YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशायाह 43

43
इस्राएलचे एकमेव तारणकर्ता
1परंतु आता, याहवेह असे म्हणतात—
याकोबा, ज्यांनी तुला निर्माण केले,
इस्राएला, ज्यांनी तुझी रचना केली:
“भिऊ नको, कारण खंडणी भरून मी तुझी सुटका केली आहे.
मी तुला नावाने हाक मारली आहे; तू माझीच आहेस.
2जेव्हा तू खोल जलातून जाशील,
मी तुझ्याबरोबर असेन,
जेव्हा तू नद्या ओलांडून पुढे जाशील,
त्या तुला बुडविणार नाही!
जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील,
तू भाजली जाणार नाही.
त्या ज्वाला तुला भस्म करणार नाहीत.
3कारण मी याहवेह, तुझा परमेश्वर आहे,
इस्राएलचा पवित्र परमेश्वर, तुझा तारणकर्ता;
तुझ्या खंडणीसाठी मी इजिप्तला दिले,
तुझा मोबदला म्हणून कूश आणि सबा दिले,
4कारण तू माझ्यासाठी मौल्यवान व आदरणीय आहेस,
आणि मी तुझ्यावर प्रीती करतो,
मी तुझ्या मोबदल्यात लोकांना देईन,
तुझ्या जिवाच्या मोबदल्यात मी राष्ट्रांना देईन.
5भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे;
मीच तुझ्या संततीला पूर्वेकडून
आणि पश्चिमेकडून एकत्र करेन,
6मी उत्तरेला म्हणेन, ‘त्यांना सोडून द्या!’
आणि दक्षिणेला म्हणेन, ‘त्यांना धरून ठेवू नका.’
माझ्या पुत्रांना दूरवरून
आणि पृथ्वीच्या कोपऱ्यातून माझ्या कन्यांना घेऊन या—
7जो कोणी माझ्या नावाने ओळखला जातो,
ज्यांना मी माझ्या गौरवासाठी निर्माण केले,
ज्यांना मी घडविले आहे, त्यांना घेऊन या.”
8जे डोळे असून अंध आहेत,
जे कान असून बहिरे आहेत, अशांना बाहेर काढ.
9सर्व राष्ट्रे एकत्र येतात
आणि सर्व लोक एकजूट होतात.
त्यांच्या कोणत्या मूर्तींनी हे भाकीत केले होते
आणि भावी गोष्टी आम्हाला घोषित केल्या?
त्या सत्य बोलल्या तर त्याचे साक्षीदार त्यांनी आणावे,
जेणेकरून ऐकणारे म्हणतील, “हे न्याय्य आहे.”
10परंतु याहवेह घोषित करतात, “हे इस्राएला, तुम्ही माझे साक्षीदार आहात,
आणि तुम्ही माझे निवडलेले सेवक आहात.
जेणेकरून तुम्ही ओळखावे आणि माझ्यावर विश्वास ठेवावा,
मीच परमेश्वर आहे हे समजून घ्यावे.
माझ्यापूर्वी दुसरा कोणी देव अस्तित्वात नव्हता,
आणि माझ्या नंतरही नसेल.
11मी, केवळ मीच याहवेह आहे,
माझ्याशिवाय दुसरा कोणीही तारणकर्ता नाही.
12मी प्रगट केले, वाचविले व घोषित केले—
मीच केले, तुमच्यातील इतर कोणत्याही विदेशी दैवताने केले नाही.”
याहवेह घोषित करतात, तुम्ही माझे साक्षीदार आहात की, “मीच परमेश्वर आहे.
13सनातनकालापासून मीच परमेश्वर म्हणून अस्तित्वात आहे.
माझ्या हातातून कोणाचीही सुटका होऊ शकत नाही.
मी जेव्हा कार्य करतो, त्याला कोणीही उलट करू शकत नाही.”
परमेश्वराची कृपा आणि इस्राएलचा अविश्वासूपणा
14तुमचे उद्धारकर्ता, इस्राएलचे पवित्र परमेश्वर
याहवेह असे म्हणतात—
“तुमच्याकरिता मी खास्द्यांवर सैन्य पाठवेन
आणि सर्व बाबेलच्या लोकांना
ज्यांचा त्यांना अत्यंत अभिमान होता,
त्या त्यांच्याच जहाजात पलायन करणारे म्हणून मी त्यांना आणेन.
15मी याहवेह, तुमचा पवित्र परमेश्वर आहे,
इस्राएलचा निर्माणकर्ता व तुमचा राजा आहे.”
16याहवेह असे म्हणतात—
ज्यांनी समुद्रातून मार्ग काढला,
महासागरामधून रस्ता तयार केला,
17ज्यांनी इजिप्तच्या सैन्याला व त्याच्या रथांसह व घोड्यांसह
व त्यांच्या मजबूतीच्या ज्यादा कुमकीसह बुडविले,
तेव्हा तेवत्या वाती मालवाव्या तशा, त्यांच्या प्राणज्योती अशा मालविल्या,
कि ते परत कधीही न उठण्यासाठी तिथेच गारद झाले:
18“पण पूर्वीच्या गोष्टी विसरा;
गतकाळाचा जास्त विचार करू नका.
19पाहा, मी एक नवी गोष्ट करणार आहे!
ती आता उभारत आहे; तुम्हाला ते आकलन होत नाही का?
मी अरण्यातून रस्ता तयार करत आहे
ओसाड भूमीत झरे बनवित आहे.
20रानातील हिंस्र श्वापदे
कोल्हे आणि घुबडे माझा आदर करतात,
कारण मी अरण्यात त्यांना जलपुरवठा करतो
माझ्या त्या निवडलेल्या लोकांना पिण्यासाठी,
ओसाड भूमीत झरे बनवितो,
21ज्या लोकांना मी माझ्यासाठी निर्माण केले
ते माझ्या प्रशंसेची घोषणा करतील.
22“परंतु याकोबा, तू माझा धावा केला नाही,
इस्राएला, तुम्ही माझ्यासाठी स्वतःला थकविले#43:22 किंवा निश्चितच तुम्ही माझ्यामुळे थकला आहात नाही.
23होमार्पणासाठी तुम्ही कोकरे आणली नाहीत.
अर्पणे करून तुम्ही माझा सन्मान केला नाही.
मी तुम्हाला अन्नार्पणाचे ओझे दिले नाही
धूप जाळण्याचा आग्रह करून थकविले नाही.
24तुम्ही माझ्यासाठी कधी सुगंधी दालचिनी विकत आणली नाही,
किंवा भरगच्च चरबीचे यज्ञार्पण केले नाही.
उलट, केवळ तुमच्या पातकांचे ओझे मला दिले
व तुमच्या अपराधांनी मला शिणविले.
25“मी, खरोखर केवळ माझ्याकरिताच
मी तुमचे अपराध पुसेन
आणि पुन्हा त्यांची आठवणही करणार नाही.
26भूतकाळाचे परीक्षण करा,
चला, याबद्दल चर्चा करू या;
तुम्ही निष्पाप आहा हे सिद्ध करण्यास आपली बाजू मांडा.
27तुमच्या पूर्वपित्याने पातके केली;
ज्याला मी पाठविले, कि तुम्हाला माझ्याविरुद्ध बंडखोरी करण्यास शिकवावे.
28म्हणूनच मी तुमच्या मंदिराच्या अधिपतींची मानहानी केली;
मी याकोबाला विध्वंसाच्या हवाली केले
व इस्राएलला तिरस्कारास्पद केले.

सध्या निवडलेले:

यशायाह 43: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन