YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशायाह 49

49
याहवेहचा सेवक
1हे द्वीपांनो, माझे ऐका;
हे दूरवरील देशांनो, माझ्या बोलण्याकडे कान द्या:
माझा जन्म होण्यापूर्वीच याहवेहने मला बोलाविले;
गर्भाशयात असतानाच त्यांनी माझे नाव उच्चारले.
2त्यांनी माझे मुख तलवारीसारखे धारदार केले आहेत,
त्यांनी मला आपल्या हाताच्या छायेत लपवून ठेवले आहे;
त्यांनी मला बाणाप्रमाणे तीक्ष्ण केले आहे
त्यांनी मला त्यांच्या भात्यात झाकून ठेवले आहे.
3ते मला म्हणाले, “तू माझा सेवक आहेस;
इस्राएला, तुझ्यामध्ये मी माझे गौरव प्रकट करेन.”
4मी उत्तर दिले, “मी व्यर्थच सर्व कष्ट केले.
मी माझे सामर्थ्य निरुपयोगीच खर्ची घातले,
तरीपण माझे प्रतिफळ म्हणजे याहवेहचा वरदहस्त
आणि माझे बक्षीस माझ्या परमेश्वराकडे आहे.”
5आणि आता याहवेह म्हणतात—
याकोबाला त्यांच्याकडे परत आणावे
व इस्राएलला स्वतःसाठी एकत्र करावे,
यासाठी त्यांचा सेवक व्हावा म्हणून ज्याची गर्भाशयातच घडण केली,
आणि हे काम देऊन माझा बहुमान केला
व माझे परमेश्वर माझे सामर्थ्य आहेत—
6ते म्हणतात,
“याकोबाच्या कुळांना पुनर्स्थापित करणे
आणि माझ्या अवशिष्ट इस्राएलच्या लोकांना परत आणणे,
हे करण्यासाठी माझा सेवक होणे, हे काम फारच लहानसे आहे,
तर पृथ्वीच्या दिगंतापर्यंत माझे तारण पोचवावे यासाठी
मी तुला गैरयहूदीयांसाठी त्यांचा प्रकाश व्हावा असेही करेन.”
7ज्याला राष्ट्रांनी तुच्छ व घृणास्पद मानलेले आहे,
जो शासनकर्त्यांचा सेवक आहे, त्याला:
उद्धारकर्ता आणि इस्राएलचे पवित्र परमेश्वर,
याहवेह असे म्हणतात—
“जेव्हा राजे तुला बघतील तेव्हा ते उठून उभे राहतील,
अधिपती तुला लवून मुजरा करतील,
कारण याहवेहने, जे विश्वसनीय आहेत,
जे इस्राएलचे पवित्र परमेश्वर आहेत, त्यांनी तुला निवडले आहे.”
इस्राएलची पुन्हा स्थापना
8याहवेह असे म्हणतात:
“माझ्या कृपेच्या समयी मी तुम्हाला उत्तर देईन,
आणि तारणाच्या दिवशी, मी तुम्हाला साहाय्य करेन;
मी तुमचे संगोपन करेन
आणि तुम्हाला सर्व लोकांसाठी एक करार असे करेन, जेणेकरून,
तुमची भूमी पुनर्स्थापित होईल,
आणि ओसाड वतने पुन्हा तुमच्या स्वाधीन होतील,
9बंदिवानांना ‘बाहेर निघा,’ असे म्हणावे
आणि जे अंधारात आहेत, त्यांना म्हणावे, ‘स्वतंत्र व्हा!’
“ते रस्त्याच्या काठावर चरतील
आणि प्रत्येक नापीक टेकड्यांवर त्यांना गवत सापडेल.
10ते तहानलेले किंवा भुकेले होणार नाहीत.
वाळवंटातील किंवा सूर्याची उष्णता त्यांना इजा करणार नाही.
ज्यांनी त्यांच्यावर करुणा केली आहे, ते त्याचे मार्गदर्शन करतील
आणि त्यांना पाण्याच्या झर्‍यांजवळून चालवितील.
11मी माझ्या सर्व पर्वतांच्या सरळ वाटा करेन,
आणि माझे महामार्ग उंचावले जातील.
12पाहा, ते दूरच्या ठिकाणांहून येतील—
काही उत्तरेकडून, काही पश्चिमेकडून,
तर काही सीनीम#49:12 काही मूळ प्रतीत आस्वान प्रांतातून येतील.”
13हे आकाशांनो, हर्षगर्जना करा;
अगे पृथ्वी, आनंदित हो;
अहो पर्वतांनो, गीते वर उचंबळून येऊ द्या!
कारण याहवेहने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे
व त्यांच्या पीडितांवर करुणा ते करतील.
14परंतु सीयोन म्हणते, “आमच्या याहवेहने आम्हाला टाकले आहे;
प्रभू आम्हाला विसरले आहेत.”
15“आईला आपल्या दुधपित्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल का
आपल्या जन्मदात्या मुलावरील तिची माया कधी आटेल का?
ती कदाचित विसरेल,
पण मी तुम्हाला विसरणार नाही.
16पाहा, तुम्हाला मी माझ्या तळहातावर कोरले आहे
व तुझे तट सदोदित माझ्यासमोर आहेत.
17तुमची संतती घाईघाईने परत येईल,
आणि तुम्हाला उजाड करणारे तुम्हाला सोडून निघून जातील.
18तुमची नजर वर उचला आणि सभोवती पाहा;
तुमची सर्व संतती एकत्र येऊन तुमच्याकडे परत येतील.
मी जिवंत आहे,” याहवेह घोषणा करतात,
“तुम्ही त्यांना आभूषणाप्रमाणे अंगावर धारण कराल,
वधूप्रमाणे तुम्ही त्यांना परिधान कराल.
19“जरी तुम्ही उद्ध्वस्त झाले व ओसाड करण्यात आले होते
आणि जी तुमची भूमी उजाड झाली,
ती तुमच्या लोकांना फारच कमी पडेल,
आणि तुम्हाला गिळंकृत करणारे खूप दूर गेलेले असतील.
20विलापाच्या काळात जन्मलेल्या संततीला
असे म्हणताना तुम्ही ऐकाल,
‘आम्हाला ही जागा फारच कमी पडते;
आम्हाला राहण्यास आणखी जास्त जागा पाहिजे.’
21तेव्हा तू मनात म्हणशील,
‘यांना माझ्यासाठी कोणी जन्माला घातले?
मी दुःखी व निर्वंश होते;
मी बंदिवासात व नाकारलेली होते.
माझ्यासाठी यांना कोणी वाढविले?
मला एकटेच टाकण्यात आले होते,
मग हे सर्व—कुठून आले?’ ”
22सार्वभौम याहवेह असे म्हणतात:
“पाहा, मी राष्ट्रांना इशारा करेन,
मी माझा झेंडा लोकांपुढे उंचावेन;
ते तुझ्या पुत्रांना खांद्यांवर उचलून आणतील
व तुझ्या कन्यांना कडेवर घेऊन आणतील.
23राजे तुला उपपित्यासमान होतील,
व त्यांच्या राण्या तुला उपमातेसमान होतील.
ती तुझ्यासमोर भुईपर्यंत लवून मुजरा करतील;
आणि तुझी पायधूळ चाटतील.
तेव्हा मीच याहवेह आहे, हे तुला समजेल.
माझ्यावर आशा ठेवणारा, कधीच निराश होणार नाही.”
24योद्ध्याच्या हातून लूट घेता येईल काय?
किंवा अत्याचारीकडून नीतिमान बंदिवानांना सोडविता येईल काय?
25परंतु याहवेह हे असे म्हणतात:
“होय, योद्ध्याच्या हातून बंदिवान सोडविले जातील,
व अत्याचारीकडून लूट हिसकावून घेतली जाईल;
तुमच्याशी झगडणाऱ्यांशी मी झगडेन,
आणि मी तुमच्या मुलांना वाचवेन.
26तुम्हाला पिडणाऱ्यांना मी त्यांचेच मांस खाऊ घालेन;
आणि त्यांच्याच रक्ताच्या नद्यांचे रक्त पिऊन ते मद्य पिल्यासारखे धुंद होतील.
मग हे सर्व मानवजातीला समजेल
कि मी, याहवेह, तुझा त्राता,
तुझा उद्धारकर्ता व याकोबाचा सर्वसमर्थ परमेश्वर आहे.”

सध्या निवडलेले:

यशायाह 49: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन