YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशायाह 22

22
यरुशलेमविषयी भविष्यवाणी
1दृष्टान्ताच्या खोऱ्याविरुद्ध एक भविष्यवाणी:
आता तुम्हाला काय त्रास होत आहे,
ज्यामुळे तुम्ही सर्वजण छप्परावर गेलेले आहात?
2हे गोंधळाने भरलेल्या नगरा,
हे दंगा व चंगळबाजीने भरलेल्या शहरा,
तुमचे वधलेले लोक तलवारीने मारले गेले नव्हते,
ते युद्धातही मरण पावले नव्हते.
3तुमचे सर्व पुढारी एकत्र मिळून पळून गेले आहेत;
धनुष्याचा वापर न करताच ते पकडले गेले आहेत.
जेव्हा शत्रू अजून दूर आहे, तोपर्यंत तुम्ही पळून गेला होता,
ते तुम्ही सर्व पकडले गेले व त्यांना कैदी करून नेले.
4म्हणून मी म्हणालो, “माझ्यापासून दूर जा;
मला आवेगाने रडू द्या.
माझ्या लोकांच्या नाशामुळे
माझे सांत्वन करण्याचा प्रयत्न करू नका.”
5प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, यांचा एक दिवस आहे
दृष्टान्ताच्या खोऱ्यामध्ये
गोंधळाचा, तुडविण्याचा आणि दहशतीचा,
भिंती तोडून पाडण्याचा दिवस
आणि पर्वतातून ओरडण्याचा दिवस आहे.
6एलाम मनुष्यांचे रथ, त्यांचा सारथी आणि घोडे व भाले यासहित
बाण ठेवण्याचा भाता हाती घेते;
कीर ढाल उघडी करते.
7तुमची आवडती खोरी रथांनी भरून गेली आहेत,
आणि घोडेस्वार नगराच्या फाटकांवर तैनात आहेत.
8प्रभूने यहूदीयाचे संरक्षण काढून टाकले,
आणि तुम्ही त्या दिवशी
जंगलाच्या राजवाड्यामध्ये असलेल्या शस्त्रास्त्रांकडे पाहिले.
9तुम्ही पाहिले की, दावीद नगराची तटबंदी
पुष्कळ ठिकाणी तुटलेली होती;
खालच्या जलाशयात
तुम्ही पाणी साठविले होते.
10यरुशलेममधील इमारती तुम्ही मोजल्या
आणि भिंती भक्कम करण्यासाठी घरे जमीनदोस्त करून टाकली.
11जुन्या जलाशयाच्या पाण्यासाठी
तुम्ही दोन भिंतींमध्ये हौद बांधला,
परंतु ज्यांनी तो तयार केला, त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिले नाही,
किंवा ज्यांनी ते फार पूर्वीपासून योजले होते, त्यांना आदर दिला नाही.
12प्रभू, सर्वसमर्थ याहवेह,
रडण्यासाठी आणि आक्रोश करण्यासाठी,
तुमचे केस मुंडविण्यासाठी आणि गोणपाट घालण्यासाठी,
त्या दिवशी तुम्हाला बोलावतील.
13परंतु पाहा, तिथे आनंद आणि चंगळ आहे,
गुरांची कत्तल आणि मेंढरांची हत्या,
मांस खाणे आणि द्राक्षारस पिणे!
तुम्ही म्हणता, “चला, आपण खाऊ आणि पिऊ,
कारण उद्या आपण मरणार आहोत!”
14सर्वसमर्थ याहवेहनी माझ्या ऐकण्यात हे प्रकट केले आहे: “तुझ्या मरणाच्या दिवसापर्यंत या पापाचे प्रायश्चित्त केले जाणार नाही,” असे प्रभू सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.
15प्रभू, सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात:
“जा, या कारभाऱ्याला सांग,
राजवाड्याचा प्रशासक शेबनाला सांग:
16तुम्ही इथे काय करत आहात आणि या दगडातून स्वतःसाठी कबर कापण्याची
उंचीवर तुमची कबर कोरण्याची,
आणि या खडकात तुमची विश्रांतीची जागा तयार करण्याची
परवानगी तुम्हाला कोणी दिली आहे?
17“हे बलवान पुरुषा, याहवेहच तुला घट्ट पकडून ठेवणार आहेत
आणि आता तुला झुगारून फेकणार आहेत.
18ते तुला हातामध्ये चुरगाळून, चेंडूसारखे,
दूर ओसाड प्रदेशात भिरकावून देणार आहे
आणि तिथेच तुझा अंत होईल.
ज्या रथांचा तुला इतका अभिमान होता
ते तुझ्या मालकाच्या घरास लज्जित करतील.
19मीच तुला तुझ्या पदावरून काढून टाकेन
आणि या अधिकाराच्या स्थानावरून ढकलून देईन.
20“मग मी माझा सेवक, हिल्कियाहचा पुत्र एल्याकीमला पाचारण करेन. 21तुझा पोशाख, तुझी पदवी, तुझा अधिकार मी त्याला देईन. तो यहूदीयाच्या लोकांचा व यरुशलेममधील रहिवाशांचा पिता होईल. 22मी त्याच्या खांद्यावर दावीदाच्या घराण्याची चावी ठेवेन. तो जे उघडेल, ते कोणीही बंद करू शकणार नाही आणि तो जे काही बंद करेल, ते कधीही उघडू शकणार नाही. 23मी त्याला एखाद्या खुंटीसारखे मजबूत ठिकाणी रोवेन; त्याच्या पित्याच्या घराण्यासाठी सन्मानाचे आसन#22:23 किंवा राजासन होईल. 24त्याच्या घराण्याचा लौकिक त्याच्यावर स्थिर करेन: त्याचे वंशज व त्याच्या शाखा—त्याचे सर्व लहान पात्र, कटोऱ्यापासून ते मोठ्या पात्रापर्यंत.”
25सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात, “त्या दिवशी मजबूतपणे ठोकलेली पाचर डळमळीत होईल; ती उचकटून जाईल व निखळून जमिनीवर पडेल, तिच्यावर आधारलेले सर्व ओझे खाली पडेल.” ही याहवेहची वाणी आहे.

सध्या निवडलेले:

यशायाह 22: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन