याकोब 1
1
1परमेश्वराचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा दास याकोब याजकडून,
राष्ट्रांमध्ये पांगलेल्या बारा वंशाना,
शुभेच्छा.
कसोटी आणि मोह
2माझ्या बंधुंनो आणि भगिनींनो, जेव्हा तुम्ही अनेक प्रकारच्या परीक्षेंना तोंड देता तेव्हा त्यात अत्यानंद माना. 3कारण तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची जी परीक्षा होते त्यामुळे धीर उत्पन्न होतो. 4धीराला कार्य पूर्ण करू द्या यासाठी की तुम्ही परिपक्व आणि पूर्ण व्हावे व तुम्हाला कशाचीही कमतरता भासू नये. 5जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल, तर तुम्ही परमेश्वराला मागा आणि ते तुम्हास दिले जाईल, कारण ते कोणाचेही दोष न काढता सर्वांस उदारतेने देतात. 6परंतु जेव्हा तुम्ही मागता, तेव्हा संशय न बाळगता विश्वासाने मागावे, कारण जो संशय धरतो तो वार्याने लोटलेल्या व हेलकावे खाणार्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. 7अशा व्यक्तीने आपल्याला प्रभुपासून काही मिळेल अशी आशा अजिबात धरू नये. 8असा मनुष्य दुहेरी मनाचा असून ज्या सर्वगोष्टी तो करतो त्यात अस्थिर असतो.
9गरीब परिस्थितीतील विश्वासू जणांनी आपल्या उच्च पदाबद्दल अभिमान बाळगावा. 10परंतु जे श्रीमंत आहेत त्यांनी आपल्या दीन अवस्थेबद्दल अभिमान बाळगावा; कारण ते रान फुलांसारखे नाहीसे होतील. 11कारण सूर्य प्रखर उष्णतेने उगवतो आणि रोप कोमेजून टाकतो; त्याचे फूल गळून पडते आणि त्याच्या सुदंरतेचा नाश होतो. त्याचप्रमाणे श्रीमंत ही आपला उद्योग करीत असतानाच कोमेजून जाईल.
12जो कोणी व्यक्ती परीक्षेत धीर धरतो तो धन्य आहे, कारण परीक्षेत उतरल्यावर, जो जीवनी मुकुट प्रभुने आपल्यावर प्रीती करणार्यांना देण्याचे वचन दिले आहे, तो त्याला मिळेल.
13मोह आल्यानंतर, “परमेश्वर मला मोहात टाकत आहे” असे कोणीही म्हणू नये. कारण परमेश्वराला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही; 14परंतु प्रत्येक मनुष्य त्याच्या स्वतःच्या दुष्ट वासनेने ओढला व भुलविला जाऊन मोहात पडतो. 15मग इच्छेने गर्भधारण केल्यानंतर, ती पापाला जन्म देते; आणि पापाची पूर्ण वाढ झाली, म्हणजे पाप मरणास जन्म देते.
16म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो फसू नका. 17प्रत्येक उत्तम व परिपूर्ण दान वरून आहे, ते स्वर्गातील प्रकाशाचा पिता जो छायेसारखा बदलत नाही त्याच्यापासून येते. 18त्याने आपल्याला सत्य वचनाद्वारे जन्म देण्यासाठी निवडले आहे, यासाठी की त्याने जे सर्वकाही उत्पन्न केले त्यामधील आपण प्रथमफळ व्हावे.
ऐकणे आणि आचरणात आणणे
19माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे लक्षात घ्या, प्रत्येकजण ऐकावयास शीघ्र, बोलावयास सावकाश व रागास मंद असावा. 20कारण मनुष्याच्या संतापाने परमेश्वर ज्या नीतिमत्वाची अपेक्षा करतो ते साध्य होत नाही. 21यास्तव, सर्व अनैतिक घाण व दुष्टता यांचा त्याग करा, व जे वचन तुम्हामध्ये पेरलेले आहे त्याचा नम्रतेने स्वीकार करा, ते वचन तुम्हाला तारावयास समर्थ आहे.
22वचन केवळ ऐकून स्वतःची फसवणूक करू नका. वचन सांगते त्याप्रमाणे आचरण करा. 23कारण जो कोणी वचन ऐकतो, पण त्याप्रमाणे आचरण करत नाही, तो आरशात आपले मुख पाहणार्यासारखा आहे. 24तो स्वतःकडे पाहिल्यावर निघून जातो आणि आपण कसे दिसत होतो हे ताबडतोब विसरतो. 25परंतु जो कोणी स्वतंत्रतेच्या परिपूर्ण नियमांकडे लक्ष देतो आणि त्यामध्ये स्थिर राहतो, तो ऐकून विसरणारा न होता त्याप्रमाणे कृती करणारा होतो आणि तो जे काही करतो त्या गोष्टीत त्याला आशीर्वाद मिळतो.
26जे स्वतःला भक्त समजतात परंतु आपल्या जिभेवर ताबा ठेवीत नाहीत, ते स्वतःलाच फसवतात व त्यांची भक्ती व्यर्थ आहे. 27परमेश्वर पित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्दोष भक्ती हीच आहे की अनाथ व विधवांची त्यांच्या दुःखात काळजी घेणे आणि जगाच्या मलिनतेपासून स्वतःला अलिप्त राखणे.
सध्या निवडलेले:
याकोब 1: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.