YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशायाह 24

24
याहवेहकडून केला जाणारा पृथ्वीचा विध्वंस
1पाहा, याहवेह पृथ्वीचा नाश करणार आहेत
आणि ती उद्ध्वस्त करणार आहेत;
ते तिचा चेहरा बिघडवून टाकतील
आणि तेथील रहिवाशांची पांगापांग करतील—
2ते प्रत्येकासाठी समान असेल,
जसे लोकांसाठी तसेच याजकासाठी
जसे सेवकासाठी तसेच त्याच्या मालकासाठी
जसे सेविकेसाठी तसेच तिच्या मालकिणीसाठी,
जसे खरेदी करणाऱ्यांसाठी तसेच विकत घेणाऱ्यांसाठी,
जसे उसने देणाऱ्यासाठी तसेच उसने घेणाऱ्यासाठी,
जसे कर्जदारांसाठी तसेच कर्जदात्यांसाठी.
3पृथ्वी पूर्णपणे पडीक जमीन होईल
आणि संपूर्णपणे लुटली जाईल.
हे शब्द याहवेह बोलले आहेत.
4पृथ्वी सुकते आणि कोमेजून जाते,
जग खंगून जाते आणि सुकून जाते,
आकाश पृथ्वीबरोबर झुरत राहते.
5पृथ्वीला तिच्या लोकांनी भ्रष्ट केले आहे.
त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे,
कायदे भंग केले आहेत
आणि अनंतकाळाचा करार मोडला आहे!
6म्हणून शाप पृथ्वीला भस्मसात करतो.
तिच्या लोकांना त्यांच्या दोषाचे परिणाम भोगावे लागतील.
त्यामुळे पृथ्वीचे रहिवासी जळून गेले आहेत,
आणि फारच थोडे उरले आहेत.
7नवा द्राक्षारस सुकतो आणि द्राक्षवेल कोमेजून जाते.
आनंद करणारे सर्वजण विव्हळतात.
8आनंददायक ढोलकी शांत झाली आहे,
हर्षोल्हास करणार्‍यांचा आवाज थांबला आहे,
आनंद करणारी वीणा शांत आहे.
9गाणी म्हणत मद्यपान करणे बंद पडले आहे!
मद्याचा घोट मद्यपीला कडू लागतो!
10उद्ध्वस्त नगरी निर्जन झाली आहे;
प्रत्येक घराचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे.
11रस्त्यावर ते मद्यासाठी आरडाओरडा करीत आहेत;
सगळा आनंद दुःखात बदलला आहे,
हर्षोल्हासाचे स्वर पृथ्वीवरून नाहीसे झाले आहेत!
12नगर उद्ध्वस्त झाले आहे,
त्याच्या वेशी तोडून त्यांचे तुकडे करण्यात आले आहेत.
13जसे जैतून वृक्ष झाडल्यानंतर
किंवा द्राक्ष गोळा करून द्राक्षाचा हंगाम संपल्यानंतर उरलले राहतात,
तशी देशांची अवस्था होईल,
तशी या पृथ्वीची अवस्था होईल.
14ते हर्षाने आरोळ्या मारतील; आनंदाने गजर करतील,
पश्चिमेकडून ते याहवेहच्या ऐश्वर्याची स्तुती करतील.
15म्हणून पूर्वेकडे याहवेहचा गौरव करा;
समुद्राच्या बेटांवर,
इस्राएलचे परमेश्वर याहवेहच्या नावाचा गौरव करा.
16पृथ्वीच्या दिगंतापासून आपण हे गाणे ऐकतो:
“नीतिमान परमेश्वराचा गौरव असो.”
पण मी म्हणालो, “माझा नाश होत आहे, माझा नाश होत आहे!
माझा धिक्कार असो!
फसवणूक करणारा विश्वासघात करतो!
फसवणूक करून तो विश्वासघात करतो!”
17पृथ्वीवरील सर्व लोकांनो,
तुमच्या वाट्याला दहशत, खड्डा व सापळा येणार आहे!
18भीतीने तुम्ही पळ काढण्याचा प्रयत्न कराल,
तर खड्ड्यात पडाल;
खड्ड्यातून कसेबसे बाहेर पडाल,
तर तुम्ही सापळ्यात अडकाल,
कारण आकाशाचे धरणद्वार उघडण्यात आले आहे,
पृथ्वीचा पाया हादरला आहे.
19पृथ्वीचे तुकडे झाले आहेत,
पृथ्वी पूर्ण फाटून गेली आहे,
पृथ्वीला जबरदस्त हादरा मिळाला आहे.
20पृथ्वी मद्यपीसारखी झोकांड्या खात आहे.
वादळात झोपडी हेलकावे खाते, तशी ती हेलकावे खात आहे;
कारण तिच्या बंडखोरपणाचे ओझे अत्यंत जड झाले आहे,
ती अशी कोसळेल—कि पुन्हा उठणार नाही.
21त्या दिवशी याहवेह,
वर आकाशातील अधिपतींना
आणि खाली पृथ्वीवरील राजांना शिक्षा करतील.
22त्यांना एकत्र गोळा करण्यात येईल
आणि कैद्यांसारखे त्यांना अंधारकोठडीत टाकण्यात येईल;
त्यांना कारागृहात कोंडून ठेवण्यात येईल.
आणि त्यांना अनेक दिवसांकरिता शिक्षा देण्यात येईल.
23चंद्राची त्रेधा उडेल,
सूर्य लज्जित होईल;
कारण सर्वसमर्थ याहवेह वैभवाने
सीयोन पर्वतावर आणि यरुशलेममध्ये,
आणि आपल्या वडीलजनांसमोर—गौरवाने राज्य करतील.

सध्या निवडलेले:

यशायाह 24: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन