थांबविले व तिला पेयार्पणे करण्याचे थांबविले, तेव्हापासून आम्हाला सर्व गोष्टींचा अभाव झाला असून तलवारीने आणि दुष्काळाने आमचा नाश होत आहे.”
19स्त्रिया त्याची पुष्टी करीत म्हणाल्या, “आम्ही आकाशराणीची पूजा करीत होतो, तिला पेयार्पणे ओतीत होतो, तिच्यासाठी तिची प्रतिमा असलेल्या पोळ्या करीत होतो, हे सर्व आमच्या पतींना माहीत नव्हते काय?”
20तेव्हा हे उत्तर देणार्‍या सर्व स्त्रीपुरुषांना यिर्मयाह म्हणाला, 21“तुम्ही, तुमचे पूर्वज, तुमचे राजे व अधिपती, आणि सर्व लोक यहूदीयाच्या नगरामध्ये, आणि यरुशलेमच्या रस्त्यांवर मूर्तींपुढे धूप जाळीत होता, हे याहवेहच्या स्मरणात नाही का व ते त्यांनी दर्शवून दिले नाही का? 22तुम्ही जी सर्व दुष्कृत्ये करीत होता, ती सहन करणे याहवेहला अशक्य झाले; म्हणून तुमची भूमी शापित झाली व ओसाड होऊन निर्मनुष्य झाली, जशी ती आजही आहे. 23जी तुम्ही बघता ती भयानक संकटे तुमच्यावर कोसळली याचे खरे कारण एकच आहे, ते म्हणजे तुम्ही मूर्तींपुढे धूप जाळला, याहवेहविरुद्ध पाप केले आणि त्यांच्या आज्ञा, नियम व करार पाळण्याचे नाकारले.”
24मग यिर्मयाह पुन्हा त्या सर्वांना व त्यांच्याबरोबर असलेल्या स्त्रियांना म्हणाला, “इजिप्तमध्ये असलेल्या यहूदीयाच्या सर्व नागरिकांनो, याहवेहचा संदेश ऐका! 25सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: तुम्ही आणि तुमच्या स्त्रियांनी म्हटले, ‘आम्ही निश्चितच आकाशराणीस धूप जाळू व तिला पेयार्पणे करू.’
“तर मग करा, तिला दिलेली वचने पूर्ण करा! तुमचे संकल्पही पूर्ण करा! 26तरीपण इजिप्त देशात राहणार्‍या सर्व यहूद्यांनो, याहवेहचे वचन ऐका: ‘मी आपल्या थोर नामाची शपथ घेत आहे, याहवेह म्हणतात, इजिप्त देशात राहणारे कोणीही यहूदीयाचे नागरिक “सार्वभौम याहवेहच्या नावाची शपथ.” असे कधीही म्हणणार नाही. 27इजिप्तमधील सर्व यहूदी लोक तलवारीने व दुष्काळाने नाश पावतील; तोपर्यंत त्यांच्या भल्यासाठी नव्हे तर अनिष्टासाठी माझी त्यांच्यावर नजर आहे. 28तलवारीपासून वाचलेले जे इजिप्त देशातून यहूदीयाला परत जातील, ते अगदी थोडके असतील. मग इजिप्त देशात येऊन राहणाऱ्या यहूदीयाच्या सर्व अवशेष नागरिकांना कळेल की कोणाचा शब्द खरा ठरतो—माझा की त्यांचा.
29“ ‘याहवेह जाहीर करतात, या ठिकाणी मी तुम्हाला शिक्षा करण्याचे हे चिन्ह मी तुम्हाला देईन, म्हणजे तुमच्यावर संकटे कोसळणार या मी दिलेल्या धमक्या खऱ्या आहेत हे तुम्हाला कळेल.’ 30याहवेह असे म्हणतात: ‘जसे मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह याला त्याचा जीव घेऊ पाहणार्‍या बाबेलचा राजा, नबुखद्नेस्सरच्या हवाली केले होते, तसेच मी इजिप्तचा राजा, फारोह होफ्रा, याला त्याचा जीव घेऊ पाहणार्‍यांच्या हातात देईन.’ ”

सध्या निवडलेले:

यिर्मयाह 44: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन