YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशायाह 21

21
बाबेलविरुद्ध भविष्यवाणी
1समुद्राकाठी असलेल्या वाळवंटी प्रदेशाविरुद्ध भविष्यवाणी:
ज्याप्रकारे वावटळ दक्षिणेकडील प्रदेशांना झाडून जाते,
त्याच प्रकारे हल्ला करणारा वाळवंटी प्रदेशातून,
दहशती भूमीमधून येतो.
2एक भयानक दृष्टान्त मला दाखविण्यात आला आहे:
देशद्रोही विश्वासघात करतो, लूट करणारा लूट घेतो.
हे एलाम, आक्रमण करा! मेदिया, वेढा घाला!
तिने दिलेले दुःखाचे सर्व विव्हळणे मी संपवून टाकेन.
3यामुळे माझ्या शरीराला यातनेने दुखविले आहे,
प्रसूत स्त्रीच्या वेदनांप्रमाणे मला वेदनांनी घेरले आहे.
जे काही मी ऐकतो, त्यामुळे मी लटपटून जातो,
मी जे काही पाहतो, त्यामुळे मी भांबावून जातो.
4माझे अंतःकरण अडखळते,
भीती मला थरथर कापविते;
ज्या संध्याकाळची मी आतुरतेने वाट पाहत असे
ती माझ्यासाठी भयप्रद अशी झाली आहे.
5ते मेजावर भोजनाची तयारी करतात,
ते गालिचे पसरवितात,
ते खातात, ते पितात!
अहो, अधिकारी, तुम्ही आता उठा,
ढालींना तेल लावा!
6प्रभू मला असे म्हणत आहेत:
“जा, टेहळणी करणारा उभा कर,
आणि त्याला जे काही दिसते ते त्याने कळवावे.
7जेव्हा तो रथांना
घोड्यांच्या ताफ्यासहीत,
आणि गाढवावर स्वार असलेले
किंवा उंटावर स्वार असलेले पाहतो,
तेव्हा त्याने सावध राहावे,
पूर्णपणे सावध राहावे.”
8त्याप्रमाणे तटावर ठेवलेला पहारेकरी सिंहगर्जना करीत ओरडला,
“महाराज, मी दिवसेंदिवस,
रात्रीच्या रात्री येथे पहारा करीत राहिलो.
9पाहा, एक मनुष्य रथात स्वार होऊन
घोड्याच्या ताफ्याबरोबर इकडे येत आहे.
आणि तो प्रत्युत्तर देत आहे:
‘बाबेल पडले आहे, ते पडले आहे!
तिथे असलेल्या तिच्या दैवतांच्या
सर्व मूर्तींचे तुकडे होऊन जमिनीवर पडले आहेत!’ ”
10माझे लोक जे खळ्यावर चिरडले गेले आहेत,
इस्राएलचे परमेश्वर,
सर्वसमर्थ याहवेह यांच्याकडून,
मी जे ऐकले आहे ते मी तुम्हाला सांगतो.
एदोमविरुद्ध भविष्यवाणी
11दूमाह#21:11 किंवा एदोम म्हणजे शांतता किंवा स्तब्धता विरुद्ध एक भविष्यवाणी:
सेईरमधून कोणीतरी मला हाक मारत आहे,
“रखवालदार, रात्र संपण्यास किती वेळ उरला आहे?
रखवालदार, रात्र संपण्यास किती वेळ उरला आहे?”
12पहारेकरी उत्तर देतो,
“सकाळ होत आहे, पण रात्रही आली आहे.
जर तुम्हाला विचारणा करावयाची आहे, तर मला विचारा;
आणि मग पुन्हा या.”
अरेबियाविरुद्ध भविष्यवाणी
13अरेबियाविरुद्ध भविष्यवाणी:
ददानी काफिल्यांनो,
तुम्ही जे अरेबियाच्या अरण्यात वसती करता,
14तुम्ही, तेमा येथे राहणाऱ्यांनो,
तहानलेल्यांसाठी पाणी घेऊन या;
पलायन केलेल्यांसाठी अन्न घेऊन या.
15ते तलवारीपासून पळतात
म्यानातून उपसलेल्या तलवारीपासून ते पळतात,
वाकवून नेम धरलेल्या धनुष्यापासून
आणि युद्धाच्या कठोरतेपासून पळतात.
16प्रभू मला असे म्हणतात: “एका वर्षाच्या आत, कराराने बांधलेला सेवक जसे एकएक दिवस मोजत असतो, तसे केदारचे सर्व वैभव नाहीसे होईल. 17केदारचे वाचलेले धनुर्धारी, योद्धे थोडेच असतील.” इस्राएलचे परमेश्वर, याहवेह असे बोलले आहेत.

सध्या निवडलेले:

यशायाह 21: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन