यशायाह 65
65
न्याय आणि तारण
1“ज्यांनी माझ्याविषयी विचारपूस केली नव्हती, त्यांना मी स्वतःस प्रकट केले;
ज्यांनी माझा शोध केला नव्हता, त्यांना मी सापडलो आहे.
ज्या राष्ट्रांनी माझा धावा केला नाही
त्यांना मी म्हटले, ‘पाहा मी इथे आहे, मी इथे आहे.’
2ते जे अयोग्य मार्गावरून चालतात,
जे स्वतःच्याच कल्पनांचे अनुसरण करतात—
त्या हट्टी लोकांसाठी,
मी आपले हात दिवसभर पुढे केले आहेत,
3हे लोक, जे मला सतत चिरडीस आणतात,
माझ्यासमक्ष माझा अपमान करतात.
बागांमध्ये अर्पणे वाहतात
आणि विटांनी बांधलेल्या वेदीवर धूप जाळतात;
4जे कबरांच्या मध्ये जाऊन बसतात
आणि गुप्तते मध्ये जागरण करण्यात रात्र घालवितात;
जे डुकरांचे मांस खातात,
आणि त्यांच्या भांड्यात निषिद्ध मांसाचा रस्सा असतो;
5जे म्हणतात, ‘दूर हो; माझ्याजवळ येऊ नकोस,
कारण मी तुझ्याहून अधिक पवित्र आहे!’
असे लोक माझ्या नाकातील धूर आहेत,
एक अग्नी, जो संपूर्ण दिवस जळत असतो.
6-7“पाहा, ते माझ्यासमोर लिहून ठेवलेले आहे:
मी शांत राहणार नाही, पण त्याची पूर्णपणे परतफेड करेन;
तुमच्या पापांचे व तुमच्या पूर्वजांच्या पापांचेही,
प्रतिफळ त्यांच्या मांडीवर मोजून टाकेन,”
असे याहवेह म्हणतात.
“कारण त्यांनी पर्वतांवर धूप जाळला
आणि टेकड्यांवर माझा अपमान केला.
मी त्यांच्या पूर्वीच्या दुष्कृत्यांचे पुरेपूर वेतन
त्या मापाने त्यांच्या मांडीवर टाकेन.”
8याहवेह असे म्हणतात:
“कारण द्राक्षांच्या घोसात थोडाफार रस शिल्लक असतो
आणि लोक म्हणतात, ‘यांचा नाश करू नका,
त्यात अजूनही आशीर्वाद बाकी आहे,’
त्याप्रमाणे मी माझ्या सेवकांप्रीत्यर्थ करेन;
मी त्या सर्वांचा नाश करणार नाही.
9मी याकोबाचे वंशज पुढे आणेन,
आणि यहूदाहचे वंशज माझ्या पर्वतांचा ताबा घेतील;
माझे निवडलेले लोक त्याचे वारसदार होतील,
व तिथे माझे सेवक वसती करतील.
10माझा शोध करणाऱ्या माझ्या लोकांसाठी
शारोन त्यांच्या कळपांची कुरणे बनतील,
आणि अखोरचे खोरे गुरांचे विश्रांतिस्थान होईल.
11“पण तुम्ही जे याहवेहचा त्याग करता
आणि माझ्या पवित्र पर्वताला विसरता,
जे भाग्य दैवतासाठी (गादसाठी) मेज पसरविता
आणि विधिलिखितासाठी मिश्रित मद्य पात्रात ठेवता,
12तुमच्यासाठी मी तलवार तुमची नियती करेन,
आणि तुम्ही सर्वजण तिच्या कत्तलीस बळी पडाल;
कारण मी हाक मारली, तेव्हा तुम्ही उत्तर दिले नाही,
मी बोललो पण तुम्ही ऐकले नाही.
तुम्ही माझ्या डोळ्यादेखत पाप केले
मला ज्याचा तिरस्कार आहे, नेमके तेच करण्याचे निवडले.”
13म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात:
“माझ्या सेवकांना अन्न मिळेल,
पण तुम्ही उपाशी राहाल;
माझ्या सेवकांना पेय मिळेल,
पण तुम्ही तहानेने व्याकूळ व्हाल.
माझे सेवक हर्षोल्हास करतील,
पण तुम्हाला लज्जास्पद केले जाईल.
14त्यांच्या अंतःकरणातून उफाळणार्या आनंदाने
माझे सेवक गाणी गातील,
पण अंतःकरणातील क्लेशांनी तुम्ही विव्हळाल
आणि भग्नहृदयी होऊन
हृदयाच्या वेदनेने आकांत कराल.
15माझ्या निवडलेल्या लोकांमध्ये तुमचे नाव
शापवचन असे होईल;
सार्वभौम याहवेह तुम्हाला ठार करतील,
परंतु आपल्या सेवकांना नवीन नावाने संबोधतील.
16जो कोणी या भूमीवर आशीर्वादासाठी धावा करतो
तो खऱ्या परमेश्वराद्वारेच करेल;
जो कोणी या भूमीवर शपथ घेतो
तो खऱ्या परमेश्वराचीच घेईल.
कारण जुने त्रास विसरण्यात येतील,
आणि माझ्या नजरेपासून लपविल्या जातील.
नवे आकाश व नवी पृथ्वी
17“कारण पाहा,
मी नवे आकाश व नवी पृथ्वी उत्पन्न करेन.
पूर्वीच्या गोष्टींची आठवण केल्या जाणार नाही,
मनात त्यांचे स्मरणदेखील होणार नाही.
18परंतु मी जी निर्मिती करेन
त्यामध्ये आनंद करा व सदोदित हर्ष करा.
कारण मी यरुशलेम नगरी संतोषमय
व तिचे लोक आनंदी असे निर्माण करेन.
19मी यरुशलेमसाठी आनंद करेन
आणि माझे लोक मला आनंददायी होतील;
यापुढे तिथे रडण्याचा व विलापाचा ध्वनी
कधीही कानांवर पडणार नाही.
20“यापुढे तान्ही बाळे
कधीही मृत्युमुखी पडणार नाहीत.
आणि वयातीत मनुष्य त्याची पूर्ण वर्षे जगेल;
यापुढे शंभर वर्षाचा मनुष्य मृत झाल्यास
तो किती बालवयातच मृत झाला असे म्हणण्यात येईल;
जो कोणी त्याची शंभरी पार न करता मृत झाल्यास
तो शापित समजल्या जाईल.
21त्या दिवसात जो कोणी घर बांधेल, तोच त्यात राहील;
ते द्राक्षमळे लावतील आणि त्यांची फळे स्वतः खातील.
22त्यांनी घरे बांधावी आणि इतरजण त्यात येऊन राहतील,
किंवा ते पेरतील आणि इतरजण खातील, असे आता कदापि होणार नाही,
कारण जितका जीवनकाल वृक्षाचा असेल,
तसेच माझे लोक दीर्घायुषी होतील;
माझे निवडलेले लोक त्यांच्या हाताने मिळविलेले प्रतिफळ
सुखाने बहुतकाळ उपभोगतील.
23त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत,
त्यांची मुले दुर्दैवास सामोरी जाण्यासाठी जन्मणार नाहीत.
कारण ते लोक आणि त्यांचे वंशज
याहवेहने आशीर्वादित लोक असे होतील.
24मला हाक मारण्यापूर्वीच मी त्यांना उत्तर देईन;
ते मला बोलून सांगताहेत तोच मी ऐकेन.
25लांडगा व कोकरू एकत्र चरतील.
सिंहदेखील बैलाप्रमाणे कडबा खाईल
आणि यापुढे धूळ हेच सर्पाचे अन्न असेल.
माझ्या कोणत्याही पवित्र पर्वतांवर ते
इजा पोहोचविणार नाही किंवा नाश करणार नाहीत,”
असे याहवेह म्हणतात.
सध्या निवडलेले:
यशायाह 65: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.