होशेय 4
4
इस्राएलविरुद्ध केलेले आरोप
1इस्राएली लोकहो, याहवेहचे वचन ऐका.
या देशात राहणार्यांवर
याहवेहचा आरोप आहे:
या देशात विश्वासूपणा नाही,
प्रीती नाही, परमेश्वराप्रती ज्ञान नाही.
2या ठिकाणी फक्त शाप, खोटे बोलणे आणि खून,
चोरी आणि व्यभिचार आहे;
सर्व सीमाबंदी ते मोडून टाकतात,
आणि रक्तपातानंतर रक्तपात होतो.
3म्हणूनच तुमची भूमी कोरडी पडत आहे,
येथे राहणारे सर्व नाश पावत आहे;
रान पशू, आकाशातील पक्षी
आणि समुद्रातील मासे नाहीसे होत आहेत.
4परंतु कोणीही आरोप करू नका,
तुम्ही इतरांवर आळ घेऊ नका,
कारण तुमचे लोक असे आहेत
जे याजकांवर दोष लावतात.
5तुम्ही दिवस व रात्र अडखळता,
आणि संदेष्टेही तुमच्याबरोबर अडखळतात.
म्हणून मी तुमच्या आईचा नाश करेन—
6ज्ञान नसल्यामुळे माझ्या लोकांचा नाश होत आहे,
“कारण, तुम्ही ज्ञानाला नाकारले आहे,
म्हणून मी तुम्हाला माझे याजक म्हणून नाकारत आहे;
कारण तुम्ही तुमच्या परमेश्वराच्या नियमांकडे दुर्लक्ष केले आहे,
म्हणून मी सुद्धा तुमच्या मुलांकडे दुर्लक्ष करेन.
7जितकी याजकांची संख्या वाढत गेली,
तितकी अधिक पापे त्यांनी माझ्याविरुद्ध केली;
त्यांच्या वैभवशाली परमेश्वराच्या बदल्यात#4:7 किंवा मी त्यांचे वैभव बदलेन त्यांनी लाजिरवाणी गोष्ट स्वीकारली.
8माझ्या लोकांच्या पापांवर ते पोषण करतात
आणि त्यांच्या दुष्टतेचा आनंद घेतात.
9आणि असे होईल की: जसे लोक तसे याजक होतील.
मी दोघांनाही त्यांच्या आचरणामुळे शासन करेन
आणि त्यांच्या कृत्यांसाठी त्यांना परतफेड करेन.
10“ते खातील परंतु ते तृप्त होणार नाहीत;
ते व्यभिचार करतील परंतु त्यांची भरभराट होणार नाही,
कारण त्यांनी याहवेहचा त्याग केला आहे
आणि स्वतःस वेश्या व्यवसायास सोपविले आहे. 11जुना द्राक्षारस
आणि नवीन द्राक्षारस
त्यांचा समंजसपणा दूर करतात.
12माझे लोक लाकडी मूर्तींचा सल्ला घेतात
आणि दैवप्रश्न करणाऱ्यांची काठी त्यांचे भविष्य सांगते.
व्यभिचाराचा आत्मा त्यांना भरकटवितो;
ते त्यांच्या परमेश्वराला विश्वासू राहिले नाहीत.
13एला वृक्ष, हिवर आणि एला या झाडांखाली,
जिथे सुखदायक सावली असते
तिथे पर्वतांच्या शिखरांवर यज्ञ करतात
आणि टेकड्यांवर ते होमार्पण करतात.
म्हणून तुमच्या कन्या वेश्याव्यवसायाकडे वळतात
आणि तुमच्या सुना व्यभिचार करतात.
14“जेव्हा त्या वेश्याव्यवसायाकडे वळतात,
अथवा तुमच्या सुना
त्या व्यभिचार करतात,
मी तुमच्या कन्यांना शासन करणार नाही,
कारण पुरुष स्वतः वेश्यांबरोबर सहवास करतात
आणि पवित्र स्थळी असलेल्या देवदासींबरोबर बलिदान करतात—
समंजसपणा नसलेल्या लोकांचा नाश होईल!
15“हे इस्राएला, जरी तू व्यभिचार केला आहेस,
तरी यहूदाहला दोषी होऊ देऊ नकोस.
“गिलगालकडे जाऊ नका;
वर बेथ-आवेन#4:15 बेथ-अव्हेन दुष्टतेचे घर बेथेल परमेश्वराचे घर याचे अपमानास्पद नाव येथे जाऊ नका.
आणि ‘याहवेहच्या जीविताची शपथ!’ अशी शपथ घेऊ नका.
16जशी कालवड हट्टी असते,
तसे इस्राएली लोक हट्टी आहेत.
मग जशी कोकरे कुरणात चरतात,
त्याप्रमाणे याहवेह त्यांना कुरणात कसे नेतील?
17एफ्राईम मूर्तीबरोबर जोडले गेले आहे,
त्याला एकटे सोडून द्या!
18जेव्हा त्यांचे मद्य संपते तेव्हा सुद्धा,
ते त्यांचा वेश्याव्यवसाय चालू ठेवतात;
त्यांचे शासक लज्जास्पद कृतिंवर अधिक प्रीती करतात.
19एक वावटळ त्यांना वाहून नेईल,
आणि त्यांच्या अर्पणांमुळे त्यांना लाज वाटेल.
सध्या निवडलेले:
होशेय 4: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.